अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने आता 2026-27 या शैक्षणिक वर्षातील पहिली टीईटी जूनअखेर अथवा जुलै महिन्यात होईल. त्यानंतर याच वर्षातील नोव्हेंबरमध्ये दुसरी टीईटी घेतली जाणार आहे. 2027-28 या शैक्षणिक वर्षातील पहिली परीक्षा जूनमध्ये होईल; कारण 31 ऑगस्टपूर्वी निकाल जाहीर करावा लागणार आहे. दुसरीकडे, 31 ऑगस्ट 2027 पर्यंत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या तीन सीटीईटी होणार आहेत. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी सक्तीचा निर्णय घेतला आणि त्यासाठी दोन वर्षांची मुदतही दिली. ही मुदत 31 ऑगस्ट 2027 रोजी संपणार आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त सर्वच शिक्षकांना, ज्यांचे वय 53 वर्षांपर्यंत आहे, त्यांना दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण व्हायचे आहे. मुदतीत पात्रता पूर्ण न करणार्यांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामध्ये त्या वर्गांवरील तथा शाळांमधील मुख्याध्यापकांचा देखील समावेश आहे. दुसरीकडे, यापुढे शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घेण्यासाठी देखील टीईटी उत्तीर्ण असावे लागणार आहे. 23 नोव्हेंबरला झालेल्या टीईटीत 12 टक्केसुद्धा उमेदवार उत्तीर्ण झाले नाहीत.
तर आज शनिवारी झालेल्या केंद्र सरकारच्या सीटीईटी परीक्षेचा निकाल देखील कमीच असतो. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना पुढच्या सहा मुदतीत टीईटीफ उत्तीर्ण व्हावीच लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अध्यापनाबरोबर शिक्षकांना स्वत:ला देखील अभ्यास करावा लागणार आहे. केंद्र शासनाच्या सीटीईटी वर्षातून दोनदा होतात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे देखील वर्षातून दोन परीक्षा घेतल्या जातील. तसा प्रस्ताव शासनाला पाठविला असल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.
राज्य सरकारच्या मान्यतेकडे शिक्षकांचे लक्ष
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी एकदाच ङ्गटीईटीफ घेतली जात होती, तसा शासन निर्णय आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना दोन वर्षांत पात्रता पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ती मुदत 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शासन निर्णय बदलावा आणि परीक्षा परिषदेला देखील वर्षातून दोनदा परीक्षा घेण्यास परवानगी द्यावी लागणार आहे. तसा प्रस्ताव परीक्षा परिषदेने शासनाला पाठविला आहे. त्यावर आता राज्य सरकारकडून तत्काळ मान्यता मिळणार का, याकडे राज्यातील पावणेदोन लाख शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
नोव्हेंबरच्या परीक्षेचा निकाल जाहीर
23 नोव्हेंबर रोजी झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातून 22 हजार 850 परीक्षार्थी पैकी 21 हजार 431 परीक्षार्थी यांनी परीक्षा दिली होती. यापैकी जिल्ह्यातील किती शिक्षक टीईटी पास झाले याचा तपशील संबंधीत शिक्षकांचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेला प्राप्त हे समजणार आहे. तोपर्यंत संबंधीत परीक्षार्थी याच्या लॉगिंगवर व्यक्तीगत निकाल पाठवण्यात आला असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.





