पुणे | प्रतिनिधी Pune
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका सहा वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियांशी बागडे असे या मृत बालिकेचे नाव असून, ती पारनेर तालुक्यातील सुपे येथील रहिवासी होती. प्रियांशीला डोळ्यांतील तिरळेपणाचा त्रास असल्याने त्यावर उपचार करण्यासाठी तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने शस्त्रक्रियेपूर्वी सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्या होत्या आणि त्यांचे अहवाल सामान्य असल्याचे पालकांना सांगितले होते, ज्यामुळे पालकांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवून शस्त्रक्रियेसाठी संमती दिली होती.
मात्र, शस्त्रक्रियेपूर्वी ऑपरेशन थिएटरमध्ये प्रियांशीच्या डोळ्यांत औषधी ड्रॉप टाकल्यानंतर तिची प्रकृती अचानक गंभीररीत्या बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्याने तातडीने अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्णालय प्रशासनाने पालकांना कोणतीही योग्य माहिती दिली नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलीचा जीव गेल्याचा दावा करत पालकांनी याप्रकरणी पुणे येथील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर गुरुवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. “दोषींवर कारवाई झालीच पाहिजे” आणि “आवाज कुणाचा शिवसेनेचा” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाचा निषेध केला आणि दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. खासदार नीलेश लंके यांनी देखील या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. एका निष्पाप चिमुरडीचा जीव गेल्यामुळे या प्रकरणाची सरकारने आणि आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी समिती नेमावी, असे लंके यांनी म्हटले आहे. तसेच, आगामी जुलै महिन्यातील संसदेच्या अधिवेशनात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीबाबत आपण आवाज उठवणार असल्याचेही खासदार लंके यांनी स्पष्ट केले आहे.




