अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
इन्स्टाग्रामवर सुरू असलेल्या वादाचे रूपांतर खूनी हल्ल्यात झाले. शहरातील नालेगाव भागात दोन सख्ख्या भावांवर चॉपर आणि चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये अभिषेक शाम टोणे आणि त्यांचा भाऊ कुबेर टोणे (दोघे रा. कवडे गल्ली, नालेगाव) गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी जखमी अभिषेक टोणे यांच्या फिर्यादीवरून रविवारी (10 मे) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 6 मे रोजी सायंकाळी 7:30 ते 8 वाजताच्या दरम्यान कवडे गल्ली, नालेगाव येथे अभिषेक व कुबेर यांच्या घरासमोर घडली आहे.
सांगळे गल्ली येथील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक जण अल्पवयीन आहे. अभिषेक टोणे हे घराबाहेर असताना संशयित हे तिथे आले. त्यांच्या हातात चॉपर, चाकू होता. जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांनी कुबेर टोणे याच्या डोक्यात आणि हातावर वार केले. वाचवण्यासाठी धावलेल्या अभिषेकवरही संशयित आरोपींनी हल्ला केला.
भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमींच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीला धावून आले, हे पाहून दोन्ही संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी भावांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी थोरात या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दुसर्या गटाची पोलिसात फिर्याद
दरम्यान, यासंदर्भात दुसर्या गटातील अल्पवयीन मुलाने (वय 16) फिर्याद दिली असून त्यानुसार अभिषेक व कुबेर टोणे यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवरील स्टोरी टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून फिर्यादीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीचा चुलत भावाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर फोटो स्टोरी म्हणून ठेवला होता. त्या स्टोरीवरून कुबेर टोणे याने सोशल मीडियावर शिवीगाळ केली होती. त्यावरून हा वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.





