Saturday, October 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमाती-पाणी परीक्षणातून शाश्वत शेतीला बळ - मंत्री दादा भुसे

माती-पाणी परीक्षणातून शाश्वत शेतीला बळ – मंत्री दादा भुसे

कृषी विज्ञान संकुलात माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे लोकार्पण

- Advertisement -

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना माती व पाण्याचे वैज्ञानिक परीक्षण करून शेतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. माती परीक्षणातून पिकांसाठी आवश्यक खतांचे प्रमाण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आणि योग्य पीक नियोजनाची अचूक माहिती मिळते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून उत्पादनवाढीसोबत जमिनीचे आरोग्यही जपता येते. काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी संकुलातील माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा शेतकर्‍यांसाठी ज्ञान, मार्गदर्शन आणि वैज्ञानिक शेतीचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना केले.

तालुयातील काष्टी येथील कृषी विज्ञान संकुल येथे माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा हस्तांतरण सोहळा प्रसंगी मार्गदर्शन करतांना मंत्री भुसे बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास खर्चे, प्राचार्य डॉ. महानंद माने, अभियंता मिलिंद ढोके, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, चंबल फर्टीलायझर्सचे उपव्यवस्थापक अशोक गंगावाल, अनिल निकम, दिपक मालपुरे यांच्यासह अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

माती -पाणी परीक्षण, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक कृषी यंत्रसामग्री, जैविक खतांची निर्मिती तसेच सुधारित बियाणे व फळपिकांच्या रोपांची उपलब्धता अशा विविध माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कृषी शिक्षण देतानाच त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केली.

कृषी विज्ञान संकुल कृषी शिक्षण, संशोधन आणि शेतकरी मार्गदर्शनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत असल्याने महाराष्ट्रासह राज्याबाहेरील विद्यार्थीही या संकुलात कृषी शिक्षणासाठी येत असल्याची माहिती देत भुसे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. तर आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम संकुलातर्फे राबविण्यात येत आहेत. माती परीक्षण व पाणी परीक्षणाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना योग्य कृषी नियोजनाबाबत मार्गदर्शन केले जात असून, ड्रोन तंत्रज्ञान व आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा वापरही प्रत्यक्ष समजावून देण्यात येत असल्याचे भुसे यांनी सांगितले.

शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा अनावश्यक वापर कमी करून पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने संकुलात संशोधन सुरू आहे. जैविक खतांची निर्मिती करण्यात येत असून, ती शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जमिनीचे आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न यांचा समतोल साधत आधुनिक शेती पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात येत हे कृषी विज्ञान संकुल केवळ विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे केंद्र न राहता विद्यार्थी, शेतकरी, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांना जोडणारे प्रभावी केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे मंत्री भुसे यांनी शेवटी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ.खर्चे यांनी स्थानिक गरजा, हवामान, पिकांची विविधता आणि शेतकर्‍यांच्या अनुभवांचा विचार करून कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आधुनिक प्रयोगशाळा, तांत्रिक ज्ञान आणि कृषीविषयक अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे संकुल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. अधिष्ठाता माने यांनी प्रास्ताविक केले तर शेवटी आभार योगेश पाटील यांनी मानले.

ताज्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात...