पुणे | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात मटणाचे जेवण बनवण्याची मागणी केल्यामुळे वडील आणि मुलामध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. वडिलांनी केलेल्या कथित मारहाणीत ३० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या आई-वडिलांना अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव महेश भागवत गायकवाड असे आहे. पोलिसांनी त्याचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वडिलांवर मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतल्याचा, तर आईवर पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेदहा ते पहाटे चारच्या दरम्यान रामनगर परिसरात घडली. महेशला दारूचे व्यसन होते. तो कोणताही नियमित कामधंदा करीत नसल्यामुळे त्याचे वडिलांशी वारंवार वाद होत असत. कौटुंबिक कारणांमुळे त्याची पत्नी आणि दोन मुले माहेरी राहत होती. काही दिवसांपूर्वी त्याचा घटस्फोटही झाला होता. तो स्वतंत्र राहत असला, तरी जेवणासाठी आई-वडिलांच्या घरी जात असे.
घटनेच्या रात्री महेश मद्यपान करून आई-वडिलांच्या घरी आला. त्याने मटणाचे कालवण बनवण्याची मागणी केली. श्रावण महिना सुरू असल्याने घरामध्ये मांसाहार बनवला जाणार नसल्याचे कुटुंबीयांनी त्याला सांगितले. मात्र, महेशने आग्रह कायम ठेवल्याने वडील आणि मुलामध्ये जोरदार वाद झाला.
वादादरम्यान वडिलांनी महेशच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचा कथित प्रयत्न करण्यात आला. महेशच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.




