Monday, April 6, 2026
Homeक्राईमAhilyanagar : धक्कादायक ! आईचा खून करून मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला मुलगा

Ahilyanagar : धक्कादायक ! आईचा खून करून मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला मुलगा

नगरच्या सावेडी उपनगरातील घटना || मयत महिला कोपरगावची

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात मंगळवारी (17 फेब्रुवारी) दुपारी मुलानेच आईच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची थरकाप उडविणारी घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, आईचा खून करून मुलगा मृतदेहाशेजारील बेडवर बसून गोट्या खेळत असल्याचे पोलिसांनी पाहिले. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

बेबी सुधाकर गवारे (वय अंदाजे 60, मूळ रा. कोपरगाव, सध्या रा. नवलेनगर, गुलमोहर रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) असे मयत महिलेचे नाव असून, तिचा मुलगा सुहास सुधाकर गवारे (वय अंदाजे 34) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्याला नवलेनगर येथील एका घरात भांडण सुरू असल्याचा फोन आला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबंधित घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता, सुहास गवारे हा बेडवर बसून गोट्या खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितले असता त्याने प्रतिसाद देण्याऐवजी खिडकीकडे पोलिसांच्या दिशेने हातात येईल त्या वस्तू फेकून मारल्या तसेच आक्षेपार्ह वक्तव्य केले.

परिसरात मोठी गर्दी जमू लागल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. सुहास दरवाजा उघडण्यास तयार नसल्याने पोलिसांनी खिडकीतून त्याच्यावर पाणी फेकून त्याचे लक्ष विचलित केले. त्याचवेळी दुसर्‍या बाजूने दरवाजा तोडून घरात प्रवेश करून त्याला ताब्यात घेतले. घरात प्रवेश केल्यानंतर बेबी गवारे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी नगर शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी भेट देऊन पाहणी केली.

फॉरेन्सिक पथकासही पाचारण करण्यात आले होते. मयत महिलेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी सुहास गवारे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नवलेनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांकडून घटनेमागील नेमके कारण शोधले जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...