दिल्ली । Delhi
दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग २६ दिवस अन्नत्याग उपोषण करून केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेणारे प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक सध्या एका वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चेत आले आहेत.
‘कॉकरोच जनता पार्टी’शी जोडले गेलेले अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रंका यांच्या राजकीय हेतूंविषयी बोलताना वांगचुक यांनी अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. “हे लोक काही संत नाहीत, त्यांच्या राजकीय आकांक्षा नक्कीच असू शकतात आणि त्यात काही चुकीचेही नाही,” असे महत्त्वाचे विधान वांगचुक यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत केले आहे.
सोनम वांगचुक यांनी आंदोलन आणि राजकारण यातील सीमारेषेवर भाष्य करताना म्हटले की, “अनेक जण मला विचारतात की या तरुणांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत का? माझ्या निरीक्षणातून मला ते स्पष्टपणे जाणवले आहे. त्यांनी स्वतःहून मला काही सांगितले नसले, तरी माझी नजर अशा गोष्टींवर असते. समाजकारणाचा मुखवटा घालून काम करणारे हे लोक नक्कीच संत नाहीत. त्यांना राजकीय आकांक्षा आहेत आणि असायलाही हव्यात, त्यात काही गैर नाही. मात्र, आपण ज्या जनपीठावरून किंवा आंदोलनातून उभे राहिलो आहोत, ते व्यासपीठ कोणत्याही राजकीय पक्षात रूपांतरित होऊ नये.”
आंदोलनाची तटस्थता अधोरेखित करताना ते पुढे म्हणाले, “हे व्यासपीठ जर राजकीय दबाव गट (Pressure Group) म्हणून तटस्थ राहिले, तरच ते जनतेचा विश्वास संपादन करू शकेल आणि लोकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकेल. भविष्यात कोणाला एखाद्या पक्षात प्रवेश करायचा असेल किंवा नवीन राजकीय पक्ष स्थापन करायचा असेल, तर ते तसे करण्यास स्वतंत्र आहेत. परंतु, सध्याच्या आंदोलकीय व्यासपीठाने आपली पवित्रता जपणे अत्यंत गरजेचे आहे.”
याच पॉडकास्ट दरम्यान वांगचुक यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्यावरही अत्यंत उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. ‘३ इडियट्स’ हा गाजलेला चित्रपट बनवताना आपण सोनम वांगचुक यांना ओळखतही नव्हतो, या आमिर खानच्या जुन्या दाव्याचा वांगचुक यांनी खरपूस समाचार घेतला. वांगचुक मिश्किलपणे म्हणाले, “आम्ही यापूर्वी सविस्तर भेटलो होतो. कदाचित आमिर खान ‘गजनी’ चित्रपटातील आपल्या भूमिकेत एवढा गंभीरपणे बुडाला असावा की, त्याला ‘शॉर्ट-टर्म मेमरी लॉस’ (स्मृतीभ्रंश) झाला असावा! त्यांनी भेटून माझ्याकडून अनेक कल्पना घेतल्या होत्या. मात्र, या सर्व कल्पना नेमक्या कुठून आणि कोणाकडून आल्या, हे सांगायला ते सोयीस्करपणे विसरले असावेत.”
लडाखमधील उपोषणानंतर सोनम वांगचुक यांनी राजकीय भूमिका, सामाजिक आंदोलनांची दिशा आणि बॉलिवूडमधील अनुभवांवर केलेले हे रोखठोक वक्तव्य सध्या सोशल मीडियासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चेत आले आहे.




