नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या भारतातील तरुणांवरील एका टिप्पणीने उपरोधिकपणे उत्तर देण्यासाठी सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने पाहता पाहता मोठे रूप घेतले आहे. सोशल मीडियावर त्यांना भारतातील कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक फॉलोअर्स मिळवले आहे. त्यानंतर आता या सोशल मिडियावरील पक्षाने दिल्लीतील जंतर मंतर येथील मैदानावर सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.
देशातील नीट परिक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची धार तीव्र होत चालली आहे. या आंदोलनाला देशातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यात लडाखचे सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला असून केंद्र सरकारला थेट आणि मोठा इशारा दिला आहे. “जर आंदोलनात ‘CJP’चे संस्थापक अभिजीत दिपके किंवा इतर कोणत्याही कार्यकर्त्याला अटक केली, तर मी थेट ४२ दिवसांचे (६ आठवडे) अन्नत्याग उपोषण सुरू करेन,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
जर कुणाचीही अटक झाली तर…
सोनम वांगचुक यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. याबरोबर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “शनिवारी मी तुम्हा सर्वांना भेटायला लडाखहून दिल्लीला भेटायला येत आहे. जंतर मंतरवर तुमची भेट घेईन. तथापि, जर उद्या कोणत्याही कारणास्तव तुम्हाला अटक झाली, तर मला एक असे पाऊल उचलण्यास भाग पडेल, जे उचलण्याची माझी इच्छा नाही. जर कुणाचीही अटक झाली तर मी यावेळी सहा आठवड्यांसाठी म्हणजेच ४२ दिवसांसाठी उपोषणावर जाईल. मी देशातील तरुणांसाठी हे करायला तयार आहे, पण प्रश्न असा आहे की तुम्ही काय करणार?”
सोनम वांगचुक यांनी सांगितले की, ‘कॉकरोच जनता पार्टी’शी त्यांची नाळ अगदी अनपेक्षितपणे जोडली गेली. सुरुवातीला त्यांनी या मोहिमेला भारतातील तरुण पिढीची एक ‘सर्जनशील अभिव्यक्ती’ म्हटले होते.
“अल्पावधीतच मी या आंदोलनाशी इतका कसा जोडला गेलो, याचे मलाही आश्चर्य वाटते. पण जेव्हा मी या तरुणांना भेटलो, तेव्हा मला जाणवले की हे अत्यंत साधे, प्रामाणिक, निष्ठावान आणि देशभक्त तरुण आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले असताना कोणत्याही स्वाभिमानी शिक्षणमंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता,” असे वांगचुक यांनी स्पष्ट केले.
Abhijit Dipake: मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके दिल्लीत दाखल
कोणत्याही प्रकारच्या काठ्या, दगड किंवा आक्रमक वस्तू आणू नका
सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होणाऱ्या हजारो तरुणांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही चिथावणीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनात येताना सोबत फक्त एक पाण्याची बाटली, मोबाईल फोन आणि पोलिसांसाठी फुले घेऊन या. कोणत्याही प्रकारच्या काठ्या, दगड किंवा आक्रमक वस्तू सोबत आणू नका. जर आंदोलनात कोणी संशयास्पद वस्तू घेऊन आलेले दिसले, तर लगेच त्याचे लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग करा किंवा फोटो काढून जवळच्या पोलिसांना माहिती द्या. काही समाजकंटक भारताच्या तरुणांचा हा ऐतिहासिक लढा बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सतर्क राहा, असे वांगचूक म्हणाले.
अभिजित दिपकेंचं आवाहन
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक ३० वर्षीय अभिजीत दिपके हे आज सकाळी अमेरिकेहून भारतात परतले. आपले आंदोलन शांततेने आणि प्रेमाने करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिपके म्हणाले, मी भारतात आलो आहे. आपण लवकरच भेटू. आपल्या हातात तिरंगा आणि पुस्तक घेऊन यायला विसरू नका. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना फूल द्या आणि त्यांचे कौतुक करा. आपल्याला ही चळवळ शांततेने आणि प्रेमाने पुढे न्यायची आहे.




