Saturday, June 13, 2026
HomeनगरShrirampur : सोया पेंड आणि मक्याच्या भाववाढीने पोल्ट्री व दुग्ध व्यवसाय संकटात

Shrirampur : सोया पेंड आणि मक्याच्या भाववाढीने पोल्ट्री व दुग्ध व्यवसाय संकटात

पोल्ट्री व पशुखाद्य दर गगनाला || शेतकर्‍यांना शासनाच्या तातडीच्या दिलाशाची अपेक्षा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या दोन ते तीन वर्षांत सोया पेंड आणि मक्याच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे राज्यातील पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसाय अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पशुखाद्य उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख कच्च्या मालांच्या किमतींनी उच्चांक गाठल्याने पोल्ट्री फीड तसेच पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी अंडी उत्पादक, ब्रॉयलर उत्पादक, दुग्ध व्यवसायिक आणि पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisement -

पोल्ट्री उद्योगात खाद्य खर्चाचा वाटा सुमारे 70 टक्क्यांपर्यंत असतो. सोया पेंड आणि मका हे पोल्ट्री फीडचे मुख्य घटक मानले जातात. मात्र, या दोन्ही घटकांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे फीड उत्पादक कंपन्यांनी दरवाढ केली आहे. त्याचा थेट फटका अंडी आणि कुक्कुटपालन व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांना बसत आहे. उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असली तरी बाजारात अंडी आणि चिकनला त्यानुसार दर मिळत नसल्याने अनेक उत्पादक आर्थिक तोट्यात व्यवसाय चालवत आहेत.

दुसरीकडे दुग्ध व्यवसायही याच संकटाचा सामना करीत आहे. गायी-म्हशींसाठी लागणारे संतुलित पशुखाद्य महागल्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च लक्षणीय वाढला आहे. दूधाला मिळणारा दर आणि वाढता उत्पादन खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली असून अनेक दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही भागांत पशुपालकांनी जनावरांची संख्या कमी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत उत्पादनातील चढ-उतार, निर्यात धोरणे, हवामानातील बदल आणि कच्च्या मालाच्या वाढत्या मागणीमुळे सोया पेंड व मक्याचे दर सातत्याने वाढत आहेत. विशेषतः सोयाबीन प्रक्रिया उद्योगातील बदलत्या परिस्थितीमुळे सोया पेंडच्या उपलब्धतेवर परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम पशुखाद्य उद्योगावर होत आहे.

पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. हजारो कुटुंबांचा रोजगार या व्यवसायांवर अवलंबून आहे. मात्र, वाढत्या खर्चामुळे अनेक लघु व मध्यम उत्पादक व्यवसाय बंद करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. काही पोल्ट्री शेतकर्‍यांनी नवीन पक्षी खरेदी टाळली असून अनेकांनी उत्पादन क्षमता कमी केली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पशुखाद्यावरील करसवलत, अनुदान, कर्जावरील व्याजमाफी, विशेष आर्थिक पॅकेज तसेच कच्च्या मालाच्या दरांवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघटना आणि व्यावसायिकांकडून होत आहे.

वेळेत मदत मिळाली नाही तर पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसाय गंभीर संकटात सापडून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोया पेंड आणि मक्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण तसेच पशुखाद्यासाठी विशेष अनुदान मिळाल्यासच पोल्ट्री व दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी मिळू शकते, अशी भावना शेतकरी व व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.

सोया पेंड आणि मक्याच्या दरवाढीचे परिणाम

  • पोल्ट्री फीड आणि पशुखाद्य दरात मोठी वाढ
    – अंडी व चिकन उत्पादनाचा खर्च वाढला
    – दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च गगनाला
    – लघु व मध्यम उत्पादक आर्थिक संकटात
    – अनेक शेतकरी उत्पादन क्षमता कमी करण्याच्या तयारीत
    – ग्रामीण रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता
    – शासनाकडून विशेष आर्थिक मदत व अनुदानाची मागणी
    – तातडीने उपाययोजना न झाल्यास पोल्ट्री व दुग्ध व्यवसायावर अस्तित्वाचे संकट

मागील तीन वर्षापासून सोया पेंड ला उच्चांकी दर भारतीय बाजारपेठेमध्ये मिळाळा आहे. पोल्ट्री व पशुखाद्यामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खाद्याचे चे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याचबरोबर भारतामध्ये पशुखाद्यामध्ये वापरले जाणारे मेडिसिन हे बाहेरच्या देशातून आयात करण्यात येत आहेत, त्याच्यावर पण युद्धामुळे परिणाम झाला आहे. याचा पण परिणामस्वरुप खाद्याच्या दरामध्ये कमालीची वाढ झाली आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
– शिवाजी गायधने, लेअर पोल्ट्री उत्पादक

ताज्या बातम्या

Crime News : शेताच्या बांधावर मुरूम टाकण्यावरुन वाद, कुऱ्हाडीचे वार करुन...

0
श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथील गावडे मळा परिसरात शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि....