नवी दिल्ली | New Delhi
आयसीसीच्या वतीने २०२७ मधील १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वकरंडक (ICC U-19 Women T20 World Cup) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सलग तिसऱ्या जेतेपदासाठी मैदानात उतरणारा भारतीय संघ आपला पहिला सामना आगामी २२ जानेवारी रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध खेळणार आहे. ही स्पर्धा २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान सह-यजमान बांगलादेश आणि नेपाळ येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार असून ४१ सामने चटगाव, सिलहट आणि काठमांडू येथील चार वेगवेगळ्या मैदानांवर खेळवले जातील. गतविजेता भारतीय संघ (Team India) अ गटात असून, त्यांच्यासोबत वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि सह-यजमान नेपाळचा समावेश आहे. भारताने याआधी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत शेफाली वर्माच्या नेतृत्वात आणि २०२५ मध्ये मलेशियन भूमीवर निक्की प्रसादच्या नेतृत्वात विश्वकरंडक उंचावला होता. आता हॅटट्रिक साधण्यासाठी भारतीय तरुण मुली सज्ज झाल्या आहेत.
स्पर्धेची सुरुवात २१ जानेवारी रोजी चार सामन्यांनी होईल. गट टप्प्यातील सामने (Match) २६ जानेवारीपर्यंत चालतील, ज्यानंतर प्रत्येक गटातील शीर्ष तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर ४ फेब्रुवारीला चटगाव येथे उपांत्य सामने खेळवले जातील, तर अंतिम मुकाबला ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या भव्य आयोजनामुळे उदयोन्मुख खेळाडूंना जागतिक स्तरावर चमकण्याची मोठी संधी मिळणार असल्याचे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी म्हटले आहे.



