मुंबई | Mumbai
आयपीएलमध्ये आज (मंगळवारी) कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) आव्हान असणार आहे. हा सामना चेन्नई येथील एम ए चिदंबरम मैदानावर खेळविण्यात येणार आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास सातत्याचा अभाव दिसून आला आहे. कोलकात्याचे कर्णधारपद अजिंक्य रहाणे तर चेन्नई सुपर किंग्जचे ऋतुराज गायकवाडकडे सोपविण्यात आले आहे.
आयपीएलचा (IPL) दुसरा निर्णायक टप्पा १३ एप्रिलपासून सुरू झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी उर्वरित सर्व सामने बाद फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत. आणखी एक पराभव झाल्यास पुढील आव्हान अधिक खडतर होण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये ३२ सामने खेळले गेले असून, चेन्नई सुपर किंग्जने २० तर कोलकाता नाईट रायडर्सने ११ सामन्यात बाजी मारली आहे. तसेच १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. अखेरच्या ५ सामन्यांचा निकाल पाहिल्यास चेन्नई सुपर किंग्ज ने ३ तर कोलकाता नाईट रायडर्स ने २ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे चेन्नई येथील एम ए चिदंबरम मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज ने कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द ८-३ फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
दरम्यान, आयपीएल २०२५ मध्ये चिदंबरम मैदानावर (Chidambaram Ground) खेळविण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्ज संघाला अवघ्या १०३ धावांवर रोखले होते. कोलकाता नाईटने हा सामना ५९ चेंडू शिल्लक ठेवून आणि ८ गडी राखून जिंकला होता. तसेच आयपीएल २०१२ मध्ये कोलकाता आणि चेन्नई सुपर किंग्ज अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या सामन्यात गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द विजय संपादन करून आयपीएल स्पर्धेवर प्रथमच आपले नाव कोरले होते.




