मुंबई | Mumbai
भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीतून सावरू न शकल्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. जसप्रीत बुमराहच्या बदली खेळाडू म्हणून युवा गोलंदाज हर्षित राणाला (Harshit Rana) संधी मिळाली आहे. दि. १२ जानेवारी रोजी इंग्लंड विरूद्धच्या टी २० आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी (ODI Series) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आली होती.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना आपल्या संघात बदल करण्याची दि.११ फेब्रुवारी ही अंतिम मुदत होती. भारतीय संघाने (Team India) जसप्रीत बुमराहसोबत सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) देखील संघातून वगळले आहे. यशस्वी जयस्वालच्या जागी वरूण चक्रवर्तीची निवड करण्यात आली आहे. मात्र यशस्वी जयस्वालला अंतिम १५ मधून वगळण्यात आले असले तरी तो राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असणार आहे.
तसेच मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांना ही राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. शनिवार (दि.१५ फेब्रुवारी) रोजी भारतीय संघ (Team India) युएई मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.त्यानंतर भारताचा सलामी सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरूध्द तर २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि २ मार्च रोजी न्यूझीलंड संघाशी होणार आहे. भारतीय संघाचे हे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ( Dubai International Cricket Stadium) होणार आहेत.
सलिल परांजपे, नाशिक