मुंबई / प्रतिनिधी Mumbai
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला अभ्यासिका आणि वाचनालयासाठी मिळालेल्या इमारतीच्या भाडेपट्टयासाठी द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा नाशिक यांना नाशिक महापालिकेच्या देवळाली येथील देवीचौकातील प्रशासकीय इमारतीतील चार मजल्यांपैकी दुसरा आणि तिसरा मजला अभ्यासिका तसेच वाचनालयासाठी भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. साहित्य परिषद वाचनालय आणि अभ्यासिक हे उपक्रम लोकहितास्तव राबवित असल्याचे नमूद करून या इमारतीच्या भाडेपट्ट्याच्या दस्त नोंदणीसाठी द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याची विनंती परिषदेने केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. त्यानुसार भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.




