Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआता दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र सरकारचा प्रख्यात स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार

- Advertisement -

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र सरकारचा माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार असून राज्यातील दुर्गम भागापर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहचणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करारावर स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी स्वाक्षरी केली. यामुळे स्टारलिंकसोबत औपचारिक भागीदारी करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे.

स्टारलिंक महाराष्ट्राशी भागीदारी करत असल्याने आपण राज्यातील शेवटच्या गावापर्यंत डिजिटल दरी मिटवत आहोत. प्रत्येक शाळा, प्रत्येक आरोग्य केंद्र आणि प्रत्येक गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे. ही भागिदारी ‘फ्युचर-रेडी’ आणि पूर्णपणे जोडलेले महाराष्ट्र घडविण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारतातील पहिले राज्य म्हणून ही भागिदारी सुरू करताना अभिमान वाटत आहे. हे ‘डिजिटल इंडिया’च्या ग्रामीण पातळीवरील आदर्श मॉडेल ठरेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

लोकांना उच्च गतीची इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय असून महाराष्ट्र शासनासोबत या ऐतिहासिक सहकार्याचा भाग होणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. स्टारलिंकचे ध्येय म्हणजे पारंपरिक पायाभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या लोकांना डिजिटल विश्वात सामील करणे हे आहे. महाराष्ट्राचे समावेशक आणि लवचिक डिजिटल विकासाचे धोरण आमच्याशी पूर्णपणे सुसंगत आहे. आपण एकत्र येऊन उपग्रह इंटरनेटद्वारे शिक्षण, आरोग्य सेवा आणि ग्रामीण समुदायांना सक्षम बनविण्याचे उदाहरण घालू, असे स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांनी सांगितले.

या उपक्रमाचा उद्देश राज्यातील समृद्धी महामार्ग, फेरी सेवा, बंदरे, किनारी पोलीस नेटवर्क या पायाभूत सुविधांच्या ठिकाणी उपग्रहाधारित कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे आहे. तसेच शिक्षण आणि टेलिमेडिसिन क्षेत्रातही स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा लाभ देण्याची योजना आहे.यात आदिवासी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आपत्ती नियंत्रण कक्ष, वन चौक्या, किनारी क्षेत्रे, तसेच गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.

प्रायोगिक टप्प्यातील मुख्य उद्दिष्टे :

शासन आणि आदिवासी शाळा, आपले सरकार केंद्रे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपग्रह इंटरनेट जोडणी प्रदान करणे

आपत्ती प्रतिसाद आणि किनारी सुरक्षा व्यवस्थेतील संवाद सुधारणा

शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी उच्च-गती इंटरनेटद्वारे सुविधा उपलब्ध करून देणे

राज्य यंत्रणा आणि स्थानिक समुदायांसाठी प्रशिक्षण तसेच क्षमता-विकास कार्यक्रम राबविणे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...