– संदीप जाधव
स्वतःचे घर असणे हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. जीवनाच्या संघर्षातून, कष्टातून उभारलेल्या घराशी एक वेगळेच बंध तयार झालेले असतात. वास्तूवर आपण जसा जीव लावतो, तसंच ती वास्तूही आपल्याला मोहात पाडत असते. जीवनातील अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या त्या घराशी एक अतूट नाते जडले जाते. आपल्या घरावर दुसर्या कुणाचा हक्क कदापि सहन होत नाही. त्यामुळेच केवळ जिवंतपणीच नव्हे तर मरणानंतरही जणू घराशी असलेला जिव्हाळा सुटत नाही, अशी कथा दर्शविणारे फँटसी प्रकारातील ‘आल्तू-जलाल्तू’ हे नाटक शुक्रवारी (20 नोव्हेंबर) राज्य नाट्य स्पर्धेत पाहायला मिळाले. नाटकाने सभागृहात हास्याचे उंच फवारे उडवले!
कोपरगावच्या संकल्पना फाउंडेशनने सादर केलेले ‘आल्तू जलाल्तू’ हे नाटक डॉ. किरण लद्दे यांनी लिहिले आहे. दिग्दर्शकही तेच आहेत. नाट्य लिखिणात ‘हटके’ विचार करणार्या डॉ. लद्दे यांनी या वेळी सादर केलेल्या फँटसी प्रकारातील या नाटकाने प्रेक्षकांना भरभरून हसवले. कथेला सादर करताना दिग्दर्शकाबरोबरच कलाकारांनी घेतलेली मेहनत फळाला आली. नाटकाने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. कलाकारांच्या अभिनयाचा कस त्यास कारणीभूत असावा. पडदा उघडताच जादुचे प्रयोग पाहावयास मिळतात. जादुगार श्यामसुंदर व सुहानी हे जोडपे विविध प्रयोग करून प्रेक्षकांना रिझवत असतात. त्यांच्या कलाकारीमुळे उत्साही वातावरण निर्मिती होते. मात्र, एका नवा प्रयोग करताना अपघात होऊन सुहानीचा मृत्यू होतो. त्या धक्क्याने श्यामसुंदरही मरण पावतो. रहस्यमय संगीताच्या साथीवर केलेल्या निवेदनावर हे घर शापित झाल्याचे समजते.
जन्म-मृत्ूयच्या फेर्यात अडकलेले हे घर 15 वर्षांनंतरही विकले जात नाही. मग नाटकात इस्टेट एजंट असणार्या कौतुक टोपेची एन्ट्री होते. तो पार्थ-परी या दाम्पत्याला ते घर दाखवतो. घर पाहताना मग सुहानी-श्यामसुंदर यांच्या आत्म्याचे दर्शन घडते. मात्र ते इतरांना दिसत नाही.घर आवडल्याने ते घर घेण्यास तयार होतात, मात्र तेव्हाच फोनवर एका मित्राकडून त्या घराच्या गूढतेबद्दल पार्थला माहिती मिळते. तेव्हा ते घर घेण्याचे रद्द करतात. पण भुताखेतांवर पार्थचा विश्वास नसतो. नवे घर मिळेपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून दोन महिने तेथे राहण्याचे टोपे सूचवतो. पार्थ-परी ते मान्य करतात. मात्र आपल्या घरात कुणी दुसरे राहावे हे सुहानी-श्यामसुंदरला रूचत नाही.
पार्थ-परी घरात प्रत्यक्षात राहायला आल्यावर मग अनेक गमती-जमती घडतात. गेल्या 10 वर्षांपासून घराची देखभाल करणारा बाब्या घरातील चित्रविचित्र घटनांबद्दल जाणून असतो. पार्थ-परी त्या घरात स्थिरावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, घरात घुटमळणारे दोन्ही आत्मे त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. एकदा श्यामसुंदर हा परीच्या अंगात व सुहानी पार्थच्या अंगात संचारते. त्यातून दोघेही घाबरतात. याची कल्पना कौतुक टोपेला समजल्यावर तो घरातील भुताबाधेबद्दल कबुली देतो. मात्र, पार्थचा त्यावर विश्वास नसतो. मग टोपेला एक युक्ती सूचते. घरातील भुतबाधेवर उपाययोजना करण्यासाठी बाबा बक्षी या मांत्रिकाला पाचारण करतो. बाबा येतो. विविध मंत्र म्हणतानाच भुतांना समोर येण्याचे आवाहन करतो. पण श्यामसुंदर व सुहानी कुत्सितपणे त्याची खिल्ली उडवतात. असे मांत्रिक लोक सामान्यांना कसे लुबाडतात, हे अधोरेखित करतात. भेदरलेला बाब्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. या वेळी घडलेल्या विनोदांमुळे प्रेक्षकांत कमालीची खळखळ होते. या प्रसंगात बाबा बक्षीच्या अभिनयाने नाटक आणखी उंचीवर जाऊन पोहोचते. श्यामसुंदर-सुहानी यांचा नैसर्गिक अभिनय भाव खावून जातो.
पुढच्या प्रसंगात श्यामसुंदर-सुहानी अनुक्रमे परी व पार्थच्या अंगात संचार करतात. शरीर त्यांचे असते पण वर्तन त्या आत्म्यांचे असते. हे पाहून बाबा बक्षी स्वतःच घाबरतो आणि तेथून काढता पाय घेतो. अंगातील आत्म्यांचा संचार गेल्यानंतर पार्थ-परीला घरातील विचित्र घटनांची खात्री पटते. त्यांनी आपले घर सोडावे, असे श्यामसुंदर-सुहानी सांगतात. हा आवाज मात्र पार्थ-परीला येतो. पंधरा वर्षांपूर्वी तुमचा मृत्यू होऊनही या घराचा मोह तुम्हाला का सुटत नाही, याबाबत ते विचारणा करतात. मग श्यामसुंदर सांगतो, हे केवळ घर नसून आमचे स्वप्न आहे. याच घरातून संसार सुरू केला. आमच्या यशात घराचा मोठा वाटा आहे. घराशी आमचे अतूट बंध तयार झाले आहे. मूलबाळ नसल्याने या घराचाच आम्ही सांभाळ केला. आमचा सर्व जीव यातच गुंतला आहे. या घराने आम्हाला आत्मिक समाधान दिले, तिथे आम्हाला कुणाचेही वास्तव्य मान्य नाही. हे ऐकून पार्थ-परी भावूक होतात. श्यामसुंदर-सुहानीच्या कलेविषयी असलेले प्रेम व घराशी असलेला जिव्हाळा त्यांना भावतो. जेव्हा आमची आठवण येईल तेव्हा आम्हाला भेटायला या, असं श्यामसुंदर सांगतो आणि पार्थ-परी जायला निघतात आणि नाटकावर पडदा पडतो.
पूर्णपणे विनोदाला वाहिलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अजिबात निराश केले नाही. तशी काळजी लेखक व दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या डॉ. किरण लद्दे यांनी घेतली. त्याला कलाकारांनी कमालीची साथ मिळाली. फँटसी प्रकारातील या नाटकाचे लेखन करून रंगमंचावर बहारदारपणे सादर करण्यात डॉ. लद्दे कमालीचे यशस्वी झाले. तांत्रिक बाजूही भक्कम होत्या. श्यामसुंदर सोलंकी या जादुगाराची भूमिका डॉ. मयूर तिरमखे यांनी साकारली. सुरुवातीलाच त्यांच्या प्रयोगांनी धमाल उडवून दिली. कसदार अभिनय व आत्मविश्वासू संवाद यामुळे त्यांचे पात्र बहरले. हावभावांनीही भरभरून साथ दिली. सुहानीला डॉ. आस्था तिरमखे यांनी उभे केले. सकारात्मक देहबोलीने त्यांनी आपली भूमिका पूर्ण केली. संवादातील काही शब्दांना हिंदीची आलेली लय प्रेक्षकांना जाणवली. त्यांचेही हावभाव उत्तम होते. बाब्या हे पात्र प्रथमेश पिंगळे यांनी रंगमंचावर आणले. त्यांच्या इरसाल संवादांनी आणि भेदरलेल्या हावभावांनी सर्वांत जास्त खसखस पिकविली. त्यांचा अभिनय कसदार वाटला. कौतुक टोपे हे पात्र डॉ. योगेश लाडे यानी वठवले. त्यांचा अभिनय हावभावप्रधान होता. संवादही उत्तम सादर केले. पार्थचे पात्र डॉ. संतोष तिरमखे यांनी केले.
सुहानी अंगात संचारल्यानंतर स्त्रीचे वर्तन त्यांना आणखी खुलवता आले असते. मात्र इतर प्रसंगांत त्यांनी अभिनय साजेसा केला. परी ही भूमिका डॉ. श्रद्धा तिरमखे यांनी भक्कमपणे सांभाळली. घर पाहतानाचा उत्साह, श्यामसुंदर अंगात संचारल्यानंतरचा त्याची हुबेहूब नक्कल विशेष भावली. भेदरलेल्या अभिनयाने ‘षडयंत्र’ या नाटकातील त्यांच्या पात्राची आठवण झाली. बाबा बक्षी या मांत्रिकाचे पात्र प्रा. गजानन पंडित यांनी उत्कृष्टपणे उभे केले. मंत्र म्हणताना व भुतांना आवाहन करताना त्यांचे हावभाव साजेसे होते. सकारात्मक देहबोलीमुळे त्यांचा अभिनय विशेष आवडला. त्यांनी चांगली धमाल उडवून दिली. नरेंद्र मगर व नितीन बगळे यांनीही नाटकात सहायकाच्या भूमिकेत आपला सहभाग नोंदविला.
नेपथ्य गणेश सपकाळ व अमितकुमार कलगुंडे यांचे होते. जुन्या वस्तू, दुमजली घर चांगले सजवले. वरच्या मजल्यावरील खोलीतील दृश्य मात्र सभागृहातील उजव्या बाजूच्या प्रेक्षकांना दिसत नव्हते. प्रकाश योजना डॉ. किरण लद्दे यांची होती. प्रसंगानुरूप स्पॉट त्यांनी कल्पकतेने दिले. दोन प्रसंगांत दरवाजाजवळील पात्रांवर लाईट पडला नाही. पाश्वसंगीत सुमित खरात व रविंद्र वाळके यांनी दिले. नाटकातील गूढता व रहस्यमयता वाढविण्यासाठी त्यांचे संगीत परिणामकारक ठरले. रंगभूषा कल्याणी बनसोडे व डॉ. मयुरी मुंढे यांनी केली. श्यामसुंदर, सुहानी व बाबा बक्षी यांची रंगभूषा उत्तम होती. वेशभूषा मोनिका सपकाळ व डॉ. अस्मिता लाडे यांंची होती. प्रत्येक पात्राला साजेशी वेशभूषा त्यांनी दिली. रंगमंच व्यवस्था डॉ. शैलेंर्द बनसोडे, चेतन गवळी, प्रदीप पाचोरे, प्रवीणकुमार शेलार, निलेश बारहाते यांनी पाहिली.
डॉ. किरण लद्दे यांनी कलाकारांकडून चांगला सराव करून घेतलेला दिसला. हास्याचे उंच फवारे व कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना समाधानी करून गेला. घराविषयी असलेली तळमळ कायम मनात राहते, हा संदेशही या नाटकाने दिला. आतापर्यंतच्या नाटकात सर्वांत जास्त हशा या नाटकाने पिकविला. नाटक पाहून प्रेक्षक समाधानाने घरी गेले.




