संदीप जाधव | अहिल्यानगर
कुटुंंब व्यवस्थेत स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र हीच स्त्री अनेकदा विकृत प्रवृत्तींकडून ओरबाडली जाते. त्याचेच द्योतक म्हणून स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हा मात्र प्रत्येकच गुन्हा नोंदला जात नाही. अनेक अत्याचाराच्या घटना तक्रारीअभावी विरून जातात. वेळीच धीटपणा दाखवून हिमतीने ‘आरे’ला ’कारे’ न म्हणण्याचे स्त्रियांचे मूक वर्तन त्यांनाच घातक ठरते. अत्याचार सहन करणार्या अशा स्त्रियांनी खमकी भूमिका घेऊन कुप्रवृत्तींविरुद्ध लढले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, असा स्पष्ट सामाजिक संदेश देणारं ‘अय’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी (19 नोव्हेंबर) रंगमंचावर पाहायला मिळाले. चांगलेच उमललेले हे नाटक नंतर फुलले आणि प्रेक्षकांना भावलेसुद्धा…
अहिल्यानगरच्या नाट्य मल्हार प्रतिष्ठानने सादर केलेल्या ‘अय’ या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक संदीप दंडवते होते. भळभळणार्या सामाजिक समस्येवर बोट ठेवून केलेले लिखाण कौतुकास्पद. आपल्यावर होणार्या अत्याचाराला, छेडछाडीला स्त्रियांनी धीटपणाने तोंड दिले पाहिजे, कारण अशा वेळी तिचा अबोलपणाच तिच्या अधःपतनाला कारणीभूत ठरतो. त्यासाठी तिने हिमतीने पुढे आले पाहिजे, असे मत ठळकपणे अधोरेखित करणार्या कथेला दिग्दर्शक दंडवते यांनी उत्कृष्टपणे रंगमंचावर सादर केले. नाटकातील मुख्य नायकाची भूमिकाही त्यांनी केली. या नाटकाने प्रेक्षकांना मनमुराद हसवले आणि नंतर रडवलेही. शेवटी टाळ्यांचा मनमुराद प्रतिसादही या नाटकाने मिळविला.
संपूर्ण कथानक वैशाली आणि आनंद या सामान्य स्थिती असणार्या नवविवाहित दाम्पत्याभोवती फिरतं. बोलता येत नसलेल्या वैशालीचा अडखळत बोलणारा पती साधारण 20 वर्षांनी तिच्यापेक्षा ज्येष्ठ. लहान वयात वैशालीवर बेतलेल्या अत्याचाराच्या प्रसंगामुळे ती भयभीत असते. अत्याचाराची घटना समजल्यानंतरही अनाथ असलेला आनंद मुकी असणार्या वैशालीशी विवाह करतो. वैशालीने स्वस्वातंत्र्यावर कुंपण घातलेले. त्यामुळे ती घरातच राहते. पती आनंदची जवळीकही तिला भयग्रस्त वाटते. तशी तक्रार आनंद सासर्यांकडे करतो. त्यांनी समजावून सांगूनही वैशालीत काहीच फरक पडत नाही. चाळीत राहणारे अनेकजण त्यांच्या वयातल्या फरकाबाबत हिणवतात. सुशिक्षित असणार्या हुशार वैशालीला बोलता येत नसले तरी तिला विविध कलागुणांची आवड असते.
शेजारीच राहणार्या छबुची तिच्यावर वाईट नजर. काहीतरी बहाणे करून वैशालीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, पण ती काहीच बोलत नाही. याच दरम्यान सविस्तर हे विनोदी पात्र घरात येते. आपल्या अभिनयाने व संवादांनी हे पात्र नाटकात विनोदांची साखरपेरणी करते. अधूनमधून सरळ स्वभाव असणारा भाजीवाला भैय्या व स्पष्टपणे बोलणार्या डहाळे काकूही वैशालीच्या घरात येऊन आपल्या संवादांनी खसखस पिकवितात.
दरम्यान, आनंद घरात नसताना छबू एकदा वैशालीशी लगट करतो. हतबल झालेली वैशालीमध्ये विरोध करण्याचेही त्राण नसते. ती केवळ रडते. नंतर पती आनंद तिला विरोध करायला सांगतो, हिंमत देतो. बोलता येत नसल्याने ‘अय’ म्हणायचेही शिकवतो. संपूर्ण स्त्री जातच मुकी असल्याचं तिला खडसावतो. स्त्रियांच्या संघर्ष न करण्याच्या वृत्तीवर बोट ठेवतो. खूपकाही सांगूनही वैशालीत हिंमत येत नाही. आनंद निराश होतो. नंतरच्या प्रसंगात माफी मागायला आलेला छबू वैशालीच्या अब्रूवरच हात टाकायचा प्रयत्न करतो. तेव्हा मात्र वैशाली विक्राळ रूप धारण करून विरोध करते. ‘अय’ हे दटावणीचे शब्दही तिच्या तोंडातून बाहेर पडतात. त्यामुळे छबू पळून जातो. यामुळे वैशालीमध्ये एकप्रकारचा आत्मविश्वास येतो. आनंद घरी आल्यानंतर पत्नीचे बदललेले रूप पाहून तो मनोमन सुखावतो. दोघे जवळ येतात आणि एका सकारात्मक शेवटाने नाटक संपते.
पहिल्या प्रसंगापासून नाटकात विनोदांची पेरणी होते. नाटक पूर्णपणे निख्खळ विनोदाला वाहिल्याचा भास होत असतानाच उत्तरार्धात एक सणसणीत संदेश देऊन जाते. त्यामुळे नाटकात गंभीरताही येते. या दोन्ही पैलूंचा समतोल लेखक व दिग्दर्शक संदीप दंडवते यांनी उत्तमरित्या साधला. पात्रांनी उंचीवर नेऊन ठेवलेल्या अभिनयाची चांगली साथ त्यांना मिळाली. नाटकाने प्रेक्षकांना मनोमन हसवले, विचारातही पाडले. प्रत्येक प्रसंग टाळ्या घेत होता. शेवटही दणदणीत झाला.
वैशाली हे मूक पात्र अश्विनी अंचवले-कुलकर्णी यांनी उभे केले. मुकी असूनही कसलेला अभिनय व हावभाव यांच्या जोरावर त्यांनी आपले पात्र मोठ्या आत्मविश्वासाने वठवले. देहबोलीही कमालीची आश्वासक वाटली. डोळ्यातील भाव आणि शारीरिक हालचालींनी अनेक प्रसंगांना चार चाँद लावले. अडखळत बोलणार्या आनंदला संदीप दंडवते यांनी रंगमंचावर आणले. आपल्या बोलण्याची अडखळती लय शेवटपर्यंत टिकून ठेवण्यात त्यांना यश आले. वैशालीला समजून सांगताना आनंदने केलेले संवाद बरेच काही सांगून गेले. दंडवते यांच्या अभिनयाची प्रतिभा प्रत्येक प्रसंगांत दिसली. कधी आनंदी, कधी व्याकूळ तर कधी गंभीर अभिनय त्यांनी चांगल्याप्रकारे केला. नाटकात सर्वांत जास्त विनोद पिकविणारा सविस्तर हरहुन्नरी अभिनेता प्रदीप वाळके यांनी साकारला. बालीश हावभाव आणि मिष्किल संवाद यामुळे अनेक विनोद चांगलेच रंगले. सविस्तरच्या केवळ प्रवेशानेच विनोदाच्या वादळाची जणू चाहूल लागायची. मानेची विशेष लकबही पात्राला शोभली. बालीश असूनही वास्तववादी बोलणारा सविस्तर हे पात्र वाळके यांनी उभे केले.
कावेबाज छबू पवन पोटे यांनी चांगल्याप्रकारे टिकवला. त्यांच्या वाट्याला आलेल्या नकारात्मक पात्रालाही चांगला न्याय देण्याचा प्रयत्न पोटे यांनी केला. वैशालीशी लगट करण्याचा प्रयत्न करताना त्यांचा अभिनय अगदी नैसर्गिक वाटला. डहाळे काकूंची भूमिका प्रिया तेलतुंबडे यांनी केली. जराशा खट्याळ पण स्पष्टवक्त्या असलेले हे पात्र त्यांनी झकासपणे तडीस नेले. अनेकदा त्यांनी प्रेक्षकांना मनापासून हसवले. त्यांच्या पात्राशी मिळत्याजुळत्या व्यक्तीची आठवण प्रेक्षकांना नक्कीच आली असणार! वैशालीचे वडील गणेश लिमकर यांनी घरात आणले. धीरगंभीर संवाद आणि रडण्याचा त्यांचा अभिनय भलताच भाव खावून गेला. परप्रांतीय भैय्या प्रतिक अंदुरे यांनी निभावला. विशिष्ट हिंदी भाषेची लय त्यांनी टिकवून ठेवली. त्यांच्या संवादांनी खूपदा हास्य फुलविले. त्याचबरोबरच घरात न येताही प्राजक्ता दंडवते व पौर्णिमा वाघ यांनी नाटकात सहभाग नोंदविला. सर्वच कलाकारांनी चांगली तयारी केल्याचे जाणवले.
नेपथ्य प्रमोद जगताप यांचे होते. चाळीतील सामान्य घर त्यांनी उत्तम दाखविले. स्वयंपाक घरातील जुनाट गॅस, भांडे, देवघर, जुना पलंग, दरवाजा, खिडक्या वगैरे वस्तू घराला शोभत होत्या. प्रकाश योजना विनोद गरूड यांची होती. अनेक प्रसंगात त्यांचे स्पॉट चांगले होते. वैशाली-आनंदचे तीन प्रसंगातील लाईट्स विशेष भावले. या दोघांच्या आरशाजवळच्या एका प्रसंगावेळी लाईट चुकीचा पडला. संगीत संयोजन समर्थ जोशी, अंतरा वाडेकर यांचे होते. गंभीर प्रसंगांतील संगीत समर्पक वाटले. गायक पवन नाईक यांचे गीतही उत्तम होते. ‘हार फूल लोटांगणी, गुलाल उधळुनी…’ हे गीत अर्थपूर्ण वाटले. रंगभूषेची जबाबदारी आबा सैंदाणे यांच्याकडे होती. वैशाली, काकू आणि सविस्तर यांची रंगभूषा सुसंगत होती. वेशभूषा गौरी देशपांडे यांनी सांभाळली. सामान्य गृहिणी असलेली वैशाली, इरसाल विनोदी सविस्तर, साधारण असलेला आनंद यांची वेशभूषा चांगली वाटली.
कलाकारांकडून दिग्दर्शक दंडवते यांनी चांगलीच तयारी करून घेतली होती. प्रत्येक पात्राची विशेष लकब होती. त्याकडे प्रत्येकाने चांगले लक्ष दिले, भूमिकेत जीव ओतला. नाटकातील वैशाली स्त्रीपात्र वैशिष्ट्यपूर्ण ठरले. आनंद, सविस्तर पात्रांनीही तोडीस तोड अभिनय केला. लटपटून हसवणार्या या नाटकाने अबला स्त्रियांना दिलेला ‘अय’ हा एक चांगला गंभीर संदेश सर्वांनाच आवडला.





