Friday, May 1, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : रहस्यमय, गूढ प्रसंगातून खुनाची उकल करणारी ‘मर्डर मिस्ट्री’...

राज्य नाट्य स्पर्धा : रहस्यमय, गूढ प्रसंगातून खुनाची उकल करणारी ‘मर्डर मिस्ट्री’ ‘दानव’

संदीप जाधव | अहिल्यानगर

गूढ कथा वाचकांना आकर्षिक करतात, त्याचप्रमाणे या धर्तीवरील नाटकंही प्रेक्षकांना आवडतात.उत्सूकता ताणून धरणार्‍या रहस्यमयी प्रसंगांचा कल्पक वापर करून उकल झालेली ‘मर्डर मिस्ट्री’ सोमवारी (1 डिसेंबर) रंगमंचावर पाहायला मिळाली. राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या ‘दानव’ नाटकातील अनेक प्रसंगांनी प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले.

- Advertisement -

श्रीरामपूरच्या तुळजा फाउंडेशनने सादर केलेल्या या नाटकाचे लेखन अतुल साळवे यांनी केले आहे. गूढ प्रसंगांची झालर असलेल्या या कथेला दिग्दर्शक नवनाथ कर्डिले यांनी रंगमंचावर मांडले. कलाकारांचा कसलेला अभिनय व तांत्रिक बाजूंचीही चांगली साथ मिळाल्याने नाटकाने चांगलाच ‘सस्पेन्स’ निर्माण केला. प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. नाटकाची सुरुवात एका जंगलातील पडक्या वास्तूपासून सुरुवात होते. तेथे राहत असलेला महादेव भक्त भैरव दानवाला संपवून महाशक्ती बनण्याचा मनसुबा आखतो. लहानपणापासून त्याला चांडकी या महिलेने सांभाळलेले. हे दोन्ही पात्र भयावह वाटावे असेच. त्याच जागेत अमावस्येच्या रात्री अथर्व-शनाया हे जोडपे तेथे येते. जंगल रस्त्याने जाताना गाडी बंद पडल्याने आश्रय घेण्यासाठी तेथे थांबतात. चांडकीच्या परवानगीने ते सकाळपर्यंत तेथेच राहतात. भैरव-चांडकीच्या विचित्र संवादामुळे ते भेदरतात.

‘दानव’ या शीर्षकावरून व प्रसंगांतील गंभीरतेवरून नाटकाचा विषय भुताडकीचा असावा, असा कयास प्रेक्षक लावतात. मात्र, नंतरच्या प्रसंगांवरून नाटकात थोडी-थोडी स्पष्टता यायला सुरुवात होते. मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या अथर्वने कट कारस्थान करून शनायाला तेथे आणलेले असते. पाशाभाई या मारेकर्‍याला अथर्वने शनायाच्या खुनाची सुपारी दिलेली असते. पाशाभाईचा हस्तक भैरव हा असल्याचे अथर्वला माहीत असते. शनायाच्या खुनासाठी तो पाठपुरावा करत असतो. दुसरीकडे शनाया हीसुद्धा अथर्वला मारण्याचा कट रचते. ते काम चांडकीकडे सोपवते. पहिल्या पतीच्या (मानव) मृत्यूस जबाबदार असल्याची सल शायनाच्या मनात असते. पश्चात्तापाच्या भरात मानवबाबत सांगत असतानाच तेथे अथर्व येतो. मृत आत्म्याला दुसर्‍याच्या अंगात बोलविण्याची विद्या चांडकीकडे असल्याने शनाया प्रभावित होते.

गूढ संवादांमुळे भयभीत करणार्‍या भैरवला शनायाच्या हातून खाली पडलेले लायटर आढळते. ते पेटवले की जणू त्याच्यात मानव संचारतो आणि कधी मराठीत तर कधी इंग्लिशमध्ये संवाद करतो. मनातील विशिष्ट अस्वस्थतेमुळे शनाया-अथर्व दोघेही एकमेकांना संपविण्याचा इरादा बाळगून असतात. वेगवान प्रसंगांनी नाटक पुढे-पुढे सरकत जाते. धुर्त असलेल्या डॉ. अथर्वला चांडकी, भैरव, शनाया यांच्या वर्तणुकीबाबत शंका येते. एका प्रसंगांत चांडाली-भैरवसमोर शनाया व्यक्त होते. अथर्वने मानवला जिन्यातून ढकलल्याने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याचं सांगते. मात्र, शनायाच्या सांगण्यावरूनच हे कृत्य केल्याचे अथर्व सांगतो.

आपले बिंग फुटल्याने व शनाया-चांडाली-भैरव हे तिघे आपल्याविरोधात ठाकले असल्याची खात्री पटल्याने त्यांना मारण्याचा आदेश तेथे आलेल्या पाशाभाईला देतो. मात्र, तो अथर्ववरच बंदूक रोखतो. मोठ्या चपळाईने बंदूक हिसकावतो. त्याचक्षणी चांडालीसुद्धा अथर्ववर बंदूक रोखते. मग सगळा खुलासा ती करते. मी चांडाली नसून इन्स्पेक्टर उषा गायकवाड, पाशाबाई वरिष्ठ अधिकारी नामदेव शिंदे व भैरव पोलिस कर्मचारी असल्याचे ती सांगते. मग भेदरेलेल्या अथर्व-शनायाला ताब्यात घेतले जाते. मानवच्या खुनाचा तपास करणार्‍या या तिघांना आधीपासूनच अथर्व-शनायावर संशय असतो. त्यामुळे त्यांंनी हे नाट्य रचलेले असते. अथर्व-शनायाच्या कबुलीनाम्यानंतर दोघांनाही ताब्यात घेतले जाते. तपासादरम्यान शनायाची सापडलेली डायरी महत्त्वाचा दुवा ठरते. कारण डायरीतील नोंदीवरूनच पोलिस आरोपींना जाळ्यात अडकवतात. खुनाचा उकल होऊन नाटकावर पडदा पडतो.

गंभीर, गूढ प्रसंगांनी भरलेल्या या कथेला दिग्दर्शक नवनाथ कर्डिले यांनी थरारक पद्धतीने सादर केले. प्रेक्षकांना नाटक भावले. काही संदर्भ व्यवस्थित समजले नाही. चांडकी एका प्रसंगात शनायाला वश करतो, तर दुसर्‍या प्रसंगांत अथर्वच्या डोक्यावर केवळ हात ठेवून त्याला बेशुद्ध कसे पाडते हे प्रेक्षकांना उमजले नाही. प्रसंगांत गूढता दर्शविणार्‍या संगीतामुळे व कलाकारांच्या अभिनयातील हावभावांमुळे नाटकातील काही प्रसंग एखाद्या थरारक चित्रपटासारखेच वाटले. नाटक पाहून आबालवृद्ध सारेच खूश झाले. भैरव हे पात्र विनोद वाघमारे यांनी उभे केले. अलंकारीक संवादांना धीरगंभीर हावभावांची जोड मिळाली. लायटर पेटविल्यानंतर मानवच्या रूपातील केलेला अभिनय चांगलाच भाव खावून गेला. अथर्वला आदित्य नगरकर यांनी रंगमंचावर आणले. कटकारस्थानी भाव त्यांनी चांगले केले. अभिनयही छान वाटला.

चांडालीला आकांक्षा गर्जेे यांनी रंगवले. संवादातील योग्य चढउतारामुळे त्यांच्या अभिनयाने प्रसंगांत सकारात्मक देहबोलीच्या साथीने कमालीची गंभीरता आणली. डोळ्यांची लकबही लक्षवेधी होती. शनायाच्या भूमिकेत जया अस्वले रंगमंचावर आल्या. काहिशी गोंधळलेली शनाया शेवटच्या प्रसंगांत पश्चात्तापाने धायमोकलून रडते. हा अभिनय अगदी नैसर्गिक आणि आत्मविश्वासू वाटला. पाशाभाई नवनाथ कर्डिले यांनी वठविला. वाट्याला आलेला पात्र त्यांनी गंभीरपणे पूर्ण केले. अजय घोगरे यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे सहदिग्दर्शक आदित्य नगरकर होते. नेपथ्याची जबाबदारी अशोक कर्णे यांच्याकडे होती. पडकी वास्तू व वडाच्या पारंब्या समर्पक वाटल्या. प्रकाश योजना नवनाथ कर्डिले व अर्जुन तिरमखे यांची होती. विविध प्रसंगांत दिलेले स्पॉट प्रभावी वाटले.

मानवच्या भूमिकेतील भैरव दर्शविताना दिलेले लाल लाईट्स परिणामकारक वाटले. संगीत मयूर वाकचौरे यांनी दिले. प्रसंगांत गूढता व गंभीरता आणणारे योग्य संगीत त्यांनी दिले. रंगभूषा सुनील भावसार यांनी केली. चांडकी, भैरव, पाशाभाई यांची रंगभूषा उत्तम वाटली. चांडकीचे भेदक डोळे, कपाळावरील मोठे कुंकू आणि केशभूषा विशेष भावली. वेशभूषा काजोल गायकवाड यांनी केली. चांडकीच्या गळ्यातील कवड्या, पायात कडे, तसेच भैरवच्या गळ्यातील व मनगटावरील रूद्राक्षाची माळ समर्पक वाटली. अन्य पात्रांचीही वेशभूषा योग्य होती. नाट्यसंयोजन अजय धाकतोडे यांनी केले. रंगमंच व्यवस्था अक्षय खंडागळे, शोएब शेख व सौरभ संकपाळ यांनी पाहिली. उत्सूकता शिगेला पोहोचविणारी व प्रेक्षकांना कसलाही अंदाज येऊ न देणारी रंजक कथा सादर करून दिग्दर्शक नवनाथ कर्डिले यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कलाकारांच्या अभिनयाने नाटक उठावदार झाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना ‘खो’

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा जनगणनेच्या कामासाठी बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने यंदा होणारी जि. प. कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत...