संदीप जाधव
बदलत्या जीवनशैलीने एकत्र कुटुब पद्धतीला केव्हाच हद्दपार केले आहे. प्रामुख्याने शहरी भागात ही स्थिती आहे. करिअर, गरजांची पूर्तता करताना न झेपणारा खर्च, जगण्याच्या नियोजनाचा अतिरेक यामुळे आजच्या तरुण दाम्पत्याला कुटुंबांचा आकार वाढवायचा नाही. स्वातंत्र्याच्या स्वैराचारात गुरफटून गेलेल्या अनेक स्त्रियांना मूल नकोय. ‘डबल इन्कम नो किड्स’ ही संकल्पना उच्च मध्यमवर्गीयांत वाढत आहे. मात्र, असे असले तरी मातृत्व हीच स्त्रीची खरी ओळख आहे. मूलं घरात चैतन्य, आनंद आणतात. या विषयाला हात घालणारी ‘डिंक’ हे वैचारिक नाट्यकृती शुक्रवारी राज्य नाट्य स्पर्धेत पाहायला मिळाली.
अहिल्यानगरच्या होप फौंडेशनने सादर केलेल्या या दोन अंकी नाटकाचे लेखन शैलेश देशमुख यांचे होते. दिग्दर्शकही तेच. याशिवाय नाटकात त्यांनी भूमिकाही केली. या तिन्ही जबाबदार्या सांभाळण्याचा त्यांचा चांगला प्रयत्न होता. श्रेयस आणि सायली हे उच्च मध्यमवर्गीय दाम्पत्य नाटकाचं केंद्रस्थान. दोघंही नोकरी करणारे. आपलं नियोजनबद्ध करिअर घडविण्याला त्यांचं प्राधान्य. ते ‘डिंक’ दाम्पत्य असतं. डिंक म्हणजे डबल इन्कम, नो किड्स. दोघंही कमावती पण मूल नको असा त्याचा अर्थ. दोघांनीही सहमतीने मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण मूल ही जबाबदारी सांभाळताना करिअरकडे दुर्लक्ष होतं असं त्यांचं मत. मात्र, श्रेयसच्या विधवा आईला या दोघांनी घेतलेला निर्णय मान्य नसतो. पाच वर्षे होऊनही घरात बाळ नाही या वास्तवाने तिची घुसमट होते.
श्रेयस व सायलीला कित्येकदा समजावून सांगूनही ते ऐकत नाहीत. शरद व सीमा हे दाम्पत्य त्यांचे स्नेही. मात्र त्यांचे विचार वेगळे. त्यांना मूल हवं असतं. सीमा गर्भवती असते, दरम्यान सायलीच्या घरातील मोलकरीण सुनिता हीसुद्धा गर्भवती असते. या दोघींचा निर्णय सायकलीला चुकीचा वाटतो. शिवाय शेजारच्या काका-काकूंचा एकटेपणा पाहून आपल्याला मूल नाही यात श्रेयस-सायलीचे समाधान असते. मात्र, त्यांनी घेतलेला निर्णय बदलावा यासाठी आई खूप आग्रही असते. मात्र, करिअरमध्ये कमालीची गुरफटलेले हे दाम्पत्य ऐकण्याच मनःस्थितीत नसते. अशातच एके दिवशी सायलीचा जॉब जातो. नोकरी गेल्याने एकटेपणाची जाणीव तिला होते. तो दूर करण्यासाठी ती कुत्रा-मांजर पाळण्याचे ठरवते. नंतरच्या अनेक प्रसंगांनी सायलीचं मनपरिवर्तन होतं.
शेजारचे आईने लावलेल्या झाडाला आलेलं फूल, मोलकरीण सुनिता, मैत्रीण सीमा व शेजारच्या लहानग्या सान्वीचा केलेला एक दिवसाचा सांभाळ या सार्या बाबी सायलीचं मातृत्व जागृत करतं. तिला आई व्हायचं असतं. मात्र श्रेयसला ते मान्य नसतं. मात्र, नंतर त्याचाही निर्णय बदलतो. तो मूल होऊ द्यायला तयार होतो. अशा ‘हॅपी एन्डिंग’ने नाटकाचा शेवट होतो. अर्थात या शेवटच्या प्रसंगाला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सध्याच्या कौटुंबिक समस्येला वाहिलेले हे नाटक प्रेक्षकांना भावले. वेगवान घडामोडी न झाल्याने पहिल्या अंकातील काही प्रसंग रेंगाळल्यासारखे वाटले. मात्र, मध्यांतरानंतर नाटकाने प्रेक्षकांची उत्सूकता ताणली. सकारात्मक शेवटाने चांगल्या टाळ्या घेतल्या. चार वेळा विजेचा खेळखंडोबा होऊनही कलाकारांच्या दमदार अभिनयाची चांगली साथ दिग्दर्शक शैलेश देशमुख यांना मिळाली. मात्र, काही संवादातील आशयाचे झालेले रिपिटेशन लिखाणात टाळता आले असते.
दिग्दर्शनाकडे देशमुख यांनी चांगले लक्ष दिले. श्रेयस हे पात्रही त्यांनीच रंगवले. करिअरला महत्त्व देणारा कर्तबगार पती त्यांनी रंगमंचावर आणला. त्यांच्या धीरगंभीर हावभावांना देहबोलीची चांगली साथ मिळाली. प्रेक्षकांना त्यांचा नैसर्ग्गिक अभिनय आवडला. सायली हे पात्र अमृता बेडेकर यांनी लिलया पेलले. करिअरचा नियोजनबद्ध विचार करताना मूल नकोच या निर्णयावर ठाम असणारी आणि आईच्या अपेक्षांमुळे नाक मुरडणारी सायली त्यांनी उत्कृष्टपणे साकारली. दुःखी, चिंताग्रस्त, गंभीर हावभाव आणि स्पष्ट संवाद यामुळे त्यांचा अभिनय चांगलाच बहरला. एखाद्या टिव्हीवरील मालिकेमधील रागीट सुनेची आठवण त्यांनी काही प्रसंगातून करून दिली. भावनाविवश अवस्थेतेत त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू भाव खावून गेले. सुरुवातीला नकारात्मक वाटत असलेली त्यांची भूमिका उत्तरार्धात मात्र प्रेमळतेकडे वळाली. सर्वांत जास्त संवाद व प्रसंग त्यांच्या वाट्याला आले.
शरद हे पात्र किरण डिडवाणिया यांनी साकारले. आपल्या वाट्याला आलेले संवाद त्यांनी चांगल्याप्रकारे पार नेले. मित्राला समजावताना त्यांचा अभिनय नैसर्गिक वाटला. देहबोलीही सकारात्मक वाटली. डॉ. श्रावणी नवले यांनी सीमा या पात्राला रंगमंचावर आणले. मातृत्वाची ओढ त्यांच्या चेहर्यावर दिसली. जास्त संवाद त्यांच्या वाट्याला आले नसले तरी वाट्याला आलेले संवादासाठी त्यांनी कष्ट घेतल्याचे दिसले. आईची भूमिका मेघमाला पठारे यांनी साकारली. घरात लहान बाळ येण्याची त्यांची इच्छा आणि त्यासाठी सायली-श्रेयस यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी त्यांनी केलेला अभिनय चांगला वाटला. मात्र, त्यांच्या पात्रात आणखी परिपक्वता आली असती तर त्यांचे पात्र आणखी खुलले असते.
सुनिता या मोलकरणीला शर्वरी अवचट यांनी श्रेयस-सायलीच्या घरात आणले. मूलं होणं ही केवळ जबाबदारी नसून स्त्रीत्वाची परिपूर्ती ती मानते. मोलकरणीचे पात्र तिने सहजपणे सांभाळले. आई होण्याच्या चिंतेबरोबरच मातृत्वाचा आनंद तिच्या चेहर्यावर शोभला. काका हे पात्र अभय गोले यांनी पार पाडले. एकटेपणाची जाणीव त्यांनी चांगल्याप्रकारे दर्शवली. संवादात आत्मविश्वास होता. श्रेयसच्या घरात पहिल्या वेळी येताना त्यांनी बेल वाचवली मात्र दार उघडायच्या आतच ते घरात आले! दसर सणावेळी त्यांनी श्रेयस व शरदला सोने दिल्याचे अनेकांना खटकले कारण आपट्याची पाने लहानांनी मोठ्यांना देण्याची प्रथा रूढ आहे. पिटुकल्या सान्वीची भूमिका सई लोंढे हिने केली. चांगले पाठांतर असलेले संवाद तिने धिटाईने सादर केले. तिच्या. अभिनयात लाजरेबुजरेपणा दिसला नाही. सान्वीच्या आईची भूमिका श्रेया सुवर्णपाठकी यांनी केली.
प्रकाश योजना नीरज लिमकर यांची होती. अनेक धीरगंभीर प्रसंगात त्यांनी चांगले लाईट दिले.
दिवाळीच्या एका प्रसंगात आकाशदिव्यातील लाईट लागली नाही. शेवटचा प्रसंगावेळी दिलेला स्पॉट भावला. नेपथ्याची जबाबदारी अंजना मोरे यांनी उत्तमपणे सांभाळली. उच्चभ्रू घरासाठी आवश्यक असणारे स्वयंपाकघर, त्यातील फ्रीज फर्निचर, विविध मूर्ती, गॅलरीतील झाडे या बाबी शोभून दिसल्या. वेशभूषा शीतल देशमुख यांची होती. पात्रांच्या अनेक पोषाखांचा वापर योग्यपणे केला गेला. विशेषतः सायलीच्या कपड्यांनी लक्ष वेधून घेतले. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी केली. सायली व सुनिता यांची रंगभूषा विशेष चांगली होती. संगीत संयोजन आशितोष मेनसे यांनी केले. विविध गितांचा वापर समर्पक वाटला. नाटकासाठी वैशाली गोस्वामी, प्रवीण कुलकर्णी, पी.डी. काका यांनी सहकार्य केले. सूत्रधार मनीश ढाळे होते.
‘आधीच्या स्वातंत्र शेवटी एकटेपणाची चाहूल करून देते’, ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेतला की नंतर पश्चात्ताप करावा लागत नाही’, ‘कसं जगलो यापेक्षा कुणासाठी जगलो यातच जीवनाचं सार आहे’ ही नाटकातील वाक्ये मनाला भावली. मोठ्या शहरात उच्च मध्यमवर्गीयांत फोफावू पाहत असलेल्या ‘डिंक’ या संकल्पनेवर नाटकाने नेमकेपणाने बोट ठेवले. या संकल्पनेचा ‘डोन्ट इंटरफेअर नेचर्स कर्मा’ हा संदेशपर नवा अर्थही नाटकाने सांगितला. करिअरला अवास्तव महत्त्व देण्याच्या नादात मूल होऊ न देण्याचा निर्णय कसा चुकीचा आहे हे या नाटकाने दाखवून दिले. नाटकाच्या सकारात्मक शेवटाला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद दिग्दर्शकाबरोबरच कलाकारांच्या उत्साह वाढवणारा ठरला.




