संदीप जाधव | अहिल्यानगर
प्रत्येकाची जगण्याची लढाई वेगवेगळी असते. मात्र, पोटाची भूक मात्र सर्वांची सारखीच. ही भूक भागविताना सामान्य वर्गातील लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. हाच धागा पकडून गरिबी, महागाई, बेरोजगारी, उपासमारी आदी समस्यांवर बोट ठेवून सादर केलेले ‘गेला बाजार’ हे विनोदी नाटक राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी (27 नोव्हेंबर) पाहायला मिळाले. पूर्णपणे विनोदाला वाहिलेल्या या नाटकाने शेवटी एक गंभीर संदेश दिला. प्रेक्षकांना या नाटकाने मनमुराद हसवले.
घोडेगाव (ता. नेवासा) येथील तारा प्रतिष्ठान व समर्थ युवा प्रतिष्ठान निर्मित घोडेश्वरी सांस्कृतिक कलारंजनने पुरस्कृत केलेल्या या दोन अंकी नाटकाचे लेखन दिलीप जगताप यांनी केले, तर संदीप येळवंडे यांनी त्याचे दिग्दर्शन केले. स्पर्धेत सामाजिक समस्या व गंभीर विषयावर नाटक सादर करणार्या येळवंडे यांनी या वर्षी विनोदी नाटकाची निवड करून वेगळा प्रयत्न केला. विनोदी संवादांना कलाकारांच्या अभिनयामुळे चांगलाच बहर आला. काही प्रसंग वास्तवाला धरून नसले तरी अनेक प्रसंगांनी छोट्या पडद्यावरील ‘हास्य जत्रा’ या मालिकेची आठवण झाली.
कनिष्ठ मध्यमवर्गातील सुमा ही प्रामाणिक अंताची पत्नी. एके दिवशी ‘अपना बाजार’ या दुकानात खरेदीसाठी जाते. तेथे अचानकपणे वाढलेल्या वस्तूंच्या किमतीमुळे लोक आंदोलन करतात. नंतर लूटमार सुरू होते. याचा फायदा घेऊन सुमा बर्याच वस्तू चोरून घरी आणते. ही सारी कहाणी आपली दाक्षिणात्य परप्रांतीय मैत्रीण मालू हिला सांगते. या वेळी सुमा आणि मालू यांचे हावभाव व अभिनय चांगलीच धम्माल उडवून देतात. तितक्यात आपला पती अंता घरी येत असल्याचे पाहून सुमा काही माल पलंगाखाली लपवते, काही माल मालूला देते. मात्र, घाईगडबडीत हा माल मालू कपड्यांत लपवते. त्यामुळे तिचे पोट मोठे दिसते. हे पाहून अंता संभ्रमात पडतो. पण ती गर्भवती असल्याचे सुमा सांगते. लपवाछपवीच्या नादात अनेक विनोद घडतात. बाजारात झालेल्या चोरीचा तपास करण्यासाठी पोलिस येतात, नंतर विशेष टास्क फोर्सही येतो. चोरीचे बिंग समजल्यानंतर कारवाईसाठी आलेल्या पोलिस अधिकार्याला सुमा व मालू भुलवतात. बेशुद्ध पडल्यानंतर त्याचा कपाटात लपवतात.
दुसरीकडे रस्त्यावरून चाललेल्या ट्रकमधून पडलेली दोन पोती अंता व दिनूला सापडतात. इच्छा नसूनही परिस्थितीमुळे घरी नेण्याचे ठरवितात. तितक्यात परिसरातील एका मृत व्यक्तीसाठी आणलेल्या शवपेटीत सापडलेली पोती अंताच्या घरी आणली जातात. पोती पलंगाखाली ठेवून शवपेटी कपाटात ठेवली जाते. घरभाडे थकविल्याने घरमालक नोटीस पाठवतो. घर खाली करण्यासाठी पोलीस येतो. दरम्यानच्या काळात सुमा-मालूच्या चोरीचा भंडाफोड होतो. साधारण अशा आशयाचे विनोदी कथानकात शेवटी अंता नाटकातील दाखविलेल्या गंभीर समस्यांचा ऊहापोह करतो आणि नाटक संपते.
गरिबी, महागाई, बेरोजगारीने पिचलेल्यांना पोटाची भूक सतावते. मात्र, असे असले तरी नव्या उमेदेने प्रत्येकजण जगत असतो. रस्ते, खड्डे, राजकारण्यांचा पोलिसांवर असलेला दबाव, अपुर्या पैशांअभावी होणारी तारांबळ, महिलांच्या समस्या आदी मुद्द्यांना नाटकाने स्पर्श केला. अनेक प्रसंग अनाकलनीय व वास्तववादी नव्हते. मात्र, त्यातील समस्या अनेकांना आपल्याच वाटल्या. विनोदी अभिनयामुळे नाटकाने उंच हास्य तुषार उडवले. कलाकारांच्या अभिनयाकडे दिग्दर्शक संदीप येळवंडे यांनी चांगले लक्ष दिले.
अंता हे पात्र संदीप येळवंडे यांनी साकारले. कायम गंभीर भूमिका सादर करणार्या येळवंडे यांनी प्रथमच विनोदी भूमिका केली. अभिनय चांगला वाटला. काही प्रसंगात त्यांनी चांगलीच खसखस पिकविली. हावभावांकडे त्यांना आणखी लक्ष देता आले असते. त्यांच्या स्पष्ट संवादाला सकाराकात्मक देहबोलीची साथ मिळाली. दिनूची भूमिका आदिनाथ बडे यांनी केली. आपली भूमिका त्यांनी ठिकपणे निभावली. सुमा हे पात्र डॉ. भावना रणशूर-संचेती यांनी उत्कृष्टपणे रंगवले. यंदा त्यांचा अभिनय चांगलाच फुलला. अर्थपूर्ण हावभाव, डोळ्यांची लकब आणि परिपक्व अभिनयाच्या जोरावर सुमाने नाटकात धम्माल उडवून दिली. अभिनयामध्ये त्या कमालीच्या एकरूप झाल्या होत्या. संवादातील दोन-तीन शब्दांत त्या चुकल्या. पण नाटकात सर्वांत लक्षवेधी भूमिका त्यांची होती.
मालू हे पात्र चैताली गोंटे यांनी उभे केले. दाक्षिणात्य लयीतील मराठी संवाद त्यांनी उत्तमपणे फुलवले. अस्सल दाक्षिणात्य वाटावी अशी स्त्री त्यांनी वठवली. वेगवान हालचालीही त्यांनी बिनधास्तपणे केल्या. आपल्या भूमिकेत त्यांनी व्यवस्थित रंग भरले. आवाजातील चढउतारही योग्य वाटले. वृद्धाची भूमिका बहिरनाथ वाघ यांनी पार पाडली. संवाद चांगले, तर अभिनय ठिक वाटला. सुरक्षा अधिकारी डॉ. सुनील वैरागर यांनी रंगमंचावर आणला. त्यांच्या संवादांनी विनोद पेरले. अभिनयही त्यांनी चांगला केला. पोलिस इन्स्पेक्टरच्या रूपात मोहन औटी रंगमंचावर आले. पदाला शोभावी अशी त्यांची शरीरयष्टी होती. पोलिसांची हतबलता त्यांनी संवादातून दर्शविली. याशिवाय पोलिस शिपाई (संतोष इखे), सुरक्षारक्षक (सुनील आल्हाट, प्रदीप बर्डे) व स्मशानदूत (योगेश रासने) यांनी नाटकात काम करण्याची हौस भागवून घेतली.
नेपथ्य अंजना मोरे यांचे होते. चाळीतील जुनाट घराच्या रंग उडालेल्या भिंती, पलंग, भांडे वगैरे वस्तू सामान्य कुटुंबाची स्थिती दर्शवित होत्या. प्रकाश योजना राहुल पवार यांनी व्यवस्थित सांभाळली. संगीत विशाल बोरूडे यांचे होते. पहिल्या अंकात विनोदाच्या पंचेसवर त्यांनी योग्य संगीत दिले. मात्र, नाटकात संगीताचा वापर आणखी झाला असला तर विनोदी प्रसंग आणखी प्रभावी झाले असते. रंगभूषा प्रसाद सैंदाणे यांची होती. सुमा, मालू, अंता यांची रंगभूषा उत्तम होती. मालूचा गजरा व कपाळावरील पांढरा भस्म समर्पक वाटला. सुरक्षा अधिकार्याच्या मिशाही छान पिळदार होत्या. वेशभूषा डॉ. दिव्या पाटील यांची होती. पोलिस इन्स्पेक्टर, सुमा, मालू, सुरक्षारक्षक, वृद्ध यांची रंगभूषा उत्तम होती. रंगमंच व्यवस्था तुकाराम गवळी, प्रवीण आरण, ओंकार आढागळे यांनी पाहिली.
नाटकाच्या पहिल्या अंकात एकही ‘ब्लॅक आऊट’ नव्हता. नाटकाचे सादरीकरण पूर्णपणे विनोदी होते. विनोद सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येक कलाकाराकडे होती. सुमा, मालू यांनी अनेक प्रसंगांत हास्याचे उंच फवारे उडवले. केवळ कल्पनाविलास असणार्या या नाटकाने मात्र, सामान्य माणसांच्या विविध समस्यांना अलगदपणे हात घातला. स्त्री कलाकारांनी उडवलेले हास्य तुषार शेवटपर्यंत खाली आले नव्हते. शेवटच्या प्रसंगातील अंताच्या निवेदनाने विनोदी नाटकातील गंभीरता सांगितली. दिग्दर्शक येळवंडे यांनी यंदा केलेल्या वेगळ्या प्रयोगाने प्रेक्षकांना चांगलेच हसवले. विनोदी नाटकातून रिकाम्या पोटाची गंभीर कैफियत मांडण्याचा प्रयत्न नाटकातून झाला.





