Sunday, August 16, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : सोशल मीडियात गुरफटलेली पिढी व नात्यांतील असंवेदनशीलता यावर...

राज्य नाट्य स्पर्धा : सोशल मीडियात गुरफटलेली पिढी व नात्यांतील असंवेदनशीलता यावर ‘हॅशटॅग’चे बोट

संदीप जाधव | अहिल्यानगर

भारतीय संस्कृतीत कुटुंबसंस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. यातूनच संस्कार आणि संस्कृती पुढील पिढीकडे हस्तांतरित होते. नाते संबंधांत आपुलकी, प्रेम, जिव्हाळा व संवेदनशीलता असावीच लागते. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानातील प्रगतीचा थेट परिणाम या कुटुंब व्यवस्थेवर झाला आहे. मोबाईल, सोशल मीडियामध्ये गुरफटलेली आजची पिढी नातेसंबधांबाबत कमालीची संवेदनशून्य झाल्याचे दिसते. त्याचेच चित्रण राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या ‘हॅशटॅग’ या दोन अंकी नाटकाने दाखविण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

माऊली सभागृहात गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेली राज्य नाट्य स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवरी (2 डिसेंबर) अहिल्यानगरच्या वात्सल्य प्रतिष्ठानने सादर केलेल्या ‘हॅशटॅग’ या नाटकाचे लेखन शुभम घोडके यांनी केले. दिग्दर्शनही त्यांचेच. सोशल मीडियामध्ये तरुणाई कमालीची अ‍ॅक्टीव्ह असते. एखाद्या विषयाला किंवा ट्रेंडला विशिष्ट श्रेणीमध्ये गटबद्ध करणार्‍या ‘हॅश टॅग’चा वापर करून सुखाच्या क्षणांबरोबरच दुःखाचेही प्रसंग अनेकांकडून सोशल मीडियावर टाकले जातात. तांत्रिकतेच्या आहारी गेलेली तरुणाई व नात्यांत ओलावा कायम टिकवून ठेवणारी समंजस वृत्ती अशा दोन्ही परस्परविरोधी मुद्द्यांना स्पर्श नाटकाने केला. काही प्रसंग रेंगाळले. शेवट मात्र सकारात्मक केला.

संपूर्ण कथानक एका कुटुंबातील विविध वृत्तींचे दर्शन घडवते. प्रताप, ईश्वर, विठ्ठल व संकेत या चौघे भाऊ. श्रद्धा ही त्यांची बहीण. नंदा ही प्रतापची, तर स्नेहा ही ईश्वरची पत्नी. निखील हा स्नेहाचा भाऊ. पडदा उघडताच हॉस्पिटलचे दृश्य दिसते. बाळंतपणासाठी स्नेहाला रुग्णालयात दाखल केेलले असते. सोशल मीडियावर भलताच अ‍ॅक्टीव्ह असलेला निखिल छोट्या-मोठ्या प्रसंगांचे हॅशटॅग टाकतो. बाळाच्या स्वागताची वाट पाहतानाच त्याच हॉस्पिटलमध्ये अपघातात गंभीर जखमी झालेल्या ईश्वरला विठ्ठल दाखल करतो. शववाहिनीवर चालक असलेला विठ्ठल नात्यांप्रती संवेदनशील असतो. दरम्यानच्या काळात जमीनीच्या वाटणीचा आग्रह नंदा पतीजवळ धरते. नंतर ईश्वर मरण पावल्याचे समजते. स्नेहाची प्रसूती होऊन मुलगा होतो. निखिल या क्षणाचेही हॅशटॅग करतो. ईश्वर गेल्याचे समजल्यानंतरही त्याच्यात संवेदनशीलता दिसत नाही. ईश्वरचा दहावा तिसर्‍या दिवशीच उरकण्याचे सूचवतो.

एवढेच नाही तर ईश्वरच्या मृत्यूची बातमी व बाळाच्या स्वागताचा संदेश हे दोन्ही एकत्रितपणे सोशल मीडियावर टाकतो. या प्रसंगांवरून नात्यांत आलेला कोरडेपणा दाखविण्याचा प्रयत्न नाटकातून होतो. ईश्वरवर अंत्यंसंस्कार केल्यानंतर सर्वजण घरी येतात. मामा, आत्या यांचाही प्रवेश नाटकात होतो. भावाच्या आठवणींनी श्रद्धा, विठ्ठल, प्रताप व संकेत भावनाविवश होतात. शेजारी राहत असलेला सुजल घरात येऊन संवादांद्वारे अनेकदा हशा पिकवितो. ईश्वरच्या मृत्यूची बातमी सहन न झाल्याने स्नेहा रुग्णालयातच दगावते. तिच्या बाळाला आत्या, मामा आणि विठ्ठल घरी आणतात. मग अशा वेळी संवेदनशील असलेली श्रदधा व संकेत स्नेहाच्या प्रसंगांची स्टोरी सोशल मीडियावर टाकण्याचे निखिलला सूचवतात. दहावाही तिसर्‍या दिवशी करायचे सांगतात. हे ऐकून बहिणीच्या मृत्यूने आधीच दुुःखी झालेला निखिल हतबल होतो.

आपल्या उथळ वृत्तीचा त्याला पश्चात्ताप होतो. सोशल मीडियात वाहवत गेल्याने स्वतःच्याच नजरेत वाईट झालो असल्याची खंत व्यक्त करतो. मानवी संबंधांपेक्षा तंत्रज्ञानाच्या साधनांना दिले जात असलेले अनाठायी महत्त्व श्रद्धा अधोेरेखित करते. मग निखिल ‘आता सोशल मीडियावर कुठलीही स्टोरी न लावता लाईफ स्टोरी जगायची’ असे सांगतो. मग सर्वजण भावूक होतात. काही काळानंतरच्या दाखविलेल्या अंतिम प्रसंगात संकेत लष्करात भरती होतो. निखिल-श्रद्धाचा विवाह होतो. सगळे घरी येतात. आनंद व्यक्त करतात. या आनंदांचा क्षण शेवटी सेल्फीनेच घेतला जातो. आणि नाटक संपते.
सोशल मीडियात गुंतून पडलेल्या पिढीला व ऊठसूठ कुठल्याही प्रसंगांना अवास्तव प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करणार्‍यांना चपराक देण्याचा प्रयत्न नाटकाने केला. अनेक प्रसंग प्रभावी करण्यासाठी दिग्दर्शक घोडके यांनी वास्तव गीतांचा वापर कल्पकतेने केला. गंभीर प्रसंग दर्शवित असताना विनोदी संवादांमुळे हशा पिकतो! त्यामुळे पहिल्या अंकात नाटकाची पकड सैल झाल्याचे दिसले. तसेच दुसर्‍या अंकात रेंगाळलेल्या प्रसंगाने संथता आली. नंतर मात्र सकारात्मक संदेश देण्याचा केलेला प्रयत्न प्रेक्षकांना भावला.

श्रद्धा हे पात्र अनुराधा काकडे हिने साकारले. गंभीर हावभाव व निराशदायक देहबोलीने तिने उत्तम अभिनय केला. संवादातील चढउतारही योग्य वाटले. नंदाची भूमिका हर्षदा वाघमारे हिने केली. वाटणीसाठी पतीकडे आग्रह धरणार्‍या समाजातील महिलांचे प्रतिनिधित्व जणू तिने केले. संकेत हे संवेदनशील पात्र करण खेडकरने उभे केले. त्याने संवादानुरूप हावभाव छानपणे सादर केले. प्रतापचे पात्र समर्थ अरुणे याने केले. वाट्याला आलेली भूमिका त्यांनी पूर्ण केली. विठ्ठलची भूमिका महेश ढवळेने केली. सहृदयी व संयमी भाव दर्शवून त्याने आपल्या पात्राच्या स्वभावाचे दर्शन घडविले. त्याचा अभिनय उठावदार झाला.

नाटकात सर्वांत जास्त विनोद पिकवणारे निखिल हे पात्र सुशांत थोरात याने रंगवले. बेरकी, मिष्कील हावभावांच्या साथीने आपले पात्र त्याने मोठ्या आत्मविश्वासाने वठवले. सुजल हे बालपात्र अ‍ॅरॉन काळोखे याने रंगमंचावर आणले. आपली भूमिका त्याने धीटाईत सहजपणे केली. अनेकदा खसखसही पिकविली. हॉस्पिटलमधील स्वैर, बडबडी डॉली व काळजीवाहू आत्या हे दोन्ही पात्र ऋतुजा नडोणे हिने निभावले. विविध हावभाव दाखविणारे डॉलीचे पात्र जास्त भावले. दिगंबर व मामा ही दुहेरी भूमिका दिग्दर्शक शुभम घोडके यांनी सांभाळली. कसदार अभिनयाला सुसंगत हावभावांची जोड मिळाली. नेपथ्य अंजना मोरे यांचे होते. हॉस्पिटल व घराचे नेपथ्य उत्तम वाटले. प्रकाश योजना कृष्णा वाळके यांची होती. विविध प्रसंगांत दिलेले लाईट्स समर्पक वाटले. अंत्यविधीच्या वेळी आगीची धग दाखविणार्‍या प्रकाश योजनेने प्रसंगांत प्रभावीपणा आणला. याशिवाय शेकोटीही चांगली वाटली.

पार्श्वसंगीत मोनीश ढाळे यांनी दिले. नाटकातील अनेक प्रसंगांत त्यांनी गायिलेली सुमधूर गीते परिणामकारक वाटली. बाजा, तबला व संबळ यांचाही वापर त्यांनी कल्पकतेने केला आणि प्रेक्षकांना आवडलाही. रंगभूषा स्नेहल सोलनकर यांची होती. नंदा, विठ्ठल, आत्या, डॉली यांची रंगभूषा व्यवस्थित वाटली. वेशभूषा तनुजा नरसाळे यांनी यथायोग्य दिली. रंगमंच व्यवस्था तनुजा नरसाळे, विनय सोनवणे, शिवम काळे, महेश खताळ यांनी रंगमंच व्यवस्था पाहिली. सोशल मीडियाच्या अतिवापराने सध्याची तरुणाई भरकटत चालली आहे. त्याचा नात्यावर होत असलेला थेट परिणाम दाखविण्याचा प्रयत्न शुभम घोडके यांनी नाटकातून केला.

ताज्या बातम्या

Nashik News : सुट्टीमुळे सप्तशृंगी गड घाटात वाहतूक कोंडी; भाविक संतप्त

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर | स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीमुळे श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad Ghat) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे गडाकडे जाणाऱ्या घाट...