Friday, May 1, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : ‘त्या’ महिलांची आजही न बदललेली स्थिती…‘जन्मवारी’ने केली उघड

राज्य नाट्य स्पर्धा : ‘त्या’ महिलांची आजही न बदललेली स्थिती…‘जन्मवारी’ने केली उघड

संदीप जाधव | अहिल्यानगर

डॉक्टरच्या मुलाने डॉक्टरच व्हावं आणि शिक्षकाच्या मुलाने शिक्षकच व्हावं अशी सामाजिक धारणा गेल्या काही दशकांत बदलली. मात्र, शरीरविक्रय करणार्‍या महिलांच्या मुलीला मात्र तोच व्यवसाय स्वीकारावा लागतो, मग तिची इच्छा असो किंवा नसो. पौराणिक काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे. या महिलांच्या मुलीने जर कधी वेगळ्या क्षेत्रात जायचे ठरवले तर समाजालाही ते मान्य नसते. हाच धागा पकडून संत कान्होपात्रा यांच्या जीवनातील संदर्भ देत शरीर विक्रय करत असलेल्या एका तरुणीची कहाणी सांगणारी ‘जन्मवारी’ ही दोन अंकी नाट्यकृती राज्य नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (5 डिसेंबर) पाहायला मिळाली. कलाकारांचा सकस अभिनय आणि संदर्भांची योग्य जुळवाजुळव यामुळे नाटक एकदम ‘परफेक्ट’ झाले.

- Advertisement -

राज्य नाट्य स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी अहिल्यानगर येथील युवा फिनिक्स फाउंडेशनने सादर केलेल्या या नाट्याचे लेखन हर्षदा बोरकर यांनी केले आहे. या कथेला दिग्दर्शक संजय लोळगे यांनी रंगमंचावर कल्पकतेने उत्कृष्टपणे उतरवले. शरीर विक्रय करणार्‍या मुलींच्या जीवनातील अडचणी, घुसमट, अवहेलना व कुचंबणा नाटकाने दाखविल्या. प्रसंगांच्या सादरीकरणात कमालीची परिणामकारता असल्याने नाटक प्रभावी झाले. प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

पडदा उघडताच रेल्वे स्टेशनचे दृश्य दिसते. रात्रीच्या वेळची शेवटची गाडी सुटल्याने वृंदा व मंजिरी स्टेशनवर बसतात. अध्यामाची ओढ असलेली सरळ साधी वृंदा. आश्रमात राहून ती स्वच्छतागृह साफ करणे हे तिचे काम. तर मंजिरी ही शरीरविक्रय करणारी तरुणी. चोरट्यांनी पळविलेली वृंदाची पर्स बिनधास्त स्वभावाची मंजिरी चोरट्यांकडून हिसकावते. मंजिरीला आईनेच या व्यवसायात आणलेले असते. कारण तीही याच व्यवसायातील. शिक्षणाची आवड असूनही परिस्थितीने या धंद्यात पडल्याची खंत मंजिरीला सतावते. तारुण्य गेल्यानंतर पुढे काय, या प्रश्नावर मात्र ती निरूत्तर होते. हाच संदर्भ जोडत कान्होपात्राच्या जीवनातील प्रसंग सादर होतो. कान्होपात्राची आई रंगमहालात नाच-गाणे करून ग्राहकांना शारीरिक-मानसिकरित्या रिझवत असते. आपल्या मुलीनेही हेच काम करावे अशी तिची इच्छा. मात्र श्रीहरीच्या भक्तीत तल्लीन असलेली कान्होपात्राला हे रूचत नाही.

एखाद्या श्रीमंत पुरूषासमोर देखण्या कान्होपात्राला सादर करून त्याची राणी बनविण्याचा श्यामाचा मनसुबा असतो. त्यासाठी तिला तयार करण्याची जबाबदारी श्यामा आपल्या विठा या सेविकेवर सोपवते. कान्होपात्रा मात्र केवळ श्रीहरीच्याच भक्तीत रमते. एके दिवशी आषाढी वारीबाबत कान्होपात्रा विठाला विचारते. विठ्ठलाच्या वारीबाबत उत्सुकता वाढल्याने वारीत जाण्याची परवानगी आईकडून घेते. वारीत गेल्यानंतर विठ्ठलभक्तीत रसमय झालेल्या कान्होपात्राला मंदिरात मात्र प्रवेश नाकारला जातो. वेश्या व्यवसाय करणार्‍यांना प्रवेश नसल्याचे पुजारी सांगतो. मी गणिका नाही, माझी आई आहे असं समजावण्याचा प्रयत्न करूनही कान्होपात्राच्या पदरी निराशाच येते. मग मंदिराच्या बाहेरील परिसरात विविध अभंग सादर करून आपली सेवा ती सादर करते.

तिकडे रेल्वे स्टेशनच्या प्रसंगात वृंदा विविध संवादातून मंजिरीचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करते. त्याचा सकारात्मक परिणाम मंजिरीवर होतो. सकाळ झाल्याने दोघींचीही गाडी येते. मात्र, ती गाडी सोडून मंजिरी वृंदासोबत जाते. तिकडे पंढरपुरात मधूर आवाजातील अभंग आणि भक्तीमयता यामुळे कान्होपात्रा लोकप्रिय होते. आईने तिचा सौदा केल्याने एके दिवशी तिला घ्यायला बिदरच्या बादशहाचे सैनिक येतात. मात्र, विठ्ठलाचे एकदा दर्शन घेऊ द्या अशी विनवणी करत मंदिरात जाते आणि अंतर्धान पावते. वेश्या व्यवसाय सोडून आश्रमाकडे जाणारी मंजिरी व विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालेली कान्होपात्रा या दोघींची प्रतिकात्मक स्थिती शेवटच्या प्रसंगाने अधोरेखित केली. नाटकाच्या या शेवटच्या प्रसंगाने प्रेक्षकही जणू मंत्रमुग्ध झाले होते. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने या दोन अंकी प्रयोगाचे स्वागत केले.

कायमच तुच्छ व वखवखल्या नजरेचा सामना करावा लागत असलेल्या वेश्या व्यवसायातील महिलांच्या मुलींनाही याच व्यवसायात का उतरावे लागते, असा प्रश्न नाटकाने विचारला. पुराण काळापासून अशा महिलांची होत असलेली कुचंबणा दर्शविण्यासाठी कान्होपात्राच्या चरित्रातील प्रसंगांचा प्रभावीपणे वापर करण्यात दिग्दर्शक लोळगे यशस्वी झाले. प्रत्येक पात्राकडे आणि बारीकसारीक बाबींकडे त्यांनी चांगले लक्ष दिले होते. वृंदा हे पात्र आरती अकोलकर यांनी साकारले. शांत, संयमी अभिनयातून त्यांनी आपले पात्र उठावदार केले. चेहर्‍यावरील भावही समर्पक वाटले. मंजिरीला समजावता केलेले संवाद उत्तम वाटले. मंजिरी हे पात्र सायली वल्ली यांनी रंगवले. वेश्या व्यवसाय करणार्‍या तरुणीला विशिष्ट अंकविक्षेप व वेगवान हालचालींच्या साह्याने त्यांनी बिनधास्तपणे सादर केले. डोळ्यांची लकबही चांगली. गाणं म्हणताना मंजिरीने प्रेक्षकांच्या भरभरून टाळ्या घेतल्या. हे पात्र नाटकात सर्वांत लक्षवेधी ठरले.

कान्होपात्रा ही भूमिका सिद्धी कुलकर्णी यांनी अगदी भावूकतेने वठवली. श्रीहरीच्या भक्तीत मग्न झाल्याचा अभिनय अगदी नैसर्गिक वाटला. देहबोली कमालीची सकारात्मक होती. स्पष्ट संवाद आणि अभिनयाला साजेरे हावभाव असल्याने त्यांचा अभिनय चांगलाच भाव खाऊन गेला. विठाच्या भूमिकेत अमृता देवडे आल्या. आवाजातील चढउतार त्यांना चांगले जमले. अभिनयही चांगला वाटला. श्यामा हे पात्र डॉ. वर्षा मगर यांनी केले. सरदाराशी केलेल्या संवादावेळी एक वेगळाच बाज त्यांच्या चेहर्‍यावर होता. देहबोलीचीही चांगली साथ त्यांच्या अभिनयाला मिळाली. पुजार्‍याच्या वेशात रंगमंचावर आलेल्या क्षितीज कंठाळे यांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. गणिकेला प्रवेश करतानाचा कर्मठपणा व नंतर कान्होपात्राच्या अभंगांत एकरूप झालेला प्रेमळ भाव त्यांनी उत्तमपणे दर्शविला. चोरांची भूमिका वसी खान व अभिनय गायकवाड यांनी हुबेहूब साकारली. खरोखरचे चोर वाटावे असा त्यांचा अभिनय होता.

नृत्यांगनांच्या पात्रात ऋतुजा लिमये व प्राप्ती अनमल यांनी यशायोग्य नृत्य केले. शिलेदारांना अथर्व वाघ व सार्थक बोरकर यांनी छानपैकी सादर केले. याशिवाय महीर कुलकर्णी, ओंकार वल्ली, समशे़र खान (सरदार) व प्रथमेश (वारकरी) यांनीही आपली भूमिका पार पाडली. नेपथ्य नाना मोरे यांचे होते. रेल्वे स्टेशन व विठ्ठल मंदिर योग्य वाटले. प्रकाश योजना पवन पोटे यांनी सांभाळली. मंजिरी व कान्होपात्रांच्या संवादावेळी दिलेले लाईट्स चांगले होते. शेवटच्या प्रसंगात पार्श्वभूमीवर असलेली विठ्ठलाची प्रतिमा चांगलीच उठावदार दिसली. संगीत संयोजन पवन नाईक यांनी उत्तमरित्या केले. पार्श्वसंगीत शैलेश देशमुख, सचिन शिंगटे यांनी प्रसंगानुरूप दिल्याने प्रसंग प्रभावीपणे झाले. रंगभूषा सोहम सैंदाणे, वसी खान यांच्याकडे होती. मंजिरी, वृंदा, कान्होपात्रा, नर्तिका यांची रंगभूषा उत्तम वाटली. वेशभूषा भाग्यश्री जोशी, श्रावणी एडके यांची होती. मंजिरीचा ‘बिनधास्त’ पेहराव व कान्होपात्राचा शालीन पोशाख समर्पक होता. याशिवाय वृंदा, पुजारी, वारकरी, नर्तिका, सरदार यांची वेशभूषा यथायोग्य होती. नृत्यदिग्दर्शन नंदिनी स्वामी व पार्श्वगायन अनुजा कुलकर्णी यांचे होते. त्यांच्या आवातील गीत मधाळ होते.

शरीर विक्रय करणार्‍या वेश्यांच्या मुलींची पौराणिक काळापसून होत असलेली घुसमट आजही संपलेली नाही. जन्मानेच जणू शापितपणा घेऊन आलेल्या दोन वेगवेगळ्या स्थित्यंतरातील दोन महिलांची प्रतिकात्मक ‘जन्मवारी’ नाटकाने उत्कृष्टपणे दाखविली. सादरीकरणासाठी भक्कम असावी लागणारी संहिता मिळाल्याने व कलाकारांच्या दमदार अभिनयाने सादर केलेली दिग्दर्शक लोळगे यांची ही कलाकृती प्रेक्षकांना चांगलीच भावली. स्पर्धेतील या शेवटच्या प्रयोगाने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचवली, हे मात्र नक्की!

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना ‘खो’

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा जनगणनेच्या कामासाठी बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने यंदा होणारी जि. प. कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत...