Wednesday, January 15, 2025
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : ‘कधी आंबट कधी गोड’

राज्य नाट्य स्पर्धा : ‘कधी आंबट कधी गोड’

संदीप जाधव | 9225320946

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो हे प्रत्येकाला मान्य. मात्र याचे कारण अनेकांना माहीतच नसते. आपली महत्त्वाकांक्षा, स्वप्न, ध्येय यांना मुरड घालून कुटुंबासाठी झिजणार्‍या या स्त्रीचं मन अनेकदा दुर्लक्षिलं जातं. तिची धडपड, तळमळ जेव्हा घरातील पुरुषाला उमगते तेव्हा त्या स्त्रीला आकाश ठेंगणं होऊन जातं. जीवनात सर्व दिवस सारखे नसतात. ते आंब्याप्रमाणे असतात. संघर्षमय आयुष्यात आंबटपणानंतर गोडवा हा येतच असतो. हाच मुद्दा ठळकपणे मांडणारे ‘कधी आंबट व कधी गोड’ हे नाटक शनिवारी राज्य नाट्य स्पर्धेत पाहायला मिळाले. कोपरगावच्या संकल्पना फाउंडेशनने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक डॉ. किरण लद्दे आहेत. नाट्यशास्त्रात पी.एचडी मिळविणारे डॉ. लद्दे रहस्यमय नाटकांच्या लेखनासाठी परिचित आहेत. मात्र, या वेळी स्पर्धेत त्यांनी सहज-साध्या संहितेला विनोदाची भरभरून फोडणी दिली. लेखन, दिग्दर्शनाबरोबरच नाटकात पात्र वठवून तिहेरी भूमिका पार पाडली. कलाकारांनी फोडलेल्या विनोदांच्या फटाक्यांचा आवाज अनेकदा सभागृहात घुमला! काही चुका, उणिवाही जाणवल्या. पण नाटकाने रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले.

- Advertisement -

ओमकार हा बँकेतील नोकरीच्या निमित्ताने गावाकडून पुण्यात स्थायिक झालेला. पत्नी कल्पना, कामधंदा न करता अभिनेता होण्याचे स्वप्न बाळगून असलेला मेव्हणा विनोद आणि सासू यशोदा असे हे कुटुंबातील चार सदस्य. लग्नाला पाच वर्षे उलटूनही ओमकार-कल्पना यांना मूलबाळ नसते. याची खंत ओमकारला असते. मात्र, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न साकार केल्याशिवाय बाळाचा विचार करायचा नाही हा कल्पनाचा निर्धार. यापूर्वीही तिने अनेकदा तिने अनेकदा प्रयत्नही केले, पण त्यात यश आले नाही. यावेळी मात्र तिला चटणी-मसाले यांचा व्यवसाय करून उद्योजिका व्हायचे असते. त्यासाठी तिला भाऊ आणि आईचा पाठिंबा असतो. मात्र, पती ओमकारचा साफ नकार असतो. त्याला बाळ हवे असते. पत्नीला हे कसे पटवून द्यायचे यासाठी ओमकार मित्राचा सल्ला घेतो. त्यांच्या चर्चेतून आधी मेव्हणा विनोद व सासू यशोदा यांना आपल्या बाजूने वळविण्याचे ठरविले जाते.

विनोदला कसेबसे पटविल्यानंतर सासू यशोदाचीही समजूत घालण्याचा प्रयत्न ओमकार करतो. ओमकारची आक्रमक संवाद ऐकल्यानंतर कल्पना उद्विग्न होते. स्वतःची होणारी घुसमट बोलून दाखविते. ते ऐकून मतपरिवर्तन झालेला ओमकार भाावनाविवश होतो. मग तो पत्नीच्या नव्या व्यवसायाला मदत करतो. दरम्यानच्या काळात कल्पना जुळ्यांना जन्म देते आणि ‘यशोदा मसाले’ हा त्यांचा व्यवसायही जोमाने उभा राहतो. त्याचा ब्रॅड अ‍ॅम्बेसिडर विनोद बनतो. सकारात्मक प्रसंगाने नाटकाचा शेवट होतो. प्रगल्भ नाट्यलेखन करणार्‍या डॉ. लद्दे यांचे हे नाटक त्या तुलनेत साधारण होते. त्यांनी स्पर्धेत प्रथमच विनोदी नाट्य सादर केले. त्यांच्या संहितेला कलाकारांच्या अभिनयाची चांगली साथ मिळाली. ध्येयपूर्तीची स्वप्ने बाजूला ठेवून स्त्रियांची होणारी घुसमट प्रातिनिधीक स्वरूपात या नाटकात दाखविण्यात आली. तसेच आंब्याची चव कालांतराने बदलते तसेच जीवनात अनेक आंबट प्रसंग येतात, त्यानंतरचा गोडवाही अटळच. हा साधा विषय विनोदी रूपात मांडणारे हे नाटक उत्तरार्धात गंभीरतेकडे जाते.

ओमकार ही मध्यवर्ती भूमिका डॉ. मयूर तिरमखे यांनी बिनदिक्कत वठवली. त्यांच्या अभिनयात स्पष्ट संवाद आणि हावभाव यांनी मोलाची भागीदारी दिसली. एका संवादातला ते अडखळले. मात्र पूर्ण नाटकात त्यांचीच छाप दिसली. त्यांची देहबोली अगदी सकारात्मक होती. कल्पनाचे पात्र डॉ. श्रद्धा तिरमखे यांनी रंगमंचावर आणले. स्त्रीची होणारी घुसमट, तळमळ, धडपड त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवली. त्यांचा अभिनय नैसर्गिक वाटला. भावनाविवशता त्यांना छान जमली. अनेक वर्षांनंतर नाट्यक्षेत्रात कमबॅक केलेल्या कल्याणी बनसोडे यांनी यशोदा हे पात्र साकारले. त्यांनीही मिश्किल हावभावांच्या आधारे बर्‍यापैकी अभिनय केला. विनोद हे विनोदी पात्र प्रथमेश पिंगळे यांनी निभावले. अनेक विनोदी प्रसंग फुलविण्यात ते कारणीभूत ठरले. दिग्दर्शक डॉ. लद्दे यांनी नाटकात सूत्रधाराची भूमिका बजावत ओमकारच्या मित्राचेही पात्र साकारले. त्यांच्या परिपक्व अभिनयाची झलकही प्रेक्षकांनी अनुभवली.

नाट्यशिर्षकगीत महेश धर्माधिकारी यांचे होते. अनेक विशेष प्रसंगांनंतर ही धून वाजविण्यात आली. मध्यमवर्गीय घराचे नेपथ्य चेतन गवळी व अमित तिरमखे यांनी केले. सर्व संवाद घरातीलच असल्याने नेपथ्याला जास्त वाव नव्हता. पार्श्वसंगीत सुमित खरात यांचे होते. अनेक प्रसंगांना विनोदी संगीताची जोड मिळाली. मात्र, अनेकदा मोठा आवाज खटकला. प्रकाश योजना गणेश सपकाळ यांची होती. विविध प्रसंगांमध्ये योग्य स्पॉट त्यांनी दिले. प्रकाश योजनेसाठी त्यांनी चांगली मेहनत घेतल्याचे दिसले. रंगभूषा मोनिका सपकाळ यांची होती. कल्पना व ओमकार यांची वेशभूषा योग्य वाटली. वेशभूषा डॉ. आस्था तिरमखे व स्नेहल लद्दे यांनी सांभाळली. सूत्रधार व ओमकार यांच्या वेशभूषेत कमालीची विविधता जाणवली. रंगमंच व्यवस्था नरेंद्र मगर, प्रा. गजानन पंडित, प्रवीण शेलार, निलेश बारहाते, डॉ. संतोष तिरमखे यांनी पाहिली.

बर्‍यापैकी गर्दी खेचणार्‍या या नाटकाला कलाकारांची चांगली साथ मिळाली. नाट्यसंहितेत नवीन काहीच नव्हते. मात्र, विनोदांनी चांगल्या टाळ्या घेतल्या. दोन-तीन पात्रांच्या तोंडी आलेला ‘उद्योगपती’ हा शब्द खटकला. तिथे उद्योजिका हा शब्द सयुक्तिक होता. डॉ. लद्दे यांनी सादर केलेल्या यांच्या या नाटकात डॉ. मयूर तिरमखे यांची भूमिका लक्षवेधी ठरली. दिग्दर्शनाबरोबरच कालाकारांच्या भूमिकेवर दिग्दर्शकाने चांगली मेहनत घेतली. मात्र, या नाटकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि टाळ्याही घेतल्या…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या