Thursday, June 4, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : जुन्याशी नाळ जोडणारं ‘मॉडरन फामिली’

राज्य नाट्य स्पर्धा : जुन्याशी नाळ जोडणारं ‘मॉडरन फामिली’

  • संदीप जाधव

विज्ञानाच्या प्रगतीमुळे जीवनचक्रच बदलून गेले आहे. धावपळीच्या आजच्या युगात प्रत्येकजण जगण्याच्या स्पर्धेत मश्गूल झाला आहे. तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि अनुकरणाची सवय यामुळे मध्यमवर्गीय गुरफटून गेले आहेत. आधुनिकतेच्या हव्यासापोटी जुन्या आठवणी, भावना कवडीमोल होत आहेत. जमाना मॉडर्न झाला असला तरी मायेचा जिव्हाळा टिकवून ठेवला पाहिजे. नव्याचा स्वीकार नक्कीच करा पण त्यासाठी जुन्या आठवणींशी असलेले नाळ तोडू नका, असा संदेश देणारं ‘मॉडरन फामिली’ हे कौटुंबिक नाटक राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सादर झालं.

चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला काल (बुधवारी) नगरच्या माऊली सांस्कृतिक सभागृहात थाटात प्रारंभ झाला. अहमदनगर फिल्म फाउंडेशनने सादर केलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन विपुल महापुरूष यांनी केले. पहिल्याच दिवशी सभागृहात रसिकांची गर्दी झाल्याचे दिसले. संपूर्ण नाटक पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेल्या सदानंद परचुरे यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरतं. सामान्य गृहिणी असलेली सुधा ही सदानंद यांची पत्नी, तर शुभेच्छा (शुबू) व अभिनंदन (गुड्डू) ही त्यांची मुले. शुबू कॉलेजची विद्यार्थिनी, तर गुड्डू एकांकिका करणारा नाट्य कलाकार. परमानंद (पमा काका) हा सदानंद यांचा बिनालग्नाचा चुलतभाऊ. असे हे मध्यमवर्गीय कुटुंब एका जुन्या वाड्यात गुण्या गोविंदाने राहत असतात.
आधुनिकतेची कास धरण्याच्या विचाराने कुटुंबातील काही सदस्यांच्या मनात जुना वाडा पाडून त्याजागी आलीशान बंगला बांधण्याची कल्पना येते.

- Advertisement -

मात्र, त्यास सदानंद यांचा ठाम विरोध असतो. पण त्याला न जुमानता नवीन बंगला बांधण्याचे ठरवले जाते. त्यासाठी पमाकाका रोहित नावाच्या एका बिल्डरला बोलावतो. मात्र, तो सदानंद यांना अपमानित करतो. त्याच्या बंडू घातके या बिल्डरला बोलावले जाते. सर्वांच्या आग्रहाखातर सदानंद अ‍ॅग्रीमेंटवर सही करतात, मात्र त्यांना लहानपणीच्या आई-वडिलांच्या आठवणी हतबल करतात. हे पाहून इतर सदस्यांनाही त्यांच्या भावनांची जाणीव होते. प्रत्येक सदस्य त्या जुन्या वाड्याच्या आठवणी बोलून दाखवतो. सर्वजण भावूक होऊन वाडा न पाडण्याचा निर्णय घेतात. जुना वाडा तसाच ठेवून नवीन जागेत बंगला बांधण्याचे ठरते. या आनंदी निर्णयाच्या प्रसंगाने नाटकाचा पडदा पडतो.

नाटकात सुधाची बहीण संगीता व तिचे पती बाबूराव यांचीही एका प्रसंगात एन्ट्री होते. तसेच बोबड्या हे विनोदी पात्रही नाटकात खसखस पिकवते. नव्याची कास जरूर धरा मात्र, त्यासाठी आठवणी, इतिहास, भावना यांच्याशी नाळ तोडू नका असा स्पष्ट संदेश या नाटकाने अधोरेखित केला. दमदार लिखाण करून त्याचे उत्तमरित्या दिग्दर्शन करण्याची जबाबदारी विपुल महापुरूष यांनी पार पाडली. एकत्र कुटुंब, घरातील स्त्रियांचा मानसन्मान, जिव्हाळा या बाबींचे जीवनात असणारे महत्त्वही या नाटकाने सांगितले. अनेक प्रसंगांनी टाळ्या घेतल्या.

नेपथ्याची जबाबदारी अनंत रिसे यांनी उत्कृष्टपणे सांभाळली. जुनाट भिंतीवरील देवघर, लाकडी खुर्ची, सोफा, पलंग, रेडिओ आदी वस्तूंमुळे जुना वाड्याचे हुुबेहूब दर्शन झाले. प्रकाश योजना भारती लिमकर यांची होती. अनेक प्रसंगांत त्यांनी दिलेली प्रकाश योजना सुसंगत ठरली. नृत्याच्या प्रसंगांत रंगीत लाईट भावले. मात्र, सदानंद वाड्याच्या आठवणी सांगतात, तेव्हा मात्र दोन वेळी लाईट चुकले. प्रसंगात वेगवान हालचाली असल्याने कदाचित त्यांच्याकडून गफलत झाली असावी.
सदानंद परचुरे यांची भूमिका श्रेणिक शिंगवी यांनी साकारली. त्यांच्या कसदार अभिनयाने मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखाला रंगमंचावर आणले. काही प्रसंगांत त्यांच्या हावभावांनी चांगलाच हशा पिकविला. भावनिक प्रसंगही त्यांनी चांगला फुलविला.
सुधा परचुरे यांची भूमिका उज्वल कुलकर्णी यांनी केली. प्रेमळ गृहिणी साकारताना मॉडर्न लूकही त्यांनी चांगला दिला. मात्र, भाषेची लय त्यांना राखता आली नाही. काही प्रसंगात त्यांचे संवाद गावरान भाषेचे, तर काही वेळेस एकदम शुद्ध असे होते.

परमानंद परचुरे (पमा काका) ही भूमिका संकेत शहा यांनी आत्मविश्वासाने उभी केली. परिपक्व हावभाव आणि वेगवान हालचाली त्यांच्या छान जमल्या. अभिनंदनची भूमिका ऋषिकेश मोरे याने पार पाडली. अनेक प्रसंगांत त्यांच्या अभिनयात परिपक्वता दिसली. शुभेच्छा हे पात्र अद्वैता सुद्रिकने केले. तिनेही चांगला अभिनय केला. तिने केलेले नृत्य इतरांपेक्षा सरस वाटले. संगीता मावशीची भूमिका चिन्मयी खताळ यांनी केली, तर बाबूराव भाऊजी व बंडू घातके ही दोही पात्रे अक्षय म्हस्के यांनी उभी केली. बाबूराव या पात्राचा अभिनय नैसर्गिक वाटला नाही, मात्र बंडू घातके त्यांनी चांगल्या प्रकारे रंगमंचावर टिकवून ठेवला. रोहित बिल्डरच्या भूमिकेत आलेल्या तेजस आंधळे यांनी वाड्यात शूज घालून एन्ट्री केली! त्यांच्या अभिनयाला हावभावांची चांगली जोड होती. बबलू हे पात्र सोहम सब्बन याने केले. अनेक विनोद त्याने केले. एका प्रसंगात तो वाड्यातच डायरी विसरून गेला, अर्थात ती चूक सावरण्याचा प्रयत्न नंतरच्या प्रसंगात झाला. सर्वांत जास्त विनोदांना कारणीभूत असणारा बोबड्या अजय घंगाळे याने उत्तमरित्या उभा केला.

पार्श्वसंगीत आविष्कार ठाकूर यांचे होते. प्रसंग प्रभावी करण्यासाठी त्यांनी गीतांचा वापर चांगल्याप्रकारे केला. भावनिक प्रसंगही रंगले. पहिल्या अंकाच्या शेवटी बंडू घातकेच्या एन्ट्रीच्या वेळी एखादे दणदणीत संगीत देता आले असते. दिग्दर्शक विपुल महापुरूष यांनी नाटकात ओरिजिनल ट्रॅक दिले, गीतकार व संगीतकाराची अष्टपैलू भूमिकाही त्यांनी चांगली पार पडली. रंगभूषा आबा सैंदाने यांची होती. सुधाचे मॉडर्न रूप छान वाटले. वेशभूषा भक्ती आणि ग्रीष्मा महापुरूष यांच्याकडे होती. एका प्रसंगात सुधाचा गाऊन आखूड झाल्याने खाली दिसत अससललेली साडी सर्वांचच नजरेला खटकली. नृत्य दिग्दर्शन सागर अलचेट्टी यांनी केले. दोन वेळा कलाकारांनी केलेल्या नृत्याने धमाल उडवून दिली. जग कितीही आधुनिक झालं तरी प्रत्येकाने बदलाच्या हव्यासापोटी जुन्या आठवणींची, भावनांची, नाते-संबंधांची नाळ तोडू नये, असा सकारात्मक संदेश या नाटकातून मिळाला. पहिल्याच नाटकाने स्पर्धेस चांगली सुरुवात झाली. भरगच्च सभागृहातून भरपूर टाळ्या या नाटकाने मिळविल्या.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत सोयाबीन व डाळिंबाला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी सोयाबीनला सर्वाधिक 7001 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 6 क्विंटल आवक झाली....