संदीप जाधव | अहिल्यानगर
व्यक्ती तितक्या वल्ली. जीवन जगत असताना कौटुंबिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात घडणार्या घटनांचा परिणाम माणसावर होत असतो. प्रत्येकजण अपेक्षा उराशी बाळगून ध्येयपूर्तीकडे कूच करत असतो. मात्र, या अपेक्षांचा अनाठायी अतिरेक झाला की त्याचे रूपांतर ओझ्यामध्ये होते. हे मनावर जड झालेले ओझे माणसाला कायम विचारांच्या गर्तेत ढकलते. हे ओझे सोडले की जीवनप्रवास सुखकर होतो, असा आशय अधोरेखित करणारे ‘निर्वाण जंक्शन’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी रंगमंचावर पाहायला मिळाले.
संगमनेर येथील नाटकवाले सेवाभावी संस्थेने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक डॉ. अमित शिंदे यांनी केले. मानवी जीवनशैलीतील त्रुटीवर भाष्य करणारे लिखाण त्यांनी केले. त्या कथेला रंगमंचावर व्यवस्थित सादरीकरण करण्याचा चांगला प्रयत्न डॉ. शिंदेंनी केला. नाटकातील गंभीर पात्रही त्यांनी वठवले. कलाकारांनी आपापल्या परीने भूमिकेला न्याय दिला. काही प्रसंगांची जुळवाजुळव नीटशी न झाल्याने प्रेक्षक पेचात पडले होते. मात्र, उत्तरार्धात नाटकातून मिळालेला संदेश लक्षात आल्यानंतर नाटकाने चांगल्याच टाळ्या घेतल्या. प्रसंगानुरूप दिलेले संगीत प्रभावी ठरले. अध्यात्मिक तत्त्वज्ञान व गूढता या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न नाटकाने केला.
पडदा उघडताच एका पडीक रेल्वे स्टेशनचे दर्शन होते. ‘निर्वाण जंक्शन’ असे त्याचे नाव. तेथे एक स्टेशन मास्तर असतात. तितक्यात तेथे एक पत्रकार येते. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या व भुताडकीने पछाडल्याची चर्चा असलेल्या या रेल्वे स्टेशनवर कव्हर स्टोरी करण्यासाठी ती आलेली असते. मात्र, तेथे आल्यानंतर तिला धक्कादायक मिळत जाते. स्टेशन मास्तरचे गूढ संवाद ऐकून भांबावून जाते. रेल्वे स्टेशनवर आलेली कालप्रवाह एक्सप्रेस पत्रकाराला दिसत नाही. त्यातच तिला भुतांचे भास होतात. तिची भेट रघू-बायजा हे जोडप्याशी होते. ते स्टेशन मास्तरबद्दल सांगतात. तीस वर्षांपूर्वी स्टेशनवर झालेल्या अपघातात अनेकजण मरण पावलेले असतात. त्यात स्टेशन मास्तरची नोकरी जाते. त्याचे कुटुंबीयही त्याला सोडून जातात, अशीही माहिती पत्रकाराला मिळते.
स्टेशन मास्तर भूत नसून खवीस असल्याचे बायजा सांगते. मग त्या स्टेशनवर नंतर मरण पावलेल्या अनेक पात्रांची एन्ट्री होते. प्रत्येकजण कशाचे ना कशाचे ओझे घेऊन मरण पावलेला असतो. शिस्तबद्ध नोकरदार असलेला बाबुलाल अति नियोजनबद्धतेने ओझे असते. हॉस्पिटमध्ये नर्स म्हणून काम करत असलेली अमिनावर कोरोनो काळात केलेल्या भेदभावाच्या अपराधीपणाचे, प्रेमविवाह केलेल्या कवितावर तिच्या पतीच्या खुनाच्या दुःखाचे, पक्या या चोरट्यावर बहिणीच्या प्रेमाचे, आईचा आज्ञाधारक असलेल्या चिन्मयवर आईच्याच अपेक्षांचे ओझे असते. हे सर्वजण मरण पावलेले असतात, पण त्या प्रत्येकाचा संबंध रेल्वेगाडीशी येतोच.
स्टेशन मास्तर त्या सर्व मृतांना आपल्याजवळ असलेले ओझे कमी करायला सांगून प्रतिकात्मक असलेल्या कालप्रवाह एक्सप्रेस गाडीत बसायला सांगतो. ते ऐकतात. हे ऐकून पत्रकार रेवालाही आपल्या मनावर असलेले पश्चात्तापाचे ओझे आठवते. वडिलांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी केलेल फोन कॉल्स न घेतल्याचा पश्चात्ताप रेवाला असतो. ते ओझेही सोडण्याचे स्टेशन मास्तर सांगतो. ते ओझे सोडून ती जीवनप्रवासाकडे पुन्हा जाते. जीवनात मुक्ती मिळवायची असेल किंवा सुखकरपणे जगायचे असेल तर मनावर असलेल्या ओझे लगेच खाली उतरवा असा संदेश रेल्वे मास्तर सांगतो आणि नाटकावर पडदा पडतो.
आपले जीवन हे एक जणू रेल्वे स्टेशन आहे. ‘कालप्रवाह एक्सप्रेस’ ही एका जीवनप्रवास रूपी प्रतिकात्मक गाडी आहे. त्यात व्यवस्थित प्रवास करायचा असेल तर ओझे असायलाच नको असा अध्यामिक संदेश देण्याचा प्रयत्न करणारे नाटक डॉ. अमित शिंदे यांनी लिहिले. मात्र, स्टेश मास्तर जिवंत की मृत हे गूढ उकलले गेले नाही. पात्रांनी केलेला अभिनय आणि नाटकातील रहस्यमयता यामुळे नाटकाने उत्सूकता ताणली गेली. नाटकातील पात्र ही पत्रकाराच्या मनातील होती की वास्तव याबाबत अनेक प्रेक्षकांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले. कथेमध्ये क्लिष्टता होती. मात्र, सादरीकरण समाधानकारक झाले.
धीरगंभीर संवादातून उपदेश करणारा व जीवनाचे मर्म सांगणारा आत्माराम डॉ. अमित शिंदे यांनी पहिल्या प्रसंगापासूनच रंगमंचावर आणला. तत्त्वज्ञानी भाषा सांगताना चेहर्यावरील गंभीर भाव, त्याला अनुरूप देहबोली यामुळे त्यांच्या अभिनयाची लट शेवटपर्यंत टिकली. नाटकाच्या एका प्रसंगबदलात भिंतीवर घड्याळ लावायला आत्मारामला उशीर झाला. रेवा या पत्रकाराला मंजुषा बेनके हिने वठवले. तिचा अभिनय चांगला होता. एका संवादात ती अडखळली. मात्र, आपली भूमिका तिने आत्मविश्वासाने पूर्ण केली. रघू व बायजाची भूमिका प्रदीप बनकर व रसिका रिठे यांच्या वाट्याला दोन प्रसंगांत आली. रेवाचे बाबा विकास खेडकर यांनी साकारले. बाबुलाल हे पात्र अभिजित भंडारे याने उत्तमरित्या उभे केले. त्याच्या चेहर्यावरील चिंता नैसर्गिक वाटली.
अमिना हे पात्र वैष्णवी भोईरने सांभाळले. कोरोना काळात तिने केलेल्या चुकांचा अपराधीपणा तिने चांगल्याप्रकारे दर्शविला. कविता हे पात्र वेदांती निकम हिने रंगवले. पतीच्या मृत्यूचे दुःख तिने शेवटपर्यंत चेहर्यावर टिकवले. पक्या या चोराला अर्षद तांबोळी याने स्टेशनवर आणले. नाटकात जे काही विनोद झाले ते याच्यामुळेच. त्याच्या वाट्याला आलेल्या संवादांनी प्रेक्षकांना हसवले. चिन्मय हे पात्र आदित्य पाठक याने उत्कृष्टरित्या पार पाडले. आईच्या आठवणींत गुंतून गेलेल्या प्रसंगात करूण अभिनय हुबेहूब वाटला. तो खरंच रडत असल्याचे भासले. चिन्मयच्या आईची भूमिका स्नेहल बोठे हिने आवाजरूपाने पूर्ण केली. शेवटच्या प्रसंगात ती रंगमंचावर दिसली. याशिवाय निशी सिंग, अमिषा जाधव, शिवम महाजन, प्रणव पाटील, आरती डोमसे, अनुज रॉय, विष्णू राठोड, अनुज औटी, उत्कर्ष देशमुख यांनीही नाटकात काम करण्याची हौस भागवून घेतली.
जुनाट रेल्वे स्टेशनचे नेपथ्य अंजना मोरे यांनी उत्तमरित्या दर्शविले. वाळलेले झाड, रेल्वे रूळही प्रभावी वाटला. प्रकाश योजना सोहम दायमा यांची होती. स्टेशनवरचा चंद्र व रंगीबेरंगी लाईट्सचा प्रकाश खूपच परिणामकारक वाटला. रेल्वेची सूचना देणारे प्रखर लाईटही चांगले वाटले. संगीत संयोजन गार्गी अरगडे व भूमिका थिटे यांनी केले. विविध प्रसंगांत गूढता निर्माण करणारे संगीत त्यांनी समर्पकपणे दिले. सकाळची चाहूल देणार्या पक्ष्यांचा आवाजही उत्तम. काही प्रसंगांतील मोठ्या आवाजाने सभागृह दणाणले. रंगभूषा सोहम सैंदाणे यांची होती. स्टेशन मास्तर, कविता, बाबुलाल, रेवा यांची रंगभूषा उत्तम होती. जखमी प्रवासीही छान रंगवला. मात्र, रघू-बायजाचे केस जरासे पांढरे दाखवायला हवे होते. वेशभूषा अमित कळमकर यांची होती. सर्वच पात्रांची वेशभूषा समर्पक वाटली. रंगमंच व्यवस्था विशाल सोनावणे यांनी पाहिली. स्नेहा पाटील यांनी व्यवस्थापन पाहिले.
एक तत्त्वज्ञानी संदेश या नाटकाने दिला. मात्र, पात्रांचे काही संवाद प्रेक्षकांना बुचकळ्यात टाकत होते. सादरीकरण करताना बहुतेक नवख्या असलेल्या कलाकारांनी चांगली मेहनत घेतली होती. दिग्दर्शक डॉ. शिंदे यांनी तिहेरी भूमिका साकारताना इतरांच्या भूमिकेकडे लक्ष दिले. तत्त्वज्ञानी संदेश देण्यासाठी लिहिलेली कथा चांगल्या नेपथ्याच्या साथीने उठावदार करण्याचा प्रयत्न ‘निर्वाण जंक्शन’ या नाटकाच्या दिग्दर्शकाने केला. नेहमीच वेगळं काही तरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.




