Friday, May 1, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : विश्वासाची फसवणूक दर्शविणारी भावनिक नाट्यकृती ‘पिसाळा’

राज्य नाट्य स्पर्धा : विश्वासाची फसवणूक दर्शविणारी भावनिक नाट्यकृती ‘पिसाळा’

संदीप जाधव | अहिल्यानगर

कमी वेळेत जास्त कमाईच्या आमीषाला तरुणाई बळी पडत आहे. घरातील वडीलधार्‍यांचा सल्ला न ऐकता बाहेरच्या व्यक्तींच्या नादी लागून अविचाराने घेतलेला निर्णय चुकीचे ठरतात. मग त्यातून मोठे नुकसान होते. असाच एक तरूण मित्राच्या सांगण्यावरून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी जमीन विकतो आणि शेवटी तरुणाची कशी फसगत होते याचे चित्रण शनिवारी (22 नोव्हेंबर) राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या ‘पिसाळा’ या नाटकात दिसले.

- Advertisement -

बोधेगाव (ता. शेवगाव) येथील राजगड प्रतिष्ठानने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक पवन पोटे यांनी केले. सध्या शेअर मार्केटमध्ये गुरफटलेल्या पिढीच्या अवस्थेवर ठळकपणे केलेले पोटे यांचे लिखाण खूप काही सांगून जाते. या कथेला दिग्दर्शक प्रतीक अंदुरे यांनी उत्तमरित्या रंगमंचावर उतरवले. पात्रांच्या अभिनयाने नाटक रंजक बनले.

‘नको नको रे मना गुंतू मायाजळी…’ या संत तुकारामांच्या अभंगाने नाटकाची सुरुवात होते. रंगमंचावर एक तरुण कीर्तनकार प्रवचनात आई-वडिलांची सेवा करा, मोहात पडू नका या आशयावरील निरूपण करते. तो धागा पकडून एका कथेला सुरुवात होते. आई, मुलगा महेश व सून स्वाती अशा त्रिकोणी कुटुंबाचा ‘खंड्या’ हा कुत्रा चौथा सदस्य. खंड्या जसा आईचा लाडका तेवढाच तो शेजारी राहत असलेल्या साईचाही. महेश-स्वातीला मूल नसल्याने साईची आई (बचतगट) तिला वारंवार हिणवत असते. त्याची सल स्वातीला असते.

एके दिवशी पिसाळलेला बाहेरचा कुत्रा खंड्याला चावा घेतो. त्यानंतर जरा उशिराने आपल्या डॉक्टर मित्राकरवी उपचार करतो. दुसरीकडे जग्या हा महेशचा मित्र त्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सूचवतो. कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि आरामात जगण्यासाठी 40 हजार रुपये दरमहा नफ्याच्या आमीषाला महेश भुलतो. त्यासाठी जमीन विकायचाही सल्ला जग्या देतो. मात्र, जग्याचा कावेबाजपणा ओळखून असल्याने आई महेशच्या प्रस्तावाला स्पष्ट विरोध करते. वाट्याने दिलेल्या जमिनीतून मिळालेल्या उत्पन्नावर ती समाधानी असते. यापूर्वी जग्याच्या नादाला लागून महेश दोन व्यवसायांतील अपयशाने कर्जबाजारी झालेला असतो.

एका प्रसंगांत पुन्हा एक कीर्तनकार ‘मित्र चांगले असावेत’ या आशयावरील अभंगाचे निरूपण करतात. त्याचा धागा पकडून पुढचा प्रसंग येतो. त्यात मित्रांच्या गराड्यात असलेला महेश जग्याने दिलेला जमीन विक्रीचा सल्ला व दुसरीकडे वाटेकरी लक्ष्मणने दिलेला सल्ला यात अडकतो. मात्र, शेअर मार्केटसाठी जमीन विकायचीच यावर तो ठाम असतो. भरघोस नफा व कृत्रिम गर्भारोपण करून घरात पाळणा हलवण्याचे त्याचे स्वप्न असते. दुसरीकडे खंड्याची दिवसेंदिवस ढासळत असते. त्यासाठी त्याला मारण्याचा सल्ला जग्या व शेजारची बचतगट वेगवेगळ्या प्रसंगांत देते. मात्र, हे आईला मान्य नसते.

जमीन विकायला नकार देणार्‍या आईवर महेश संतापतो. अपशब्द वापरतो. त्यामुळे आई व्यथित होते. कारण वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीत तिनेच महेशचे संगोपन केलेले असते. स्वातीला आई होण्याचे स्वप्न सतावते. उपचारासाठी मोठी रक्कम हवी असल्याने असल्याने तीही महेशला साथ देते. भावनाविवश झालेली आई मग रागातच जमीन विक्रीच्या कागदावर सह्या करते. नंतरच्या एका प्रसंगांत आई आणि स्वाती या दोघीही आपापल्या मनातील भावना स्वगताद्वारे बोलून दाखवितात.

जमीन विक्रीची कागदपत्रे महेश जग्याकडे सुपूर्द करतो. दोन दिवसांत जमिनीचे पैसे देण्याचे आश्वासन देतो. मात्र, शेअरमार्केटमध्ये अनेकांना गंडा घातल्याची बातमी महेश ऐकतो. त्यामुळे शंकेने जग्याला फोन करतो पण त्याचा फोन बंद असतो. आपली मोठी फसवणूक झाल्याचे समजल्यावर जगा पुरता बिथरतो. स्वातीशी वाद घालतो. इकडे मरणशय्येवर पडलेला खंड्या प्राण सोडतो. त्यामुळे आधीच दुःखात बुडालेल्या आईला महेशच्या फसवणुकीचा दुसरा जबर धक्का बसतो. बाहेरच्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे खंड्याला जीव गमवावा लागला, तसेच जग्याच्या चुकीच्या सल्ल्याने महेशची झालेली फसगत या दोन्ही बाबी तिला सारख्याच वाटतात. महेश-स्वाती हे आईजवळ जाऊन उद्विग्न होतात. ही अवस्था एक कीर्तनकार महिला प्रवचनाच्या निरूपणातून अधोरेखित करते. भावनिक शेवटाने नाटकावर पडदा पडतो.

सद्यस्थितीतील फसवणुकीच्या समस्येवरील दमदार कथेला दिग्दर्शक प्रतीक अंदुरे यांनी कसदारपणे रंगमंचावर उभे केले. नाटकातील विविध प्रसंगांना प्रवचनांच्या निरूपणाने व्यवस्थित जोडले. कलाकारांच्या उजव्या ठरलेल्या अभिनयाने नाटकाला उचलून धरले. तांत्रिक बाजूही उत्तम. ही सारी भट्टी जुळून आल्याने नाटकाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. नाटकात कुठेही न दिसणारा खंड्या केवळ आवाजाने व कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना दिसला! नाटकात काही चुकाही झाल्या.

महिला कीर्तनकाराच्या रूपात आलेल्या तनिष्का देशमुख हिने केलेले निरूपण उत्तम होते. हावभावही नैसर्गिक वाटले. नंतरच्या प्रसंगांत त्यांनी चांगली सूरसाथ दिली. दुसरा कीर्तनकार तनिष्ट भंडारी याने साकारला. स्पष्ट उच्चार होते. मात्र, निरूपणात आणखी आत्मविश्वास दाखविला आला असता. नंतरच्या प्रसंगात कीर्तनकाराची भूमिका ज्ञानेश्वरी म्हसे हिने उत्तमपणे साकारली. आवाजातील मधुरता, हावभावांची योग्यता आणि गायनातील समसरता यामुळे तिची भूमिका कमालीही सकारात्मक वाटली. आपण खरोखरच प्रवचनाला येऊन बसल्याचा भास प्रेक्षकांना झाला. आईच्या भूमिकेत आलेल्या राखी गोरखा हिने विविध प्रसंगांत प्रेमळ, भावनाविवश आणि कठोर भाव दर्शवून पात्र रंगवले. तिच्या अभिनयाने रंगलेला शेवटचा भावनिक प्रसंग अनेकांच्या डोळे ओले करून गेला.

महेश ही भूमिका अथर्व धर्माधिकारी याने वठवली. अभिनयात असलेला आत्मविविश्वास आणि चेहर्‍यावरील विविध भावछटा यामुळे त्याचे पात्र उठावदार झाले. महेशची पत्नी स्वातीला अपूर्वा काळपुंड हिने रंगमंचावर आणले. आपल्या भूमिकेला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न तिने केला. एका प्रसंगातील स्वगतात मूल नसल्याची खंत दर्शविणारी करूणता प्रेक्षकांना भावली. साई हे पात्र साईराज सरडे याने बिनधास्तपणे रंगमंचावर बागडवले. वेगवान हालचाली आणि कसलेला अभिनय याच्या जोरावर त्याने भूमिका पार पाडली. अनेकदा त्यांनी प्रेक्षकांना हसवलेही. बचतगट म्हणून परिचित असलेले पात्र सौंदर्या भोज हिने भांडतच निभावले! एका आईची होणारी चीडचीड आणि दुसर्‍यांना शब्दांतून हिणवणे तिला छानपैकी जमले. डॉक्टरची भूमिका रणवीर पालवे याने केली. एका संवादात तो अडखळला. अभिनय मात्र चांगला.

जग्याची भूमिका पृथ्वी सुपेकर याने केली. त्याला पाहून आपल्या आसपास असणार्‍या टवाळखोराची आठवण प्रेक्षकांना आली असणार. कावेबाजपणा आणि स्वभावातील रगेलपणा त्याने दाखविला. मात्र, जग्या महेशच्या आईला कधी मम्मी तर कधी आई म्हणायचा! लक्ष्मण हे पात्र ओम सैंदाणे याने केले. वाट्याला आलेली मवाळ भूमिका त्याने पूर्ण केली. टाळकर्‍याच्या भूमिकेत सुकन्या गर्जे व मित्राच्या भूमिकेतील अथर्व शहा यांनी आपली छोटी भूमिका व्यवस्थित निभावली.
नेपथ्य तनिष्क भंडारी याचे होते. घराच्या अंगणातील नळ, लाकडी कुंपण, तुळशी वृंदावन, समर्पक वाटले.

प्रकाश योजना चेतन ढवळे याने सांभाळली. विविध प्रसंगांत दिलेले स्पॉट उत्तम. पण एका प्रसंगात दाखविलेला चंद्र जरा जास्तच मोठा वाटला! सिद्धेश्वर उंडाळकरने दिलेल्या पार्श्वसंगीताने प्रसंग प्रभावी केले, तर भूषण भावसार यांचे संगीत संयोजन परिणामकारक ठरले. रंगभूषा राखी गोरखा हिने केली. महेश, स्वाती, जग्या, साई यांची रंगभूषा चांगली होती, मात्र, आईच्या केस जरासे पांढरे दाखवायला हवे होते. ती सुनेपेक्षा तरूण दिसत होती! वेशभूषा तनिष्का देशमुख हिने केली. सध्या भेडसावणारी समस्या रंगमंचावर मांडणारे हे नाटक भावनिकतेला वाहिलेले होते. कलाकारांकडून चांगली मेहनत दिग्दर्शक प्रतीक अंदुरे यांनी करून घेतली. संत तुकाराम, संत एकनाथ व संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांचा यशायोग्य वापर करून कथेला पुढे नेण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले. नाटकाने चांगले मनोरंजनही केले.

ताज्या बातम्या

संपादकीय : १ मे २०२६ – पुरोगामी प्रतिमा जपण्याचे आव्हान

0
महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा सहासष्टावा वर्धापनदिन अन्य काही दिनांप्रमाणे केवळ साजरा करण्यात मराठीजनांनी धन्यता मानली तर सध्याच्या स्थितीत ती एक मोठीच आत्मवंचना ठरेल, असे म्हटले तर...