Monday, April 6, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : दुसर्‍या महायुद्धातील स्थिती दर्शविणारं ‘द ब्लँक्ड् इक्वेशन’

राज्य नाट्य स्पर्धा : दुसर्‍या महायुद्धातील स्थिती दर्शविणारं ‘द ब्लँक्ड् इक्वेशन’

संदीप जाधव | अहिल्यानगर

दुसर्‍या महायुद्धात युरोपियन देशांविरुद्ध जपानने उघड भूमिका घेतली होती. 7 डिसेंबर 1941 साली जपानने अमेरिकच्या पर्लहार्बर या नौदल तळावर हल्ला केला. त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब हल्ला केला. त्यात जपानची मोठी जीवितहानी झाली. याचे दूरगामी परिणाम जपानवर झाले. दुसर्‍या महायुद्धातील जपानमधील परिस्थिती आणि अणुबॉम्ब हल्ल्यानंतरची विध्वंसक स्थिती, तसेच अणुबॉम्ब तयार करणार्‍या शास्त्रज्ञाला आलेला पश्चात्ताप अशा घडामोडी दर्शविणारी नाट्यकृती मंगळवारी (दि. 18) राज्य नाट्य स्पर्धेत द ब्लँक्ड् इक्वेशन या दोन अंकी नाटकात पाहायला मिळाली.

- Advertisement -

अहिल्यानगरच्या नाट्य आराधना संस्थेने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक चंद्रकांत चौधरी असून त्याचे दिग्दर्शन तेजस अतितकर यांनी केले. दुसर्‍या महायुद्धातील जपान देशातील भयावह स्थिती दर्शविण्यासाठी ध्वनी व प्रकाश योजनेचा मोठा वापर नाटकात प्रभावी ठरला. सभागृहात वापरलेल्या‘स्मोक’मुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पडदा उघडताच एका विशेष पोखाषातील कलाकारांचे दर्शन होते. ते जपानमधील लोकांच्या दैनंदिन जीवन दर्शवितात. तेवढ्यात सायरन वाजतो आणि ते निघून जातात. हकुझो आणि जेतो या वयोवृद्ध कुटुंबाची दुसर्‍या महायुद्धातील प्रातिनिधीक स्थिती नाटकात दर्शविली जाते. आपल्या दोन्ही मुली मरण पावलेल्या अससतात. एका मुलीच्या दोन मुलांचा सांभाळ ते करत असतात. लष्करी अधिकारी मुलांना सुरक्षितस्थळी नेतात.

जपानचे शास्त्रज्ञ डॉ. निशिना यांच्यावर अणुबॉम्ब बनविण्याची जबाबदारी असते. मात्र, अनेक तांत्रिक अडचणींमुळे बॉम्ब तयार करण्याचा वेळ लागणार असतो. दुसरीकडे अमेरिकन शास्त्रज्ञ अग्रेसर असतात. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी 1905 मध्येे मांडलेल्या सापेक्षतेचा विशेष सिध्दांतावरून अमेरिकन शास्त्रज्ञ ओपनहायमर याने अणुबॉम्ब बनविलेला असतो. जपानने 1941 मध्ये अमेरिकेच्या पर्लहार्बर या नौदल तळावर केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला म्हणून तो बॉम्ब अमेरिका प्रशासन जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकते. त्यात हजारो लोक मृत्युुमुखी पडतात. मोठी हानी होतेे. सगळीकडे आगडोंब पसरतो. या सर्व लोकांच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत, याचा पश्चात्ताप ओपनहायमरला होतो. त्याचे मन वारंवार त्याला खात राहते. भगवतगीतेचा तो अभ्यासक असतो. त्यातल्या काही विचारांचा प्रभाव त्याच्यावर असतो. म्हणूनच आपले हातून मोठे पातक झाल्याची सल त्याला असते.

इकडे जपानचे शास्त्रज्ञ डॉ. निशिना जपानच्या विध्वंसाला अमेरिकन शास्त्रज्ञ ओपनहायमर हाच जबाबदार असल्याचे सांगतात. मग शेवटी युद्धामुळे हानीच होते, सकारात्मक काहीच होत नाही या संदेशपर निवेदनाने नाटकावर पडदा पडतो. नाटकातील विविध प्रसंगांत उर्जा, मिताली, मिस कावाबे, मासाको, तामिकी, चिओ, तनाका व लष्करी अधिकारी हेदेखील प्रवेश करतात. ज्या सूत्राच्या आधारावर तयार केलेल्या अणुबॉम्बच्या वापराने जीवितहानी झाली, त्याला ‘द ब्लँक्ड् इक्वेशन’ असे संबोधण्यात आले. स्पर्धेत उतरायचे म्हटले की जोरदार तयारी करावी लागते. ही तयारी दिग्दर्शक तेजस अतितकर यांनी कलाकारांकडून व्यवस्थित करवून घेतल्याचे नाटकात पाहायला मिळाले. स्वतःची दोन भूमिकांमध्ये त्यांनी काम केले. नाटकातील विविध स्थिती दर्शविण्यासाठी वापरलेला माईमॅट या विशिष्ट नृत्यप्रकार प्रेक्षकांना भावला. आधी प्रसंगांची जुळवाजुळव समजली नाही, मात्र उत्तरार्धातील नाटकातील प्रसंग व्यवस्थित उमगले.

ओपनहायमर या शास्त्रज्ञाचे पात्र चैतन्य खानवेलकर यांनी केले. कामाची निष्ठा आणि त्यानंतर आलेला पश्चात्ताप या दोन्ही स्थितीतील त्यांचे हावभाव योग्य वाटले. एका संवादात मात्र ते अडथळले. प्रसंगानुरूप बदलत जाणारा त्यांचा अभिनय मात्र चांगला वाटला. उर्जा व नताली हे पात्र अवंती गोले यांनी आत्मविश्वासाने निभावले. चिंतातूर, कुत्सित भाव त्यांना छान जमले. शेवटच्या प्रसंगात त्यांनी केलेले निवेदनही उत्तम. डॉ. निशिना व हकुझो ही अनुक्रमे शास्त्रज्ञ आणि वृद्ध व्यक्ती यांची पात्रे दिग्दर्शक तेजस अतितकर यांच्या वाट्याला आली. वृद्धत्वाकडे झुकलेल्या हकुझो यांच्या मंद हालचाली, तसेच शास्त्रज्ञाची मनापासूनची तळमळ त्यांनी उत्तमपणे दर्शविली. त्यांच्या नैसर्गिक अभियनाने शास्त्रज्ञाचे पात्र खुलले. त्यांची देहबोलीही सकारात्मक वाटली.

मिस कावाबे व जेतो या भूमिका तन्मयी भावे यांच्या वाट्याला आल्या. व्याकूळता आणि मुत्सद्दीपणाचा अभिनय त्यांनी केला. मासाको हे पात्र तेजा पाठक यांनी सहजपणे वठवले. त्यांच्या वाट्याला आलेल्या संवादांना हावभावांची चांगली साथ मिळाली. तामिकी ही भूमिका देवदत्त चौसाळकर यांनी रंगमंचावर आणले. एका संवादात ते घुटमळले. पण त्यांचे प्रेमळ हावभाव छान वाटले. चिओ व तनाका दोन्ही बालपात्रं पद्मनाथ जांभळे व ओजस्वी पाठक यांनी व्यवस्थित केली. लष्करी अधिकारी सुजित भाव व राहुल रसाळ यांनी उभे केले. याशिवाय नाटकात ‘माईमॅट’मधील कलाकारांनी उत्कृष्ट हावभावांनी प्रसंग प्रभावी केले. त्यात रेवती घोटणकर, स्पृशा जहागीरदार, ध्रुवी पोटे, देविका साळुंके, ज्ञानेश्वरी झगडे, सृष्टी गंधे, दर्शना दंडवते, स्नेहा विखे, मानवी डेरे, ज्योती सुलक्षणे, वनिता बागडे, शुभांगी कुटे, पूर्वा बागडे, भार्गवी सुलक्षणे, प्रतिक्षा रसाळ, श्लोक गाडे, तनया कुटे, शुभ्रा अडगटला, रूद्र रसाळ व कस्तुरी दुशी यांचा समावेश होता.

प्रकाश योजना विनेश लिमकर व सोहम दायमा यांनी सांभाळली. विविध प्रसंगांतील रंगीबेरंगी स्पॉट समर्पक वाटले. अणुबॉम्बची दाहकता दर्शविण्यासाठी प्रखर लाईट्स व स्मोकचा कल्पकतेने केलेला वापर विशेष भावला. नेपथ्याची जबाबदारी समीर पाठक व अंकिता खानवेलकर यांच्याकडे होती. जपानी कुटुंबाचे घर व्यवस्थित दाखविले. भिंतीवरचे घड्याळ व मॅनहॅटन प्रकल्प हे दोन्ही प्रसंगानुरूप बदलत होते. ते कौतुकास्पद वाटले. मासाकोच्या एका प्रसंगात रस्ताही त्यांनी चांगला बांधला! फळ्यावरील समीकरणंही परिणामकारक ठरली. नाटकात सर्वांत प्रभावी ठरलेले पार्श्वसंगीत शिल्पा मेनसे, सारंग देशपांडे यांनी दिले. अणुबॉम्ब स्फोटावेळी दिलेल्या दणदणीत संगीताने सिनेमा हॉलचा ‘फिल’ दिला. रंगभूषा प्रसाद सैंदाणे यांची होती. विविध पात्रानुसार त्यांनी चांगली जबाबदारी पार पाडली. माईमॅटमधील कलाकारांची एकसारखी रंगभूषा, तसेच जेतो, लष्करी अधिकारी, ओपनहायमर यांची रंगभूषा चांगली वाटली. डॉ. निशिनाचे केस मात्र अनैसर्गिक वाटले. वेशभूषा तेजा पाठक यांच्याकडे होती. पात्रानुरूप वेशभूषा त्यांनी दिली. रंगमंच व्यवस्था विराज अडगटला, विशाल कुटे, रूद्र रसाळ, महादेव गाडे, जे. बी. शिंदे, श्लोक गाडे यांनी पाहिली.

दुसर्‍या महायुद्धात जपानमध्ये झालेली विध्वंसकता दर्शविण्यासाठी समर्पक नेपथ्य, भक्कम तांत्रिक बाजू व कलाकारांची मिळालेली योग्य साथ यामुळे नाटक परिणामकारक ठरले. काही चुकाही झाल्या. लहान मुलांचा एक प्रसंग कोपर्‍यात झाला. त्यामुळे रंगमंचाच्या डाव्या बाजूच्या प्रेक्षकांना तो दिसत नव्हता, अर्थात ही चूक नंतर लगेचच सुधारली गेली. काही पात्रांनी पाठांतरावर भर द्यायला हवी होती. मात्र प्रकाश व ध्वनी योजनेचा प्रभावी वापर दिग्दर्शक तेजस अतितकर यांनी केला. नाटकातील प्रसंगांनी प्रेक्षकांचे मनोरंजन झाले, तसेच दुसर्‍या महायुद्धाची स्थितीही त्यांनी अनुभवली. या नाटकामुळे राज्य नाट्य स्पर्धा आणखी रंगतदारतेकडे झुकली हे मात्र नक्की.

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...