Sunday, July 26, 2026
Homeनगरकेंद्रानंतर राज्यांकडून स्वतंत्र अभ्यासक्रम आराखडा विकसित

केंद्रानंतर राज्यांकडून स्वतंत्र अभ्यासक्रम आराखडा विकसित

संगमनेर | Sangamner

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर अंमलबजावणीसाठी देशभर पावले पडू लागली आहेत. बालवाटिका ते उच्च शिक्षणापर्यंत प्रशासकीय, शैक्षणिक बदलाच्या दिशेने पावले पडत आहेत. त्याचवेळी विविध राज्यांमध्ये शैक्षणिक परिवर्तनाच्या दृष्टीने भूमिका घेतली जाऊ लागली आहे.अनेक राज्य सरकारांनी केंद्र सरकारने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केल्यानंतर स्वतंत्र राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित केला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमासाची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने विविध राज्य सरकारांनी पावले टाकली आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने देखील 2026 मध्ये शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार बालवाटिका ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत अभ्यासक्रमात बदल झाला आहे.

- Advertisement -

केंद्रीय धोरणाप्रमाणे बालवाटिकेची तीन वर्ष, पहिली ते बारावीपर्यंत निश्चित केलेल्या चार स्तरांपैकी पहिल्या पायाभूत स्तराची पाठ्यपुस्तके वर्गात शिकवण्यासाठी उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर यावर्षी इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावी अशा इयत्तांची पाठ्यपुस्तके बदलत आहेत. मागील वर्षी नव्या अभ्यासक्रमाधारित पहिलीचे पाठ्यपुस्तक बदलले होते. यावर्षी एकाचवेळी चार इयत्तांची पाठ्यपुस्तक प्रथमच बदलत आहेत. त्या अनुषंगाने बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित बदलांचा वेध घेत, अभ्यासक्रमातील ध्येय, क्षमता, अध्ययन निष्पत्ती, घटक, उपघटक, अध्ययन अनुभव, मूल्यमापन दृष्टीकोनांसंदर्भात राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.अभ्यासक्रमातील नवे बदल आणि त्यादृष्टीने होणारी कार्यवाही खरंच शिक्षणात परिवर्तन आणणार का? हे या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी नेमकी कशी होणार? यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षण प्रक्रियेत नेमके काय बदल होतात हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये प्रामुख्याने मूलभूत साक्षरता, संख्याज्ञान, लेखन, वाचन, बोलणे, मोजणे, अंकगणित व गणितीय विचार यावर केंद्रित करण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. पायाभूत स्तरावर लवचिक, बहुस्तरिय, खेळ, उपक्रम आधारित शिक्षणावर भर दिला गेला आहे. पूर्वाध्ययन स्तरावर पायाभूत स्तरावरील खेळ, शोध, उपक्रमाधारित अध्ययन व संवादात्मक पध्दतीने शिकणे करण्यावर भर असणार आहे. या स्तरावर कार्यात्मक शिक्षण, विषयांमधील संबंध ओळखणे, चिकित्सक विचार प्रक्रिया विकसित करण्याची प्रक्रिया घडणे अपेक्षित आहे. या स्तरावर आकलनात्मक विकास अपेक्षित आहे. त्यामुळे या स्तरावर गेले अनेक वर्षाची पाठांतराधारित असलेली पंरपरा खंडीत करून आकलनात्मक प्रक्रिया संदर्भाने प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. गेले अनेक वर्ष सातत्याने सांगितले जात आहे की, आपल्या अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकांमध्ये माहितीवर अधिक भर आहे.

त्यामुळे नव्या अभ्यासक्रमातील मजकूर कमी करण्याची अपेक्षा करण्यात आली आहे.त्याच बरोबर प्रश्नाधारित, समग्र, संवादाधारित, विश्लेषणाधारित शिक्षणाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच संकल्पनाधारित, कल्पनाशक्तीला प्राधान्य, उपयोजन, समस्या निराकरण यावर लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेला अधिक प्राधान्याची अपेक्षा आहे. त्यातून अधिक सखोल, अनुभवात्मक शिक्षणावर भर दिला जाईल. जेणेकरून अभ्यासक्रम मजेशीर, सर्जनशील, सहयोगात्मक तसेच विद्यार्थ्यांना शोधासाठी प्रेरित असण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. त्यादृष्टीने पुनर्रचित अभ्यासक्रमात धोरणाचे प्रतिबिंब अधोरेखित झाले आहे.

अभ्यासक्रम हा अनुभवात्मक शिक्षणावर भर देण्याबरोबर भारतीय कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून भारतीय संस्कार रूजवण्याचा विचार प्रतिपादन करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी प्रभावी व्हावी याकरीता विद्या प्राधिकरणाने प्रत्येक विषयांचा तासिका भारांश निश्चित केला आहे. त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रकात देखील बदल सूचवले आहेत. राज्यातील शाळांचे कामकाज यापुढे 237 दिवस चालणार आहेत. यापैकी 210 दिवस प्रत्यक्ष अध्यापन चालणार आहेत. 14 दिवस परीक्षा मूल्यांकन व अनुंषंगिक कृती, 13 तासिका सहशालेय उपक्रम, जसे दप्तराविना शाळा, शैक्षणिक सहल, शिबिरे, 52 रविवार सुट्ट्या, 76 अन्य सुट्ट्या दर्शित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची अभिरूची व्हावी म्हणून ग्रंथालयासाठी प्रत्येक वर्गासाठी आठवड्यातून एक तासिका राखीव ठेवण्यात आली. आठवड्याचे 28 तास घड्याळी उपयोगात आणले जाणार आहेत. तर वर्षभरातील 980 वार्षिक तासाचे कामकाज केले जाणार आहे. हे नियोजन करताना शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे आठवड्याचे कामकाज करण्यावर भर दिला आहे. त्याचवेळी राज्यातील सर्व शाळांचे कामकाजाचे दिवसही समान असणार आहेत. कायद्याने निम्म प्राथमिकसाठी किमान 200 व उच्च प्राथमिकसाठी 210 दिवस अपेक्षित आहे. मात्र नव्या नियोजनानुसार आता 237 दिवस प्रत्यक्ष शाळा भरणार आहेत.

तर इयत्ता तिसरी ते पाचवी इंग्रजी आणि मराठी माध्यमासाठी ग्रंथालयाची एक तासिका याप्रमाणे वर्षभरात 20.42 टक्के वार्षिक तास राखीव असणार आहेत. मराठी प्रथम भाषा विषयासाठी आठ तासिका निश्चित केलेल्या असून प्रत्येक तास 35 मिनिटांचा असणार आहे. वार्षिक 163.33 तास मराठीचे अध्यापन होईल. इंग्रजीसाठी 10 तासिका निश्चित केलेल्या असून त्यासाठी वार्षिक 204.17 तासिकांचे अध्यापन होईल. मराठीपेक्षा इंग्रजी विषयासाठी अधिक वेळ खर्च केला जाणार आहे. गणितासाठी 9 तासिका आठवड्याला असून वार्षिक 183.75 तासिका असणार आहेत. आपल्या सभोवतालचे जग या विषयाच्या प्रथम भागासाठी चार आणि द्वितीय भागासाठी चार तासिका नियोजित असून वार्षिक 163.34 वार्षिक तास कामकाज चालणार आहेत. कार्यशिक्षण, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता या विषयांसाठी प्रत्येकी चार तासिका असून वर्षभरात प्रत्येकी 81.67 तास प्रत्येक विषयाचे अध्यापन होणे अपेक्षित आहे. वर्षभरात अतिरिक्त समृध्द करण तासिकांसाठी 61.25 तास, परीक्षा, मूल्यमापनासाठी 73.50 वार्षिक तास व सहशालेय उपक्रमासाठी 68.25 तास कामकाज चालणार आहे.

साधारण आठवड्याला प्रत्येकी 35 मिनिटांच्या 48 तासिकांचे कामकाज चालणार आहे, तर वार्षिक कामकाजाचा विचार करता 1 हजार 183 घड्याळी तास कामकाज चालणार आहे. सहावी ते आठवीसाठीचा विचार करता प्रथम भाषा मराठी, हिंदी,इंग्रजी या विषयांसाठी समान तासिका भारांश निश्चित केला असून आठवड्याला प्रत्येकी चार तासिका असणार आहेत. गणित, विज्ञान 8, सामाजिक शास्त्र 8, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण प्रत्येकी 4 तासिका, व्यावसायिक शिक्षण 5 तासिका निश्चित केल्या आहेत. वर्षभरात 1 हजार 244.25 तास कामकाज केले जाणार आहे. (क्रमशः)

ताज्या बातम्या

राज-का-रण : ‘जेन झी’चा एल्गार, आम्हाला गृहीत धरू नका…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक या आंदोलनाचे तात्कालीक कारण दिल्लीतील लाठीमार असले, तरी त्यामागे खदखदणारा असंतोष अनेक वर्षांचा आहे. ही पिढी...