Sunday, July 26, 2026
Homeनगरराज्यातील धरणांमध्ये एकूण 58.56 टक्के पाणीसाठा

राज्यातील धरणांमध्ये एकूण 58.56 टक्के पाणीसाठा

जलसिंचन तज्ज्ञ चकोर यांची माहिती

अकोले |प्रतिनिधी| Akole

राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याबाबत दिलासादायक चित्र समोर आले असून, यावर्षी 17 मार्च 2026 अखेर राज्यातील एकूण सुमारे 3011 लहान, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये 58.56 टक्के (841.675 टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जलसिंचन तज्ज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे.

- Advertisement -

गतवर्षी 17 मार्च 2025 रोजी राज्यातील धरणांमध्ये केवळ 51.87 टक्के (745.520 टीएमसी) इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी सुमारे 7 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सहा महसुली विभागांतील धरणांमधील सध्याची पाणीसाठ्याची स्थिती पुढीलप्रमाणे- कोकण विभागात 173 धरणांमध्ये 74.164 टीएमसी (56.68 टक्के), नाशिक विभागात 538 धरणांमध्ये 122.293 टीएमसी (58.17 टक्के), पुणे विभागात 722 धरणांमध्ये 304.540 टीएमसी (56.58 टक्के), मराठवाडा विभागातील 922 धरणांमध्ये 158.773 टीएमसी (61.87 टक्के), अमरावती विभागातील 271 धरणांमध्ये 83.972 टीएमसी (61.21 टक्के) तर नागपूर विभागातील 385 धरणांमध्ये 97.933 टीएमसी (59.65 टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

यामध्ये सर्वाधिक पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागात 84.83 टक्के असून त्याखालोखाल अमरावती विभागाचा क्रमांक लागतो. सर्वात कमी पाणीसाठा पुणे विभागात 56.58 टक्के असल्याचे दिसून येते. राज्यातील प्रमुख मोठ्या धरणांमधील पाणीसाठाही समाधानकारक असल्याचे दिसून येते. त्यामध्ये उजनी धरणात 31.00 टीएमसी (57.87 टक्के), कोयना धरणात 61.693 टीएमसी (61.61 टक्के) आणि जायकवाडी धरणात 51.830 टीएमसी (61.42 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी भंडारदरा धरणात 7.585 टीएमसी (71.18 टक्के), निळवंडे धरणात 4.157 टीएमसी (49.96 टक्के), मुळा धरणात 18.025 टीएमसी (69.33 टक्के), आढळा धरणात 0.741 टीएमसी (69.91 टक्के) तर भोजापूर धरणात 48 दशलक्ष घनफूट (13.30 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक असल्याची माहितीही चकोर यांनी दिली. दरम्यान, रब्बी हंगाम संपून उन्हाळी हंगामास सुरुवात झाली आहे. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेता शेती सिंचनासाठी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाईही मोठ्या प्रमाणात भासणार नसल्याचे चित्र आहे. तथापि, उन्हाळ्यातील वाढते तापमान व बाष्पीभवनामुळे पाण्याचा व्यय वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य व नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक असून, विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे असल्याचेही इंजि.चकोर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

ई-केवायसी करूनही मार्च, एप्रिलमधील अतिवृष्टीचे अनुदान रखडले

0
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpri Nirmal राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परीसरात गेल्या मार्च, एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी व गारपीटीमुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिके व फळबागांचे अतोनात नुकसान...