अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येणार्या नसबंदी (कुटूंब नियोजन) शस्त्रक्रियेसाठी आजही पुरूषांकडून महिलांना पुढे करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजही नसबंदीच्या शस्त्रक्रियेला पुरूषांचा ठेंगा असून महिलांच्या कुटूंबनियोजन शस्त्रक्रियेत देखील नऊ तालुक्यात अवघे 50 टक्के काम आहे. तर अकोले, शेवगाव, श्रीगोंदा आणि पाथर्डी तालुक्यात हे प्रमाण 17 ते 23 टक्के असून 50 टक्क्यांपेक्षा कमी काम असणार्या तालुक्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात शहरी भागात मनपा, तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात येते. कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया पुरुष आणि महिला दोघांनाही करता येते, पण जिल्ह्यातील आकडेवारीवरून दरवर्षी महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे. पुरुषांनी या योजनेला ठेंगा दाखवल्याचे दिसून आले. पुरुष नसबंदीसंदर्भात पुरेशी जनजागृती नसल्याने या उपक्रमाला खीळ बसली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील आकडेवारी पाहिली असता पुरुषांनी नसबंदीला ठेंगा दाखवल्याचेही स्पष्ट झाले आहे. नसबंदीसंदर्भात पुरुषांच्या मनातील गैरसमज दूर करण्यात आरोग्य विभाग अयशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.
पुरुष नसबंदी ही झटपट शस्त्रक्रिया आहे. स्त्री नसबंदीपेक्षा ती सोपी आणि सुरक्षित आहे. या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते. दरम्यान, नगर जिल्ह्यात मार्च 2026 अखेर जिल्हाभरात अवघ्या 13 पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया केलेली आहे. तर तर नसबंदीत राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, नगर आणि पारनेर तालुका वगळता अन्य ठिकाणी ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या अवघ्या 50 टक्के काम झालेले आहे. यामुळे कमी काम असणार्या तालुक्यांना आरोग्य विभागाच्यावतीने नोटीस काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
तालुकानिहाय शस्त्रक्रिया
राहाता 104 टक्के, श्रीरामपूर 70 टक्के, जामखेड 66 टक्के, राहुरी 64 टक्के, नगर 64 टक्के, पारनेर 54 टक्के, कर्जत 51 टक्के, संगमनेर 43 टक्के, नेवासा 39 टक्के, कोपरगाव 34 टक्के, पाथर्डी 23 टक्के, श्रीगोंदा 21 टक्के, शेवगाव 19 टक्के, अकोले 17 टक्के असे आहे.
2 पेक्षा अधिक अपत्यांवरील शस्त्रक्रिया 40 टक्के
नगर जिल्ह्यात मार्च महिन्यांत 15 हजार 771 महिला शस्त्रक्रियेचे उद्दिष्टे ठेवण्यात आले होते. यातील अवघे 6 हजार 922 शस्त्रक्रियेचे उद्दिष्टपूर्ण झालेले असून झालेल्या कामाची टक्केवारी ही 48 टक्के आहे. यात 2 पेक्षा जास्त अपत्य असणार्या शस्त्रक्रिया झालेल्याची संख्या ही 2 हजार 674 असून त्याची टक्केवारी 40 टक्के आहे. यात पुरूष शस्त्रक्रियेची संख्या ही अवघी 13 आहे. पारनेर, कर्जत, संगमनेर, नेवासा, कोपरगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव आणि अकोले यात तालुक्यात 17 ते 54 टक्के शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.





