Wednesday, September 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअफवांचा धुरळा उडवणे बंद करा - दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी बजावले

अफवांचा धुरळा उडवणे बंद करा – दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी बजावले

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाशी गेल्या काही वर्षांपासून नाव जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. दिशाला आपण कधीही भेटलो नसून तिची ओळखही नसल्याचे स्पष्ट करत, केवळ राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषातून आणि चारित्र्यहननाच्या उद्देशाने आपले नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अफवांचा धुरळा उडवणे बंद करा, असे आदित्य ठाकरे यांनी बजावले.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी एक्स या समाज माध्यमातून सालियन प्रकरणावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले. गेल्या सहा वर्षांपासून काही लोकांकडून वारंवार या दुर्दैवी घटनेशी कोणताही पुरावा किंवा संबंध नसतानाही आपले नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कुठलेही तथ्य आणि सत्य नसलेले हे सततचे खोटे कॅम्पेन दुर्दैवी आहे. बोभाट करून केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मीडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत, असे सांगत आदित्य यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणीही केली. अधिकृत यंत्रणांनी कोणत्याही दबावाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निष्पक्षपणे पुन्हा एकदा चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आमचा लढा सुरूच राहणार
दरम्यान, ज्यांना वाटत असेल की अशा चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल, तर तो तुमचा भ्रम आहे, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

मोकाट कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी अनोखा एल्गार; निफाड नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडले...

0
निफाड | प्रतिनिधी Niphad निफाड शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निफाड नगरपंचायत प्रशासनाला वारंवार तक्रारी व निवेदने करूनही...