Saturday, September 26, 2026
HomeनाशिकNashik News : वादळी पावसाने शहराची तारांबळ; बहुतांश भागात बत्ती गुल

Nashik News : वादळी पावसाने शहराची तारांबळ; बहुतांश भागात बत्ती गुल

झाडे कोसळली, विद्युत वाहिन्या तुटल्या || महापालिका व महावितरणच्या तयारीवर प्रश्नचिन्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मंगळवार, दि. २ जून रोजी दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडवली. शहरातील अनेक ठिकाणी झाडे व मोठ्या फांद्या कोसळल्याने विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले आणि जवळपास संपूर्ण शहरातच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

- Advertisement -

पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे पंचक, देवळाली, मुक्तीधामसह विविध भागांतील उच्चदाब वाहिन्यांवर झाडे कोसळली. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या, तर काही भागांत तांत्रिक बिघाड निर्माण झाले. परिणामी शहरातील बहुतांश भाग अंधारात गेला. काही भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

एकीकडे पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटणी, वीजयंत्रणेची देखभाल आणि आपत्कालीन तयारीचे दावे करण्यात येत असताना, पहिल्याच वादळी पावसात अनेक भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने महापालिका आणि महावितरणच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, महावितरणचे अभियंते, जनमित्र आणि कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीच्या कामाला लागले आहेत. झाडे व फांद्या हटवून तुटलेल्या वाहिन्यांची दुरुस्ती करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत असला तरी अनेक भागांतील नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.

“वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा प्रभावित झाला. सर्व यंत्रणा तातडीने कामाला लागली असून शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

— विकास अडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

ताज्या बातम्या

चांदा येथे मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला; प्रशासनाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना...

0
चांदा । वार्ताहर मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच नेवासा तालुक्यातील चांदा गावाच्या बसस्थानकाजवळच कालव्याचा भराव मोठ्या प्रमाणावर खचल्याने अचानक ग्रामस्थ व प्रशासनाची धावपळ उडाली....