पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
खुन्नस देतो म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्याने कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (25 जानेवारी) सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास पारनेर महाविद्यालयात घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर पारनेर येथे प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्याला अहिल्यानगर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, साहिल शिवाजी औटी (कुंभारवाडी, ता.पारनेर) व शुभम बाबासाहेब आग्रे ( खडकवाडी, ता. पारनेर) हे दोघे पारनेर महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या शास्त्र शाखेत शिकत आहेत. शनिवारी सकाळी 9 वाजता त्यांची प्रात्यक्षिक परिक्षा होती.
त्यासाठी सकाळी सव्वाआठ वाजल्याच्या सुमारास दोघेही बरोबरच महाविद्यालयाच्या परीसरात आले. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीतून साहिल औटी याने कोयत्याने शुभमच्या डोक्यावर, हातावर व मानेवर वार सपासप वार केले. रक्तस्त्राव होऊन शुभम जागेवरच कोसळला. त्यानंतर महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थ्यांनी शुभम यास शहरातील खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. उपप्राचार्य डॉ.तुकाराम थोपटे यांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली.
बैठकीसाठी लोणावळा येथे गेलेल्या प्राचार्य लक्ष्मणराव मतकर यांनीही तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात जाऊन शुभम याच्यावरील उपचाराची माहीती घेतली. दरम्यान, अहिल्यानगर येथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या शुभमची पारनेर पोलीसांनी विचारपुस केली. झालेला प्रकार व त्यामागील कारणही त्याने सांगितल्याचे समजते. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी जबाब देण्यास त्याने नकार दिला.