Thursday, October 1, 2026
HomeनगरAhilyanagar : विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शिक्षकांच्या हजेरीची होणार अचानक तपासणी

Ahilyanagar : विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शिक्षकांच्या हजेरीची होणार अचानक तपासणी

राज्य स्तरापासून केंद्र प्रमुखांपर्यंत शाळा भेटींचे शिक्षण आयुक्तांचे आदेश || अहवाल सरल पोर्टलवर होणार अपलोड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील शालेय शिक्षण विभागातील राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकार्‍यांना आता दर आठवड्याला शाळांना अचानक भेटी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या भेटीदरम्यान शिक्षकांची उपस्थिती, अध्यापनाची दर्जा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता, शालेय पोषण आहार आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता यासह विविध बाबींची सखोल तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, शाळेच्या वेळेत शिक्षक विनापरवानगी गैरहजर आढळल्यास त्यांच्यावर बिनपगारी अथवा शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी दरवर्षी शाळांची वार्षिक तपासणी, विविध उपक्रम, स्पर्धा, परीक्षा तसेच चौकशीच्या निमित्ताने भेटी देत असतात. मात्र, अधिकार्‍यांच्या राज्यभरातील शाळा भेटींचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी हे कडक आदेश जारी केले आहेत. गेल्या वर्षी राज्य ते समूह साधन स्तरवर 11 हजार 532 शाळा भेटी झाल्याची आकडेवारी यु-डायस प्लसमध्ये नोंदवली गेली आहे.यासाठी अधिकार्‍यांसाठी शाळा भेटींचे नवीन उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यात राज्यस्तरीय अधिकारी दर 15 दिवसांत किमान दोन शाळांना भेट देणे. विभागीय व जिल्हास्तरीय शिक्षणाधिकारी यांनी दर आठवड्याला किमान दोन शाळांना भेट देणे.

गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी दर आठवड्याला किमान तीन शाळांना भेट देणे. पोषण आहार अधीक्षक व केंद्र प्रमुख: दर आठवड्याला किमान चार शाळांची तपासणी करणे असे बंधनकारक करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळा असून, खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सुमारे दोन हजार शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये आता नियमितपणे ही अचानक तपासणी केली जाणार आहे. अधिकार्‍यांना भेटीदरम्यान आढळलेल्या बाबींचा अहवाल आणि छायाचित्रे सरल पोर्टलवरील विशेष लिंकवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या मुद्द्यांची होणार तपासणी
शिक्षक व विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती. शाळा परिसर व विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता. वर्गावरील तासिकेचे प्रत्यक्ष निरीक्षण (किमान एका वर्गावरील एक तासिका). विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन.आनंददायी शनिवार उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी. विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेने केलेल्या उपाययोजना. शैक्षणिक साहित्य, किट, प्रयोगशाळा व त्यांचा प्रत्यक्ष वापर.डॉ. नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची अंमलबजावणी.पीएम पोषण (माध्यान्ह भोजन) योजनेअंतर्गत आहाराची गुणवत्ता, स्वच्छता व मेनूनुसार वाटप.

चांगल्या-वाईट गोष्टी येणार रेकॉर्डवर !
शाळा भेटीदरम्यान अधिकार्‍यांना आढळून येणार्‍या त्रुटी आणि कमतरता यासंबंधीची माहिती शाळेच्या सर्वसाधारण अभिप्रायासह नोंदवण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सिंग यांनी दिल्या आहेत. त्रुटींसोबतच शाळेत आढळलेल्या उल्लेखनीय व कौतुकास्पद बाबींची देखील नोंद घेतली जाणार आहे. यामुळे आता राज्यातील प्रत्येक शाळेचा वास्तववादी कारभार समोर येणार आहे.

कारवाईचा इशारा
शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हास्तरावरील सर्व अधिकार्‍यांना शाळांना अचानक भेटी द्याव्या लागणार आहेत. तपासणीचा अहवाल सरल पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. शाळेच्या वेळेत शिक्षक गैरहजर आढळल्यास त्यांच्यावर कोणतीही गय न करता कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...