मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
विज्ञान खर्या अर्थाने क्रांतीचे स्त्रोत्र ठरले असल्याने विद्यार्थ्यांनी सजगतेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उपकरणांची सध्याच्या परिस्थितीतील समस्या व भविष्यातील गरजांवर उपाययोजना म्हणून विद्यार्थ्यांनी निर्मिती केली आहे. या उपकरणांचा योग्य पध्दतीने वापर व्हावा ही कृतिशीलता जोपासण्याची गरज आहे. ही गरज वास्तव्यास उतरेल त्यावेळी खर्या अर्थाने विज्ञान प्रदर्शन यशस्वी झाले असे म्हणता येणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना केले.
पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघातर्फे 52 वे मालेगाव तालुका दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन निळगव्हाण शिवारातील विद्याविकास इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, विद्या विकास स्कूल अध्यक्ष प्रसाद पेठकर, विज्ञान संघटना राज्याध्यक्ष दिनेश पवार, गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे, संचालिका विद्या पेठकर, प्राचार्य दिलीप कांदळकर, प्रशांत पाटील, विजय डोखे, किरण पगार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कृतिशीलता जपण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत शिक्षणमंत्री भुसे पुढे म्हणाले, शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतील समस्या व गरजा यावर उपाययोजना म्हणून विद्यार्थ्यांनी निर्माण केलेले उपकरणे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या उपकरणांची पाहणी करत शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत उपकरणाचे महत्व जाणून घेतले.
या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील 131 शाळांतील 147 उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. 300 बाल वैज्ञानिकांनी यात सहभाग घेतला होता. निरीक्षक म्हणून पी.बी. ठोके, डी.जी. वाणी, एम.पी. अहिरे, जे.टी. बत्तासे, एच.जी. शिंदे, एम. वाय. सावंत यांनी काम पाहिले तर जितेंद्र शिरूडे यांनी निकाल घोषीत केला.
दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप मनपा आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव, गटशिक्षण अधिकारी तानाजी घोंगडे, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे आदींच्या उपस्थितीत केला गेला. यावेळी मार्गदर्शन करतांना आयुक्त जाधव यांनी समाजातील चुकीच्या रूढी, परंपरा टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी, असे आवाहन केले.
या प्रदर्शनात विद्या विकास स्कूलच्या ट्रान्सपोर्ट अॅण्ड कम्युनिकेशन या प्रकल्पाची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड केली गेली. उच्च प्राथमिक गटात खुशी गांगुर्डे व हितांशी महाजन यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर माध्यमिक गटात वरद वारूळे व आदित्य मंडलिक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्राथमिक शिक्षक साहित्यमध्ये विजय सूर्यवंशी यांनी तर माध्यमिक गटात विजय डोखे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रयोगशाळा परिचर गटात प्रथम क्रमांक सौरभ डांगचे यांनी पटकावला. प्रदर्शनातील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देत सन्मानित करण्यात आले.
कार्ययक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया सावळे, शिवम निकम, गार्गी पवार व समर्थ शिरोळे यांनी केले. तर अमृता पन्हे यांनी आभार मानले. मोठ्या संख्येने मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.