नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने आता भीषण वळण घेतले असून, या युद्धाची धग थेट भारताच्या सागरी वेशीपर्यंत येऊन धडकली आहे. युद्धाच्या पाचव्या दिवशी इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य करत भीषण बॉम्बहल्ला केला आहे. दरम्यान दुसरीकडे श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका इराणी जहाजावर ‘पाणबुडी हल्ला’ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ (गल्ले परिसरात) एका इराणी जहाजावर पाणबुडी हल्ल्याची घटना घडली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, श्रीलंकन नौदल आणि संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, या हल्ल्यात कमीतकमी १०१ जण बेपत्ता आहेत, तर ७८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जहाज बुडले असून, श्रीलंकन नौदलाने बचावकार्य सुरू केले आहे. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.
मोठी राजकीय उलथापालथ! नितीश कुमार राज्यसभेवर जाणार? बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार?
परराष्ट्र मंत्र्यांनी श्रीलंकेतील संसदेला दिलेल्या माहितीनुसार देशातील नौदलाला 180 नागरिक असणाऱ्या एका जहाजावर आयआरआयआयएस डेनामध्ये IRIS Dena (hull number 75) संकट ओढावले असून, ही माहिती मिळताच तातडीनं बचावकार्यासाठी घटनास्थळी जहाजं आणि वायुदलाची विमाने पाठवण्यात आली. या हल्ल्याने हिंदी महासागरातील व्यापारी मार्गांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून सातत्याने विमान हल्ले आणि बॉम्बवर्षाव केला जात आहे. शहरात ठिकठिकाणी आगीचे लोळ आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. इस्रायलच्या या आक्रमक पावित्र्यामुळे तेहरानमध्ये प्रचंड खळबळ माजली असून नागरिक सुरक्षित ठिकाणांचा शोध घेत आहेत. अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्यामुळे इराण पूर्णपणे एकाकी पडला असला तरी, इराणनेही प्रतिहल्ल्याची तयारी दर्शवली आहे.
भारताच्या चिंतेत वाढ
हे युद्ध श्रीलंकेच्या समुद्री सीमेपर्यंत पोहोचल्याने भारताची सुरक्षा आणि व्यापार चिंता वाढली आहे. हिंदी महासागरातील सागरी मार्गांवर हल्ले होत असल्याने, भारताच्या कच्च्या तेल आयाती आणि जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकन CENTCOM ने सांगितले की, इराणच्या नौदलाला मोठा फटका बसला असून, १७ जहाजे (एक सबमरीनसह) नष्ट करण्यात आली आहेत. इराणने प्रतिहल्ले सुरू ठेवले असून, होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, पाचव्या दिवशीही युद्धाचा भडका शांत होण्याऐवजी अधिकच तीव्र होत असून, जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.





