मुंबई | Mumbai
मध्य पूर्वेत इराण-इस्रायल अमेरिकेदरम्यान भीषण संघर्ष सुरु आहे. इराणकडून फक्त इस्रायल आणि अमेरिकेच्या तळावर नाही तर आखाती देशांमध्ये मिसाइल हल्ले सुरु आहेत. सौदी अरेबिया, ओमान, दुबई, कुवैत या ठिकाणी मागच्या काही दिवसात इराणने हल्ले केले आहेत. महाराष्ट्रातल्या पर्यटकांना आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, गिरीश महाजन यांना यासंदर्भातली जबाबदारी दिली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.
आमदार संजय केनेकर यांनी आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्याबाबतचा प्रश्न आज (04 फेब्रुवारी) विधान परिषदेत उपस्थित केला. यावेळी निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावर त्यांना मायदेशात आणण्यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. “आम्ही WhatsApp नंबर दिलेला आहे. लोक त्यावर संपर्क साधत आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
धक्कादायक! महाराष्ट्रात बेपत्ता महिला आणि मुलींच्या संख्येत वाढ; विधानसभेत आकडेवारी सादर
अनिल परब म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखाती देशात अडकलेल्या 164 लोकांना मायदेशात आणायची व्यवस्था एक खाजगी विमान पाठवून केली, अशी बातमी आम्ही ऐकली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आहे. जर उपमुख्यमंत्री स्वतःची ताकद लावून 164 लोकांना आणत असतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दोन पावलं पुढे असायला पाहिजे. परंतु मुख्यमंत्र्यांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्र सरकार भारतीयांना परत आणण्यासाठी काय उपाययोजना करणार आहे? याच्याबाबतीमध्ये प्रचंड संभ्रम आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात महाराष्ट्र सरकारची भूमिका मांडावी. तसेच जर त्यांनी वैयक्तिक प्रयत्न करून भारतीयांना परत आणले तर त्यांचे देखील अभिनंदन आहे, असे मत अनिल परब यांनी मांडले.
देवेंद्र फडणवीसांनी काय माहिती दिली?
इराण आणि इस्रायल यांचे जे युद्ध सुरु झाले त्यानंतर एअर स्पेस बंद झाली. त्यानंतर भारतीय पर्यटक किंवा व्यवसायासाठी जे लोक गेले त्यांचे मेसेज आपल्याला येऊ लागले. त्यानंतर आपण केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला. त्यांनी दुतावासाशी संपर्क करायला सांगितले. आपल्या राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन यांना आपण ती जबाबदारी दिली आहे. आपण WA नंबर दिला आहे, तिथल्या लोकांच्या अडचणी आपण दूर करतो आहोत. अडकलेल्या लोकांना परत आणण्याचे प्रयत्नही आपण सुरु केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंसोबतही तसाच प्रकार होणार होता; रोहित पवारांचा VSR कंपनीवर गंभीर आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्या पक्षाच्या वतीने भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी अडकलेल्या त्या ठिकाणाहून परत आणून अतिशय स्तुत्य अशा प्रकारचं काम केलं आहे. कारण राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून भूमिका मांडली होती की, महाराष्ट्रातले लोक तिथे अडकले आहेत त्यांना परत आणण्याकरता आम्ही व्यवस्था करू इच्छितो. परंतु केंद्र सरकारने सांगितलंय की, सगळे राज्य असे प्रयत्न करतील, तर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होईल आणि आखाती देशात एअरस्पेस देखील सुरक्षित नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून जी विमानं उपलब्ध होत आहेत, त्यामधून भारतीयांना परत आणले जात आहेत. परदेशात अडकलेले जे काही आपले लोक आहेत, त्या सगळ्यांना पूर्ण सुरक्षिततेतून आपण परत आणू, असा विश्वासही देवेंद्र फडणीवस यांनी सभागृहात व्यक्त केला.





