Thursday, November 26, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्ह्यातील ऊसदर निश्चितीसंदर्भात उद्या बैठक

Ahilyanagar : जिल्ह्यातील ऊसदर निश्चितीसंदर्भात उद्या बैठक

आजची बैठक लांबणीवर, शुक्रवारी ना. विखे यांच्यासमोर होणार फैसला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज गुरूवारी (26 नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेली बैठक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक उद्या शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या चेअरमन यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. चेअरमन अनुपस्थित राहिल्यास संबंधित कारखान्यांविरूध्द प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्याचा इशारा प्रादेशिक सहसंचालक (साखर) गणेश पुरी यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी होणार्‍या बैठकीत तरी ऊसदराचा तिढा सुटणार का, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरू होऊन सुमारे दोन महिने झाले आहेत. जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांपैकी नऊ कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला असून, उर्वरित कारखान्यांनी अद्याप दर घोषित केलेला नाही. जाहीर करण्यात आलेले दरही शेतकरी संघटनांना मान्य नाहीत. शेतकरी संघटनांकडून प्रतिटन चार हजार रूपये दराची मागणी होत असल्याने ऊसदराचा प्रश्न चिघळला आहे. यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसदरासंदर्भात बैठक झाली होती. मात्र, या बैठकीला कारखान्यांचे चेअरमन उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन ऊसदर जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, त्यानंतरही कारखान्यांकडून अपेक्षित निर्णय झाला नाही. ऊसदर जाहीर न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला होता. त्यानुसार 9 नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर आंदोलन करण्यात आले. नेवासा फाटा येथेही आंदोलन करण्यात आले. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी पुन्हा पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीतही ऊसदराचा ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे बैठक निष्फळ ठरली होती.

यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी, खासदार नीलेश लंके, आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठल लंघे यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (23 नोव्हेंबर) मोर्चा काढला. या वेळी ऊसदराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील कारखान्यांनी समाधानकारक दर जाहीर न केल्यास 28 नोव्हेंबर रोजी रेलरोको आणि रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुरूवारी सकाळी 11 वाजता बैठक आयोजित केली होती. मात्र, बैठकीच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. आता शुक्रवारी पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

दरम्यान, ऊसदराचा निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ऊसतोडणी, वाहतूक आणि गाळप बंद ठेवण्यात आले आहे. बैठक एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याने हा बंदचा निर्णय 27 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश ताके यांनी केली आहे. त्यामुळे शुक्रवारी होणार्‍या बैठकीत कारखानदारांची भूमिका काय राहणार आणि शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर कोणता तोडगा निघणार, यावर जिल्ह्यातील ऊसदराचे पुढील आंदोलन अवलंबून असणार आहे.

ताज्या बातम्या

Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची जोड देत शेतीपुरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे...

0
नाशिक | Nashik नाशिक जिल्हा (Nashik District) कृषी क्षेत्रात प्रगत असून शेतीला आधुनिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे....