Saturday, May 30, 2026
HomeनगरCrime News : पोलिसांची मोठी कारवाई! ४७ लाखांचे एसी लंपास करणारी आंतरराज्य...

Crime News : पोलिसांची मोठी कारवाई! ४७ लाखांचे एसी लंपास करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

पारनेर । तालुका प्रतिनिधी

- Advertisement -

सुपा औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीतून हैद्राबादच्या दिशेने निघालेला कोट्यवधींचा मुद्देमाल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ४७ लाख ३९ हजार रुपये किमतीचे एअर कंडिशनर्स (एसी) घेऊन पसार झालेला कंटेनर आणि त्यातील मालाची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे सुपा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत असून, या गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी आणि ३५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुपा एमआयडीसी येथील कॅरिअर मायडीया इंडिया प्रा. लि. या कंपनीतून एसीचा मोठा साठा हैद्राबादला पाठवण्यात आला होता. ड्रायव्हर सर्जेराव दत्तू शिंदे (रा. जामगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा एमएच-१२-पीक्यू-६०१० या कंटेनरमधून ४७ लाख ३९ हजार ४१४ रुपये किमतीचे एसी घेऊन निघाला होता. मात्र, हा माल निर्धारित स्थळी पोहोचवण्याऐवजी ड्रायव्हरने तो कर्नाटक राज्यातील आळंद-गुलबर्गा येथे नेला. तेथे एसीची चोरी केल्यानंतर आरोपीने रिकामा ट्रक एका पेट्रोल पंपावर सोडून पळ काढला. याप्रकरणी मनीष सतीश शर्मा (वय ३७, रा. खराडी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सुपा पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तातडीने तपास पथके नियुक्त केली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, चोरलेला माल आणि आरोपी धाराशिव जिल्ह्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सुपा पोलीस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या सापळा रचला. पोलिसांनी सोनू अशोक पठारे (वय २१, रा. गोलेगाव, ता. भूम), गंगाराम सुबराव पवार (वय २१, रा. ढोकी) आणि बिभीषण नाना काळे (वय २५, रा. ढोकी) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कंटेनरमधील एसीचे बॉक्स आपल्या ताब्यातील पिकअप गाडीत (एमएच-४२-आर-०५०५) भरून तेर येथील लक्ष्मण धनु पवार यांच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवले होते. पोलिसांनी या ठिकाणी पंचांसमक्ष झडती घेतली असता, तेथे ३२१ एसीचे बॉक्स मिळून आले. या जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत ३५ लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी, कंटेनर आणि मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली आहे.

ही कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, सतीश बर्डे, मेघराज कोल्हे, राहुल गुंडू, नितीन शिंदे आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे सुदर्शन कासार, शौकात पठाण, प्रकाश अवताडे, जावेद काझी, फरहान पठाण, रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांचा समावेश होता. आंतरराज्य टोळीचा मुसक्या आवळल्याने सुपा पोलिसांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

ताज्या बातम्या

TMC खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला; कपडे फाडले, दगडफेक केली, भाजपावर...

0
नवी दिल्ली | New Delhi पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तनानंतर राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच सोनारपूर येथे तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee)...