बीड । Beed
बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सातवा आरोपी अद्यापही फरार असून, त्याला अटक न केल्याने देशमुख कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिस प्रशासनावर अविश्वास असल्याचे सांगत, त्यांनी सुरक्षाही न मिळाल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळेंकडे केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. “कृष्णा आंधळे सापडू शकत नाही, हे कोणाला पटतंय का? त्याचा कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) काढा. फोन कुठे जातो, हे शोधा. या प्रकरणातील सर्व आरोपींचा सीडीआर मिळालाच पाहिजे,” असे सुळे यांनी ठामपणे सांगितले.
“ही लढाई महिलांनी हाती घेतली पाहिजे. लाटणं घ्या हातात! आमच्या घरातील पुरुषांवर अन्याय सहन केला जाणार नाही. महाराष्ट्र अशा घटनांना कधीही माफ करणार नाही. पीडित कुटुंबाने अन्नत्याग करू नये, जर गरज पडली, तर आम्ही अन्नत्याग करू,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“तानाजी सावंतांचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही? गरीब, शोषित आणि पीडित असल्याने आवाज दाबला जातो का? न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. पीडित कुटुंबाच्या दोन्ही मुलांची जबाबदारी शरद पवारांनी घेतली आहे,” असेही सुळे म्हणाल्या.
“मी या कुटुंबातील आई, मुलगी आणि आजीला शब्द देते की बीडमधील सत्तेची आणि पैशांची मस्ती उतरवू. आपण सर्वजण ताकदीने लढू. कोर्ट केस मी स्वतः लढेन. जसे मी निर्भयपणे राज्यात आणि देशभर फिरते, तसेच प्रत्येक महिलेने फिरले पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.