Monday, July 27, 2026
HomeराजकीयSupriya Sule : आता ट्रम्प यांच्या नेतृत्वात काम करू…; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया...

Supriya Sule : आता ट्रम्प यांच्या नेतृत्वात काम करू…; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

नाशिक । Nashik

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी घडत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून ‘ऑपरेशन टायगर-३’ ची जोरदार तयारी सुरू असून, ठाकरे गटासह शरद पवार गटाचेही काही आमदार-खासदार त्यांच्या रडारवर असल्याच्या बातम्यांनी राजकीय वर्तुळ ढवळून निघत आहे.

- Advertisement -

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या खास मिश्कील आणि उपरोधिक शैलीत या चर्चांचा खरपूस समाचार घेतला आहे. “आता आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचे बाकी राहिले आहे, त्यापेक्षा थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करायला पाठवून द्या,” असा टोला त्यांनी लगावला आहे. नाशिक येथे यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. सातत्याने होणाऱ्या पक्षांतराच्या चर्चांवर त्यांनी अत्यंत नाविन्यपूर्ण आणि उपरोधिक पद्धतीने आपली नाराजी व्यक्त केली.

आपल्या भाषणात सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्या पक्षाच्या ८ खासदारांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. टीव्ही चॅनेल्स आणि माध्यमांमध्ये रोज सकाळी आम्हाला एका नवीन पक्षात पाठवले जाते. आम्ही त्या ग्रुपवर गमतीने बोलतो की, आता फक्त मनसेमध्येच आमची बदली करायची बाकी राहिली आहे. राजकीय नेत्यांना जणू बाजारातील वस्तू (कमोडिटी) करून ठेवले आहे. या सगळ्या प्रकारामुळे आम्ही अस्वस्थ आहोत आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे दुर्दैव आहे.”

त्यांनी पुढे अधिक उपरोधिक होत म्हटले, “आता आमच्या खासदारांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच पाठवून द्या. आम्ही थेट ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करू. सध्या ज्या पद्धतीने आमच्या राजकीय भूमिकेची थट्टा केली जात आहे, ते अत्यंत क्लेशदायक आहे.” सुप्रिया सुळे यांच्या या विधानानंतर कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला असला, तरी त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर-३’ ची व्यूहरचना आखली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता या तिसऱ्या टप्प्यात ठाकरे गटासह शरद पवार यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींना आपल्याकडे खेचण्याची योजना आखली जात आहे. यासाठी काही आमदार आणि खासदारांसोबत गुप्त बैठका आणि संपर्क सुरू असल्याचा दावा केला जात आहे.

शिंदे गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील १० आमदारांचे मन वळवण्यात यश आले आहे. मात्र, कायदेशीर कचाट्यात किंवा पक्षांतरबंदी कायद्यात अडकू नये म्हणून आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्यासाठी आणखी ५ आमदारांची जुळवाजुळव सुरू आहे. याशिवाय ठाकरे गटातील आणखी एक खासदार देखील संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

या संपूर्ण मोहिमेची पडद्यामागची जबाबदारी माजी मंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय निलेश देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे समजते. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार की सुप्रिया सुळे यांनी म्हटल्याप्रमाणे या केवळ चर्चाच ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...