मुंबई । Mumbai
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी एक नवी राजकीय चर्चा रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे सर्व ८ खासदार सोमवारी सकाळी ११ वाजता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या महत्त्वपूर्ण भेटीची माहिती खुद्द सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेला भीषण पाण्याचा प्रश्न आणि विविध मतदारसंघांमधील विकासाचे प्रलंबित प्रश्न थेट देशाच्या प्रधानांकडे मांडण्यासाठी ही भेट ठरवण्यात आली आहे. “आमचे खासदार आपापल्या क्षेत्रातील जनतेचे प्रश्न आणि राज्याची पाण्याची स्थिती यावर पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा करतील,” असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या एफसीआरए (FCRA) बिलावर जोरदार निशाणा साधला. “या बिलाबाबत सरकारने कोणतीही घाईगडबड न करता लोकशाही मार्गाने चर्चा केली पाहिजे. हे बिल आमच्यावर लादू नका,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, “काही चुकीचे पैसे किंवा ड्रग्जचे व्यवहार होत असतील तर त्याला जरूर विरोध करा, पण सामाजिक कामात मदत करणाऱ्या सर्वांकडेच वाईट नजरेने पाहणे अयोग्य आहे,” असे सांगत त्यांनी संयुक्त चर्चेची तयारी दर्शवली. यावेळी डिलिमिटेशन बिलावर बोलताना त्या म्हणाल्या की, “अजून हे बिल आलेलेच नाही. आमची इंडिया अलायन्सची रोज बैठक होते, सर्वांशी चर्चा करूनच आम्ही आमची अधिकृत भूमिका मांडू.”
तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. “शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी अनेक कडक नियम लादले जातात, मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणतेही नियम नाहीत. हे सरकारचे असंवेदनशील धोरण असून केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली ही धूळफेक आहे,” असा घनाघाती आरोप त्यांनी केला.




