Thursday, May 28, 2026
HomeनगरSangamner : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमिनींना कमी मोबदला

Sangamner : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमिनींना कमी मोबदला

शेतकर्‍यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे धाव

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींना अत्यंत कमी मोबदला देण्यात आल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वाढीव मोबदला मिळावा या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी शिष्टमंडळाने राज्याचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी थोरात यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शेतकर्‍यांच्या मागण्या मांडल्या.

- Advertisement -

तळेगाव परिसरातील विविध गावांतील शेतकर्‍यांनी माजीमंत्री थोरात यांची भेट घेतली. यावेळी माजी उपसभापती अविनाश सोनवणे, कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे, हौशीराम सोनवणे, डॉ. संदीप गोर्डे, किसनराव सुपेकर, विलास मास्तर सोनवणे, शिवनाथ गोर्डे, संपत गोर्डे, रावजी गोर्डे, विलास गोर्डे, रवींद्र गोर्डे, प्रकाश सुपेकर, दत्तात्रय गोर्डे, मेजर बाळासाहेब गोर्डे, सचिन गोर्डे, बाळासाहेब कोते यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग हा अहिल्यानगर जिल्ह्यातून जात असून या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील सुमारे 1083.88 हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव, तळेगाव, अजमपूर, आरामपूर, वरझडी बुद्रुक, वरझडी खुर्द, हसनाबाद, जुनेगाव, लोहारे, कासारे, सादतपूर आणि चिंचपूर या गावांतील मोठ्या प्रमाणावर शेती जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. 2021-22 मध्ये भूसंपादन आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती.

शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, संपादित जमिनींसाठी केवळ प्रति एकर सात ते दहा लाख रुपये इतका कमी मोबदला देण्यात आला आहे. या भागात डाळिंब, भाजीपाला आणि इतर नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर अनेक शेतकर्‍यांनी बागायती शेती विकसित केली असून जमिनींचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शासनाने फेरमूल्यांकन करून योग्य बाजारभावानुसार मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. यावेळी माजीमंत्री थोरात म्हणाले, शेतकरी स्वतःची जमीन विकासकामांसाठी देत आहे. त्यामुळे त्याला योग्य आणि रास्त मोबदला मिळालाच पाहिजे.

यूपीए सरकारच्या काळात श्रीमती सोनिया गांधी यांनी शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. संगमनेर तालुक्यात नाशिक-पुणे महामार्गासाठीही शेतकर्‍यांना चांगला मोबदला मिळाला होता. त्यामुळे या शेतकर्‍यांची मागणी रास्त असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दुष्काळी भागातील शेतकर्‍यांची परिस्थिती सांगत संपादित जमिनींना वाढीव मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली. यावर ना. गडकरी यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती थोरात यांनी दिली.

शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून माजीमंत्री बाळासाहेब यांनी विविध प्रकल्पांमध्ये बाधित शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. काकडी विमानतळ, समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्ग प्रकल्पांमध्येही त्यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी पुढाकार घेतल्याचे उपस्थित शेतकर्‍यांनी सांगितले. तसेच थोरात आणि ना. गडकरी यांचे राजकारणापलीकडील स्नेहसंबंध शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
– हौशीराम सोनवणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातून 111 गुन्हेगार हद्दपार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar बकरी ईद सण शांततेत, सुव्यवस्थेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा यासाठी अहिल्यानगर शहर उपविभाग पोलिसांकडून व्यापक तयारी करण्यात आली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या...