मालेगाव | प्रतिनिधी
शहरातील इस्लामपुरा भागातील प्रार्थनास्थळासोबतच, दोन-तीन घरांमध्ये स्फोटके असल्याचे गुप्त माहितीवरून आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथकासह नाशिक क्राईम ग्रंच, बॉम्बशोध व फॉरन्सीक पथकासह घड़क कृती दलाच्या जवानांनी गोपनीयरित्या मालेगावी येत स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रार्थनास्थळासह घरांची कसून तपासणी केली. तब्बल अडीच ते तीन तास सुरू असलेल्या या मोहिमेत काहीही आक्षेपार्ह आढळून न आल्याने पोलिस पथक इस्लामपुरा भागातून माघारी परतल्याने शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, मालेगाव शहरात प्रथमच प्रार्थनास्थळाची व्यापक बंदोबस्तात मध्यरात्रीतून तपासणी केली गेली. इस्लामपुरमधील सुमारे सव्वाशे वर्ष जुनी असलेली बरकतीया मशिदीत दहशतवाद विरोधी पथकासह विविध पथकांनी तपासणी केल्याने या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून मालेगावातूनच ही गुप्त माहिती दिली गेल्याने आश्वर्य व्यक्त केले जात आहे.
या संदर्भात समजलेले वृत्त असे की, इस्लामपुरा भागातील बरकतीया मशिदीसह काही घरांमध्ये स्फोटके ठेवण्यात आली असल्याची गुप्त माहिती पोलीस महासंचालकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाशिक क्राईम ब्रैचचे उपायुक्त किरण चव्हाण यांच्यासह दहशतवाद विरोधी पथक, बॉम्बशोध पथक, फॉरेन्सीक व घडक वृत्ती दलाच्या जवानांनी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास बरकतीया मशिद परिसरात दाखल झाले.
तत्पुर्वी सदर शोधमोहिम गोपनीय असल्याने मालेगावी पोलीस अधिकाऱ्यांना मदतीसाठी पथक तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. पोलीसांचे पथक इस्लामपुरा भागात दाखल होताच संबंधित मशिदीच्या प्रमुखांशी तसेच परिसरात वास्तव्यास असलेल्या जबाबदार नागरीकांना या शोध मोहिमेची माहिती देण्यात आली. मशिदीत येणाऱ्या तसेच शहरातील नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ही शोध मोहिम महत्वपुर्ण असल्याची माहिती पोलीस अधिका-यांतर्फे यावेळी देण्यात आली. त्यामुळे संबंधित मशिद प्रमुखांसह नागरीकांनी देखील या मोहिमेस सहकार्य करण्याची भुमिका स्पष्ट केली. मशिदीचे पावित्र्य भंग होणार नाही याची दक्षता घेत पोलिसांनी पादत्राणे बाहेर काढीत व अंथरलेले
गालीचे बाजुला करत प्रमुख नागरीकांच्या मदतीने संपुर्ण मशिदीत तपासणी मोहिमेस प्रारंभ केला गेला. यावेळी बॉम्बशोध पथकासह विविध पथकांनी संपुर्ण मशिदीची सखोल तपासणी केली. यानंतर संशय असलेल्या घरांची देखील पोलीस पथकांतर्फे कसून तपासणी केली गेली. यावेळी घरांसह परिसरात श्वान पथकातर्फे देखील शोध मोहिम राबविण्यात आली होती. मात्र या पथकाच्या हाती वस्तू लागले नसल्याने पोलीसांना माघारी परतावे लागले. तब्बल अडीच ते तीन तास मशिदीसह घरांमध्ये ही शोध मोहिम सुरू होती. पोलीस महासंचालकांना मशिद व घरांमध्ये स्फोटक असल्याची गुप्त माहिती मालेगावातूनच दिली गेल्याच्या होत असलेल्या चर्चेस आमदार मौलाना मुफ्ती यांनी दुजोरा दिला.




