Tuesday, September 22, 2026
HomeनगरCrime News : सुवर्णबिंदू कंपनीच्या फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

Crime News : सुवर्णबिंदू कंपनीच्या फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

13 ते 15 टक्के व्याजाचे आमिष || मुदतपूर्तीनंतर ठेवी परत न केल्याचा आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अमरापूर (ता. शेवगाव) येथील सुवर्णबिंदू अर्बन निधी लिमिटेड आणि पाथर्डी येथील सुवर्णबिंदू फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून ठेवीदार व गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, गुंतवणूक केलेली रक्कम परत न मिळालेल्या ठेवीदारांनी मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णबिंदू अर्बन निधी लिमिटेड, अमरापूर आणि सुवर्णबिंदू फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पाथर्डी या कंपन्यांचे संस्थापक, चेअरमन, संचालक व इतर पदाधिकार्‍यांनी विविध योजनांमध्ये पैसे गुंतविल्यास आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे. त्यामध्ये पिग्मी डिपॉझिट खाते, फिक्स डिपॉझिट खाते, वैयक्तिक बचत खाते, सदस्य रिकरींग खाते, वैयक्तिक सिक्युरिटी डिपॉझिट खाते तसेच एफडी खात्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 13 ते 15 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळेल, असे आमिष दाखवून ठेवीदार व गुंतवणूकदारांकडून कंपन्यांमध्ये रक्कम जमा करून घेण्यात आली. मात्र, संबंधित गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही रक्कम परत न देता फसवणूक व अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात ज्ञानेश्वर हनुमंत उदागे, रोहिणी ज्ञानेश्वर उदागे, विक्रम किसन कराळे, रूक्मिणी विक्रम कराळे, हनुमंत दादाबा उदागे (सर्व रा. सुसरे, ता. पाथर्डी), केदारनाथ जुगलकिशोर मंत्री, उषाबाई रामनाथ तनवडे, रामनाथ माधव तनवडे (रा. शेवगाव), शितल विकास बुर्‍हाडे (रा. पाथर्डी), सुनील पांडुरंग फलके (रा. सुलतानपुर, ता. शेवगाव), सचिन बबन अभंग, सौरभ विष्णू अकोलकर, अशोक काकासाहेब कराळे आणि छाया विष्णू अकोलकर (सर्व रा. हातगाव, ता. शेवगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

गुंतवणुकदारांना आवाहन
दरम्यान, सुवर्णबिंदू अर्बन निधी लिमिटेड, अमरापूर तसेच सुवर्णबिंदू फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पाथर्डी या कंपन्यांचे सभासद, ठेवीदार आणि गुंतवणूकदार यांना आर्थिक गुन्हे शाखेने जाहीर आवाहन केले आहे. ज्यांनी या कंपन्यांमध्ये पैसे गुंतविले आहेत आणि त्यांची गुंतवणुकीची रक्कम अद्याप परत मिळालेली नाही, अशा व्यक्तींनी आपल्या गुंतवणुकीसंदर्भातील मुदतठेवीची पावती, गुंतवणुकीची कागदपत्रे, बचत खात्याची कागदपत्रे तसेच इतर मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत समक्ष संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली;...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या नावाखाली राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे...