Thursday, March 13, 2025
Homeनगरटाकळीभान ग्रामसभेकडे गावपुढार्‍यांसह नागरिकांची पाठ

टाकळीभान ग्रामसभेकडे गावपुढार्‍यांसह नागरिकांची पाठ

अवघ्या पाऊण तासात सभा गुंडाळण्याची नामुष्की

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील महत्वाच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेकडे प्रमुख गावपुढार्‍यांसह ग्रामस्थांनीही पाठ फिरवल्याने बोटावर मोजण्या एवढ्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पाडण्याची नामुष्की ग्रामपंचायत प्रशासनावर आली. नेहमीप्रमाणे अनेक सदस्यांनाही ग्रामसभेची अ‍ॅलर्जी असल्याने दोन नंबरच्या फळीतील कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचताच पाऊण तासातच ग्रामसभेचा गाशा गुंडाळण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थांनी सरपंच अर्चना रणनवरे होत्या.

- Advertisement -

नागरिकांचे हक्काचे व्यासपिठ असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीची ग्रामसभा शासकीय नियमानुसार 26 जानेवारी रोजी ग्रामसचिवालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. 25 हजाराच्या जवळपास लोकसंख्या असली तरी बोटावर मोजण्या एवढी नागरिकांची उपस्थिती असल्याने सभेसाठीचा आवश्यक असलेला कोरमही पूर्ण झाला नव्हता. ग्रामसभेला सत्तेतील भाजपा, काँग्रेस, मुरकुटे गट यांच्यासह इतर पक्षाच्या प्रमुख गावपुढार्‍यांनीही दांडी मारली. मुळातच सत्तेत नेमकी युती कुणाची आहे याबाबत संभ्रमावस्था असल्याने नाराजीनाट्य वारंवार सुरू आहे. ग्रामपंचायतीचे झेंडा वंदनाच्या नावावरून सत्ताधार्‍यांमध्ये आदळआपट झाल्याने प्रमुख गावपुढारी ग्रामसभेकडे फिरकलेच नाही. अशी दबक्या आवाजात चर्चा यावेळी झाली.

प्रमुख गावपुढारी ग्रामसभेला उपस्थित रहाणार नाही. अशी चर्चा झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनीही ग्रामसभेला न जाणे पसंत केले. तर 17 सदस्य संख्या असली तरी उपसरपंच कान्हा खंडागळे, गोरख दाभाडे, सुनील बोडखे, अशोक कचे यासह सदस्य पती जयकर मगर, शिवाजी पवार, मोहन रणनवरे व भाऊसाहेब पटारे यांनी हजेरी लावली. तर ग्रामसभेची अ‍ॅलर्जी असलेले बाकी सदस्य गैरहजरच राहीले. 15 ऑगस्ट 2024 रोजीच्या ग्रामसभेत गैरहजर सदस्यांवर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने ते गंभीरतेने घेतले नसल्याने प्रभागाची जबाबदारी असलेले लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत असल्याने नागरिकांच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत.

यावेळी भाजपाचे नारायण काळे, अनिल बोडखे व सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांनीच तक्रारींचा पाढा वाचला. यावर उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी रखडलेल्या घरकुलांबाबत शासकीय जाचक अटी कारणीभूत असल्याने घरकुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय गट गावठाणकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न केले जात असून खासगी जागा असल्यास घरकुलांचा प्रश्न लवकर सोडवणे शक्य होईल, असे सांगितले. ग्रामसभेत कामगार तलाठी कु. रामटेके यांनी फार्मर आय. डी. बनवून घेण्याचे आवाहन केले.

ग्रामसभेसाठी शासकीय विभागाचे सर्वच प्रतिनिधी गैरहजर असल्याने वरिष्ठांकडे याबाबत लेखी तक्रार करण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव यांनी अहवाल वाचन करुन तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, टाकळीभान सोसायटीचे चेअरमन एकनाथ पटारे, अ‍ॅड. धनराज कोकणे, विकास मगर, महेंद्र संत, नानासाहेब रणनवरे आदी उपस्थित होते.

टाकळीभान ग्रामपंचायतीत गेल्या सुमारे तीन वर्षांपासून सदस्यांमध्ये केवळ जिरवा-जिरवीचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे एरवी पटांगण अपुरे पडणार्‍या ग्रामसभेत मांडलेल्या समस्यांची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करण्यासही उदासिन झाले आहेत. त्यामुळे उपस्थिती रोडावली आहे. तर गावपुढारी सत्ता असतानाही केवळ कुरघोड्या करण्यात धन्यता मानीत असल्याने हक्काचे व्यासपिठ असलेल्या ग्रामसभेकडे नागरिक पाठ फिरवित असल्याने समस्या ‘जैसे थे’ असल्याचा फटका कालच्या ग्रामसभेत दिसून आल्याने दोन नंबरच्या फळीतील कार्यकर्त्यांच्या तक्रारीच्या पाढ्यानंतर अवघ्या पाऊण तासात ग्रामसभेचा गाशा गुंडाळावा लागला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...