
नाशिक । प्रतिनिधी Nashik
आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि तोंडावर आलेला पावसाळा पाहता नाशिक महापालिकेच्या वतीने गोदाकाठी सुरू असलेल्या विविध कामांचा वेग वाढवण्याचे आदेश आमदार देवयानी फरांदे यांनी दिले आहेत. रविवारी ( दि 31) यांनी गोदावरी काठ परिसरात सुरू असलेल्या पावसाळी व भूमिगत गटार पाईपलाईन, रामझुला पूल आणि सराफ बाजार रस्ता या कामांची पाहणी केली. गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण आणि नाल्यांच्या सफाईबाबत त्यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या
आमदार फरांदे यांनी महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसह गोदाकाठचा दौरा केला. यावेळी त्यांनी विकासकामांचा आढावा घेतानाच, “गोदावरी कोणत्याही परिस्थितीत प्रदूषित होता कामा नये,” असे सांगितले. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची स्वच्छता करून दहिपुल, मेन रोड परिसरात पाणी साचणार नाही, याचे अचूक नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
मंदिरांच्या दुरुस्तीकडे लक्ष
गोदावरी काठावरील पुरातन मंदिरांचे जतन करण्यासाठीही आमदार फरांदे आग्रही आहेत. विशेषतः देव मामलेदार मंदिराला तडे गेल्याचे निदर्शनास येताच, त्यांनी तातडीने दुरुस्तीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गोदाकाठावरील सर्व पुरातन मंदिरांची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले आहेत.या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेवक शाहू खैरे, राहुल शेलार, आदिती पांडे, माजी महापौर विनायक पांडे, महापालिकेचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आणि समीर रकटे आदी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यात आमदार फरांदे यांनी या केल्या सूचना
मेकॅनिकल गेट : गोदावरीतील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहिल्याबाई होळकर पूल परिसरात उभारलेल्या मेकॅनिकल गेटच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांत स्वतंत्र दौरा केला जाणार आहे.
पायाभूत सोयी : रविवार कारंजा ते एक मुकी दत्त मंदिर रस्त्यावर स्पीडब्रेकर बसवण्याचे निर्देश दिले.
सांडपाणी व्यवस्थापन : पावसाळी पाणी आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन पूर्णपणे वेगळ्या असाव्यात, जेणेकरून सांडपाणी थेट गोदावरीत मिसळणार नाही.
गांधी तलाव : परिसराच्या सौंदर्यीकरणासोबतच फिल्टरेशन प्लांटच्या नियोजनावर भर देण्याच्या सूचना.
भद्रकाली सब-स्टेशन : भद्रकाली परिसरात उभारल्या जाणाऱ्या महावितरणच्या सब-स्टेशन जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश.
गोदाकाठचे सुशोभीकरण आणि सुरक्षितता याला आमचे प्राधान्य ( प्रतिक्रिया)
नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरीचे रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाकाठचे सुशोभीकरण आणि सुरक्षितता याला आमचे प्राधान्य आहे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये आणि सांडपाणी गोदावरीत मिसळू नये, यासाठी स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कोणत्याही विकासकामांत दर्जाशी तडजोड केली जाणार नाही.
.– आमदार देवयानी फरांदे




