नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
अभिनेता जोसेफ विजय (Vijay Thalapathy) यांनी १० मे रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री (Vijay Oath Ceremony) म्हणून शपथ घेतली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तब्बल पाच दिवसांनंतर सत्तास्थापनेचा तिढा सुटला होता. त्यानंतर आता तामिळनाडूत (Tamilnadu) ४७ आमदार असलेल्या एआयएडीएमके पक्षात (AIADMK Party) फुट पडली आहे.
तमिळनाडूतील विधीमंडळात १३ मे रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीआधी एआयएडीएमकेचे नेते सीवी षण्मुगम यांनी थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे आता काठावर बहुमत असलेल्या विजय सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. एआयएडीएमकेचे नेते सी.व्ही. षण्मुगम यांनी म्हटले की, “आम्ही जनतेचा कौल (जनादेश) स्वीकारतो. जनतेचा हा कौल केवळ टीव्हीके या पक्षासाठी नाही, तर तो विजय यांना मुख्यमंत्री (CM) बनवण्यासाठी होता. आम्ही मुख्यमंत्री विजय यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारला आमचा पाठिंबा जाहीर करतो”, असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत (Election) विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल १०७ जागा मिळाल्या होत्या. त्यांना सत्तास्थापनेसाठी आणखी ११ आमदारांची गरज होती. या आकड्यांची जुळवाजुळव करण्यात विजय यांच्या नाकीनऊ आले होते. सुरुवातीलाच काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. मात्र, आणखी सहा आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला तीन दिवस लागले. यानंतर व्हीसीकेच्या दोन आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या दोघांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने टीव्हीकेचे संख्याबळ १२० वर पोहोचलं आणि सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
AIADMK मध्ये फूट पडण्याची कारणे
- पक्षाच्या नेत्यांवर विश्वास राहिला नाही : अधिकृतपणे एडप्पादी पलानीसामी हे एआयएडीएमकेचे सरचिटणीस आहेत, परंतु पक्षातील बहुतेक लोक आता त्यांच्यासोबत नाहीत. बंडखोर गट आता औपचारिकपणे वेगळे होण्याची तयारी करत असल्याचे मानले जात आहे.
- मागील ५ निवडणुकांपासून पक्ष हरत आहे : पक्षांतर्गत हे संकट एआयएडीएमकेसाठी एका कठीण काळात समोर आले आहे, जेव्हा पक्षाला सतत निवडणुकीतील पराभवाचा सामना करावा लागला. यात २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक, २०२१ ची विधानसभा निवडणूक, २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि २०२१ ची विधानसभा निवडणूक यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पक्षाला २०२५ मध्ये इरोड पोटनिवडणुकीतही पराभवाला सामोरे जावे लागले.
- २०२४ मध्ये पलानीसामी यांचा भाजपशी मतभेद : एआयएडीएमकेच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी युतीबाबत झालेल्या चर्चेदरम्यान एडप्पादी पलानीसामी यांनी कथितरित्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला होता, तेव्हापासून दिल्लीसोबत त्यांचे संबंध बिघडले.
- २०२६ च्या निवडणुकीत भाजपला कमकुवत जागा देणे : बंडखोर नेत्यांनी एडप्पादी पलानीसामी यांच्यावर असाही आरोप केला की, त्यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला २७ अशा जागा दिल्या होत्या, ज्यांवर जिंकणे जवळजवळ अशक्य होते. हा राजकीयदृष्ट्या भाजपला कमकुवत करण्याचा प्रयत्न होता.




