Sunday, May 5, 2024
Homeजळगावशिक्षक-पत्रकार शरद बन्सी यांचे निधन

शिक्षक-पत्रकार शरद बन्सी यांचे निधन

धरणगाव – प्रतिनिधी Dharangaon

येथील पी.आर.हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक शरदकुमार रामलाल बन्सी (४८ वर्षे) यांचे कोरोनाशी लढतांना आज दि.२६ सप्टेंबर शनिवारी दु.१.३० वा अकाली निधन झाले. दि.२९ सप्टेंबर पासून ते जळगावच्या गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी संघर्ष करत होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचा हा २८ दिवसांचा लढा अपयशी ठरला. एका उमद्या आदर्श शिक्षकाच्या जाण्याने धरणगांवावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील दीन, दलीत, गरजू विद्यार्थ्यांना सतत मदतीचा हात देणारा कृतिशील शिक्षक म्हणून ते परीचित होते. समाजातील दानशूर व्यक्तीमत्वांकडून मदतनिधी उभारुन गरीब, होतकरु, गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, ड्रेस, बुट, शालेय साहित्य देणे तसेच काही विद्यार्थ्यांची फी देखील ते भरत होते. त्यांच्या जाण्याने गरजू विद्यार्थ्यांचे छत्रच हिरावले गेले आहे.

कोरोना काळात सुरवातीपासून त्यांनी प्रबोधन व जनजागृतीत मोठ्या उत्साहाने काम केले होते. रुग्णांना तात्काळ मदत मिळवून देणे, कोविड सेंटरवर भेटी देणे. रुग्णांना दिलासा देणे. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांचा “कोरोना योद्धा” म्हणून पुरस्कार देवून नुकताच प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. नियतीच्या मनात मात्र वेगळीच शोकांतिका दडलेलेली होती. ज्या कोरोना विरुध्द त्यांनी जनजागृती केली त्याच कोरोनाने त्यांचेवर क्रूर घाला आणला.

धरणगावातील अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ते सुपरीचित होते. गेल्या पंचवीस वर्षापासून ते पत्रकार म्हणून कार्यरत होते. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक, बालाजी वाहन प्रसारक मंडळाचे संचालक,चर्मकार समाजाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून ते कार्यरत होते. शिक्षण, सामाजीक, राजकीय क्षेत्र, पत्रकारिता, सहकार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलं असा परीवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या