अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील सुमारे दहा हजार माध्यमिक शिक्षकांच्या राजकारणाची केंद्रबिंदू असणार्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या तीन दिवसात 122 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, आज शिवजयंतीनिमित्त सुट्टी असून उद्या गुरूवार आणि त्यानंतर शुक्रवार अखेरच्या दोन दिवसांत शिक्षक सोसायटीसाठी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. त्यानंतर 24 मार्चला मतमोजणी होणार आहे. या संस्थेवर गेल्या 20 ते 25 वर्षापासून प्रा. भाऊसाहेब कचरे यांचे वर्चस्व असून यंदा ते कायम राहणार की विरोधक प्रभाव दाखवणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोसायटीच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी तीन दिवसात 122 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यात सर्वाधिक अर्ज हे सर्वसाधारण प्रवर्गातून 92, ओबीसी मतदारसंघातून 9, महिला मतदारसंघातून 8, भटक्या विमुक्त जातीमधून 7, अनुसूचित जाती-जमाती वर्गातून 7 असे अर्ज दाखल झालेले आहेत.
जिल्हा निबंधक गणेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झाले असून गुरूवार आणि शुक्रवारअखेरचा दिवस असल्याने यंदा शिक्षक मतदारसंघासाठी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याची शक्यता आहे.