Sunday, July 26, 2026
Homeमहाराष्ट्रFire News : १४ मजली इमारतीला भीषण आग; सिलिंडर स्फोटात एका मुलाचा...

Fire News : १४ मजली इमारतीला भीषण आग; सिलिंडर स्फोटात एका मुलाचा मृत्यू, ५ जखमी

पुणे (प्रतिनिधी)

पुण्यातील कोंढवा परिसरातील उंड्री येथील एका १४ मजली इमारतीत शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे दोन जवान आणि सदनिकेतील तीन नागरिक, असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत. कोंढवा-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या मार्वल आयडियल सोसायटीमध्ये ही घटना घडली.

- Advertisement -

इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील एका सदनिकेत दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि धुराचे लोट दूरवर पसरले. घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि उंच शिडीचे (स्काय लिफ्ट) अत्याधुनिक वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

जवानांनी त्वरित बाराव्या मजल्यावर धाव घेऊन पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली. मात्र, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच सदनिकेत अचानक सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या अनपेक्षित आणि शक्तिशाली स्फोटामुळे आग आणखी वेगाने पसरली आणि तिची तीव्रता वाढली. स्फोटात आग विझवत असलेले दोन अग्निशमन दलाचे जवान आणि सदनिकेतील तीन रहिवासी गंभीर जखमी झाले.

सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, याच भीषण दुर्घटनेत एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि सोसायटीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. सिलिंडर स्फोटानंतरही अग्निशमन दलाच्या जवानांनी हार मानली नाही. त्यांनी मोठ्या धैर्याने परिस्थिती हाताळली आणि सायंकाळपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग पूर्णपणे विझवल्यानंतरही खबरदारी म्हणून घटनास्थळी उशिरापर्यंत कूलिंग ऑपरेशन (थंडावा देण्याचे काम) सुरू होते.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी तपासणी सुरू केली आहे. आग लागण्याचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पुण्यात उंच इमारतींमध्ये आग लागण्याच्या वाढत्या घटनांमुळे अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः उंच इमारतींमध्ये सुरक्षा नियमांचे पालन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी किती आहे, याबद्दल गंभीर विचार करण्याची गरज या दुर्घटनेतून समोर आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : यादी जाहीर, पण कर्जमाफीचे ऑनलाईन पोर्टल हँग!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 16 लाख 96 हजार पात्र शेतकर्‍यांची तिसरी यादी शुक्रवारी रात्री उशीरा सहकार विभागाने जाहीर...